अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अणुऊर्जा विभागाने संवर्धित केलेल्या ऑलिम्पियाड कार्यक्रमामुळे आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि गणित ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताच्या युवाशक्तीला बळ


आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून जागतिक वैज्ञानिक क्षेत्रात भारताच्या प्रतिष्ठेत वाढ

भारताला 2026 च्या मोहिमेत 12 सुवर्ण आणि 7 रौप्य पदके, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आणि आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सर्व सुवर्णपदके जिंकत ऐतिहासिक सोनेरी कामगिरी

अणुऊर्जा विभागांतर्गत अनुदानित टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे राष्ट्रीय केंद्र असलेल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या नेतृत्वातील राष्ट्रीय ऑलिम्पियाड कार्यक्रमाचे यश या कामगिरीतून प्रतिबिंबित

अणुऊर्जा विभागाने गेल्या चार दशकांपासून देशाच्या युवा प्रतिभेचा शोध, मार्गदर्शन यासह त्यांना जगातील सर्वात प्रतिष्ठित विज्ञान व गणित स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज करणे, यासाठी आवश्यक असा संस्थात्मक पाया पुरवला

प्रविष्टि तिथि: 22 JUL 2026 11:52AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2026

 

अणुऊर्जा विभागाने देशातील वैज्ञानिक प्रतिभा जोपासण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. राष्ट्रीय ऑलिम्पियाड कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित ऑलिम्पियाड 2026 मध्ये देशाच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक कामगिरी करून दाखवली आहे. हे यश भारतीय युवांमधील असाधारण क्षमता दर्शवते आणि देशातील अत्यंत हुशार युवा बुद्धिमत्ता शोधून त्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी अनेक दशकांपासून अत्यंत परिश्रमाने उभारलेल्या राष्ट्रीय परिसंस्थेची  ताकद प्रतिबिंबित करते. ऑलिम्पियाड संघांचे हे उल्लेखनीय यश म्हणजे भारताच्या युवा शक्तीचे आणि जागतिक स्तरावर आपली पूर्ण क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रतिभावान युवा विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याबाबत देशाने केलेल्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे, एक प्रभावी प्रतिबिंब आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमधील भारताच्या कामगिरीच्या इतिहासात 2026 हे वर्ष एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. चारही ऑलिम्पियाड्समध्ये भारतीय संघाने एकूण 12 सुवर्ण आणि 7 रौप्य पदके जिंकली. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात सर्व सुवर्णपदके जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी यावेळी भारताने केली.  तसेच जीवशास्त्र आणि गणित या विषयातही उत्कृष्ट कामगिरी केली. जगातील सर्वोत्तम युवा प्रतिभांशी स्पर्धा करताना भारतीय विद्यार्थ्यांनी असाधारण वैज्ञानिक क्षमता, चिकाटी आणि नवोन्मेषी दृष्टिकोन यांचे प्रदर्शन घडवले. या कामगिरीमुळे देशाची मान अभिमानाने उंचावली असून विज्ञान आणि गणिताच्या क्षेत्रात भारत एक जागतिक शक्ती म्हणून उदयास येत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड 2026 भारताची कामगिरी
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड सर्व 5 सुवर्ण, संयुक्तरित्या प्रथम क्रमांक
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड सर्व  4 सुवर्ण, संयुक्तरित्या प्रथम क्रमांक
आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 1 सुवर्ण, 3 रौप्य
आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड 2 सुवर्ण, 4 रौप्य

 

विद्यार्थ्यांच्या या असाधारण यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना, अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती म्हणाले, "आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमधील भारतीय विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असून, हा भारताच्या वैज्ञानिक वृत्तीचा गौरव आहे. या यशातून विद्यार्थ्यांनी समर्पितपणे केलेले प्रयत्न, मार्गदर्शक आणि शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन तसेच अनेक दशकांच्या अथक प्रयत्नांतून उभारलेल्या संस्थात्मक परिसंस्थेची ताकद दिसून येते."

