माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्ह्स फिल्म बाझार स्क्रीनरायटर्स लॅब 2025' मधल्या 'यायावर - द मायग्रेटिंग बर्ड' या प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी उद्देश पत्रावर केली स्वाक्षरी
स्क्रीनरायटर्स लॅब अंतर्गत विकसित झालेल्या या प्रकल्पाची विकास, वित्तपुरवठा, निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी फिनलंड-स्थित प्रॉडक्शन हाऊससोबत भागीदारी
प्रविष्टि तिथि:
22 JUL 2026 1:05PM by PIB Mumbai
मुंबई, 22 जुलै 2026
'वेव्ह्स फिल्म बाझार स्क्रीनरायटर्स लॅब 2025' साठी निवडल्या गेलेल्या "यायावर - द मायग्रेटिंग बर्ड" हा प्रकल्प विकसित करायला आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी उद्देश पत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने आयोजित केलेल्या 'वेव्ह्स फिल्म बाझार'ने जाहीर केले आहे.
या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी संयुक्तपणे विकास, वित्तपुरवठा, निर्मिती आणि सादरीकरण करण्यासाठी 'आयरोलर मीडिया अँड एंटरटेनमेंट' (भारत) आणि 'नॉर्स की प्रॉडक्शन्स' (फिनलंड) यांच्यासोबत काम करायचे निश्चित झाले आहे. या उद्देशपत्रानुसार, 'आयरोलर मीडिया अँड एंटरटेनमेंट' हे मुख्य निर्माते म्हणून काम बघणार आहेत, ते वित्तपुरवठा, निर्मितीचं नियोजन आणि अंमलबजावणीचं नेतृत्व करतील. तर 'नॉर्स की प्रॉडक्शन्स' फिनलंडमधील चित्रीकरणानंतरच्या कामांवर देखरेख आणि सहाय्य करतील आणि प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावर, तसेच चित्रपट महोत्सवांमध्ये पोहोचण्यासाठी मदत करतील.
या सहकार्यातून भारतीय पटकथा लेखन क्षेत्रातल्या उगवत्या लेखकांच्या प्रतिभेला आकार देण्यासाठी आणि जागतिक पातळीवर एकत्र काम करण्यासाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यात 'वेव्ह्स फिल्म बाझार स्क्रीनरायटर्स लॅब'चा वाढता प्रभाव दिसून येतो. या प्रकल्पाने पटकथा लेखन प्रयोगशाळेतून आंतरराष्ट्रीय भागीदारीपर्यंत केलेली प्रगती, पटकथा विकासाच्या पलीकडे जाऊन लेखकांना निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय प्रसारासाठी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.
एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले, “पटकथालेखक प्रयोगशाळेची संकल्पना मूळ भारतीय पटकथा लेखकांना आवश्यक कौशल्य, मार्गदर्शन आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचता येण्यासाठी जन्माला आली होती. प्रयोगशाळेतल्या लेखन प्रक्रियेतून एखादा प्रकल्प आंतरराष्ट्रीय भागीदारीपर्यंत पोहोचताना पाहणे, हेच या कार्यक्रमाचे अपेक्षित उद्दिष्ट होते.”
या प्रकल्पाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता डॉ. दर्शन अश्विन त्रिवेदी यांनी सांगितले, “एनएफडीसी पटकथालेखक प्रयोगशाळेचा मी आभारी आहे. आयरोलर, भारत आणि नॉर्स की, फिनलंड यांच्यासोबतच्या सहकार्याबद्दल मी उत्सुक आहे.”
वेव्हज फिल्म बाजारने डॉ.दर्शन अश्विन त्रिवेदी आणि सहयोगी निर्मात्यांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे आणि “यायावर – द मायग्रेटिंग बर्ड' ही कलाकृती जागतिक मंचाच्या दिशेने वाटचाल करत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
वेव्हज फिल्म बाजारच्या पटकथा लेखक प्रयोगशाळा 2026 साठीचे अर्ज लवकरच मागवले जातील. यासंदर्भातील तपशील वेव्हज फिल्म बाजार आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) मंचांवर जाहीर करण्यात येतील.
वेव्हज फिल्म बाजार स्क्रीनरायटर्स लॅब विषयी माहिती
पटकथा लेखकांची प्रयोगशाळा (स्क्रीनरायटर्स लॅब) हा वर्ष 2007 मध्ये सुरु करण्यात आलेला एनएफडीसीच्या वेव्हज बाजाराचा एक महत्त्वपूर्ण प्रतिभा-विकास उपक्रम आहे. यामध्ये निवडक लेखक प्रख्यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली एका गहन, बहु-स्तरीय कार्यक्रमाच्या माध्यमातून आपापल्या पटकथांच्या संर्दभात काम करताना, फिल्म बाजारात एका मंचावर एकत्र येतात. अशा पद्धतीने या प्रयोगशाळेत विकसित झालेल्या पटकथांमध्ये, द लंचबॉक्स, लिपस्टिक अंडर माय बुरखा, दम लगाके हैशा, तितली, अ डेथ इन द गूंज तसेच उल्लोझुक्कू या चित्रपटांच्या समावेश आहे.
वेव्हज फिल्म बाजारविषयी माहिती
एनएफडीसीतर्फे आयोजित वेव्हज फिल्म बाजार हा दक्षिण आशियातील महत्त्वाचा चित्रपट विषयक बाजार असून दरवर्षी गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासोबत त्याचे आयोजन करण्यात येते. या बाजारात चित्रपटविषयक नवे प्रकल्प आणि प्रतिभांचा शोध लावून त्यांना पाठबळ देण्यासाठी चित्रपट निर्माते, वित्तपुरवठादार, विक्री एजंट, वितरक, महोत्सव आयोजक आणि जगभरातील खरेदीदारांना एकत्र आणले जाते. वेव्हज फिल्म बाजारला गेल्या वर्षी मिळालेल्या घवघवीत यशाच्या पायावर यावर्षी 20 ते 24 नोव्हेंबर 2026 या कालावधीत या बाजारच्या 20 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.
एनएफडीसीविषयी थोडक्यात माहिती
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची (एनएफडीसी) स्थापना वर्ष 1975 मध्ये करण्यात आली. भारतीय चित्रपटांना चालना देऊन त्यांच्या विकासासाठी काम करणारी ही नोडल संस्था असून विविध प्रकारच्या प्रतिभा-विकास, निर्मिती तसेच चित्रपट विषयक सुलभतेला चालना देणाऱ्या उपक्रमांसह ही संस्था भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच वेव्हज फिल्म बाजार यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/निखिलेश चित्रे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2287756)
आगंतुक पटल : 13