या यशात 'होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन' (एचबीसीएसई) अर्थात होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र ही संस्था केंद्रस्थानी आहे. ही संस्था 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' (टीआयएफआर) अर्थात टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे राष्ट्रीय केंद्र असून, ती 'अणुऊर्जा विभागा'च्या (डीएईच्या) अखत्यारीतील अनुदानप्राप्त संस्था आहे. भारतातील विज्ञान आणि गणित ऑलिम्पियाड कार्यक्रमांसाठीचे 'राष्ट्रीय नोडल केंद्र' या नात्याने, एचबीसीएसई या संस्थेच्या वतीने गुणवंतांचा शोध घेणे, अभिमुखता , प्रगत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अशा कठोर आणि बहु-स्तरीय प्रक्रिया पाडल्या जातात; याद्वारे संस्था देशातील अत्यंत हुशार अशा पदवी-पूर्व (प्रीयुनिव्हर्सिटी) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वोच्च आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तयारी करून घेते. अणुऊर्जा विभागाचे (जीएई) निरंतर संस्थात्मक पाठबळ आणि वैज्ञानिक उत्कृष्टतेप्रती असलेली अढळ कटिबद्धतेमुळे हा कार्यक्रम जगातील एक अत्यंत प्रतिष्ठित ऑलिम्पियाड परिसंस्थेच्या रुपात विकसित झाला आहे.

भारताच्या ऑलिम्पियाड कार्यक्रमाचे संवर्धन करण्यासाठी 'डीएई' कडून सातत्याने मिळत असलेल्या पाठिंब्याचा उल्लेख करत एचबीसीएसई चे केंद्र संचालक प्रा. अर्णब भट्टाचार्य म्हणाले, "एचबीसीएसईला दिला जात असलेला मोलाचा पाठिंबा आणि देशातील वैज्ञानिक गुणवत्तेला वाव देण्याच्या दीर्घकालीन कटिबद्धतेबद्दल आम्ही 'अणु ऊर्जा विभागा'चे (डीएई) अत्यंत ऋणी आहोत. आमच्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तरुण अभ्यासकांच्या पुढील पिढीचा शोध घेणे, त्यांना घडवणे आणि प्रेरित करणे, तसेच देशभरात विज्ञान आणि गणिताच्या क्षेत्रात उत्कृष्टतेची संस्कृती रुजवणे या आमच्या ध्येयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे."

अणुऊर्जा विभागाचे ऑलिम्पियाड चळवळीतील योगदान केवळ प्रायोजकत्वापुरतेच सीमित नसून त्याही पलीकडचे आहे. टीआयएफआर आणि एचबीसीएसई ला दिलेल्या पाठबळाच्या माध्यमातून, अणुऊर्जा विभागाने वैज्ञानिक गुणवत्तेला वाव देण्याच्या सामायिक उद्देशाने देशभरातील शास्त्रज्ञ, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि विषय-तज्ज्ञांना एकत्र आणणारी शाश्वत राष्ट्रीय परिसंस्था निर्माण करण्यास मदत केली आहे. या सहकार्यात्मक रचनेने भारतात आणि परदेशात उच्च शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक नेतृत्व अशा क्षेत्रांत ज्यांनी स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे अशा 'ऑलिम्पियाड' विजेत्यांच्या पिढ्या सातत्याने घडवल्या आहेत.

ज्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे हे यश साध्य होऊ शकले ते सर्व पदक विजेते,संघ प्रमुख, मार्गदर्शक, वैज्ञानिक निरीक्षक, एचबीसीएसई मधील ऑलिम्पियाड विभाग, शिक्षक संघटना आणि देशभरातील तज्ज्ञ व्यक्तींचे अणुऊर्जा विभाग अभिनंदन करतो. तसेच, ज्यांच्या पाठिंब्यामुळे भारताचा राष्ट्रीय ऑलिम्पियाड कार्यक्रम अधिक बळकट झाला आहे, त्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, अंतराळ विभाग आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या निरंतर भागीदारीचाही डीएई खास उल्लेख करते.

2026 मधील भारताच्या ऑलिम्पियाड संघांची कामगिरी, वैज्ञानिक शिक्षण आणि प्रतिभेच्या जोपासनेसाठी सातत्याने करण्यात येत असलेल्या गुंतवणुकीचा परिवर्तनात्मक परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. देश जागतिक ज्ञान-आधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना, वैज्ञानिकवृत्तीच्या तरुणांना प्रेरणा देणे, उत्कृष्ट संस्थांना बळकटी देणे तसेच विज्ञान, नवोन्मेष आणि मानवी क्षमता यांच्या बळावर भविष्य घडवण्यासाठी 'अणुऊर्जा विभाग' कायम वचनबद्ध  आहे.

कोलंबियातील बुकारामंगा येथे आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) 2026 मधील भारतीय संघ 

 

उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे आयोजित 58 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमधील भारतीय संघ

 

लिथुआनियातील विल्नियस येथे आयोजित 37 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सहभागी झालेला भारतीय संघ

 

May be an image of one or more people and text

चीनमधील शांघाय येथे आयोजित 67 व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेला भारतीय संघ

 

* * *

आशिष सांगळे/ सोनाली कुलकर्णी /मंजिरी गानू/ दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2287765) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , Gujarati , English , Urdu , हिन्दी , Punjabi