राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत मोल्दोव्हा व्यवसाय मंचाला केले संबोधित
मोलदोव्हातील कंपन्यांसाठी भारतात व्यापार आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने उद्योग व्यवसाय विषयक उत्तम संधी उपलब्ध : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2026 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,20 जुलै 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दि. 20 जुलै 2026 चिषिनाऊ इथे आयोजित भारत मोल्दोव्हा व्यवसाय मंचाच्या उद्घाटनीय सत्राला संबोधित केले. मोल्दोव्हाच्या राष्ट्रपती माइया सांदू या देखील यावेळी उपस्थित होत्या.

भारत आणि मोल्दोव्हा यांच्यात 1992 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये सौहार्दाचे आणि मैत्रीपूर्ण संबंध राहिले असल्याची बाब आहेत. दोन्ही देशांमधील भागीदारी ही परस्परांचा आदर, लोकशाही मूल्ये तसेच शांतता, विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीच्या सामायिक वचनबद्धतेवर आधारलेले असल्याचे त्या म्हणाल्या.
आज भारत विकसित भारत 2047 चा आपला संकल्प साकारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशावेळी भारत विश्वासार्हता आणि सामायिक समृद्धीवर आधारित भागीदारीच महत्वाची मानतो असे त्यांनी सांगितले. उद्योजकता, डिजिटल परिवर्तन, उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टता तसेच युवा आणि कुशल मनुष्यबळाच्या बळावर भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनला असल्याची बाब त्यांनी नमूद केली. मोल्दोव्हाचा सुधारणावादी दृष्टिकोन, धोरणात्मक स्थान, प्रतिभावान मानवी भांडवल आणि मोल्दोवाचे युरोपीय बाजारपेठांसोबत घडून येत असलेले एकात्मिकरण यामुळे भारतीय उद्योग व्यवसायांसाठी मोल्दोव्हा हे एक महत्त्वाचे केंद्र ठरू लागले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्तीय तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास, नवीकरणीय ऊर्जा, प्रगत उत्पादन, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, जैवतंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांअंतर्गत परस्पर सहकार्याच्या प्रचंड क्षमता दडल्या असल्याचेही राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. सौर ऊर्जा, बॅटरी स्टोरेज, स्मार्ट ग्रिड्स, हरीत हायड्रोजनसह इतर हरित तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील मोल्दोव्हाच्या विकास प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय कंपन्या उत्सुक असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.
मोल्दोव्हाच्या कंपन्यांना व्यापार आणि गुंतवणुकीसाठी भारतात उद्योग व्यवसायाच्या उत्तम संधी आहेत असे राष्ट्रपती म्हणाल्या. उद्योग व्यवसाय क्षेत्रासाठी एक पारदर्शक, अंदाज मांडता येण्याजोगे आणि गुंतवणूकदार स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. मोल्दोव्हातील उद्योग व्यावसायिकांनी भारतात येऊन नव्या संधींच्या शक्यतांचा अनुभव घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
भारतीय उद्योग व्यावसायिकांनी देखील मोल्दोव्हात उपलब्ध असलेल्या संधीच्या शक्यतांचा शोध घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. भारतीय उद्योग व्यावसायिकांचे उद्योग कौशल्य, दृष्टिकोन आणि वचनबद्धता दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन आर्थिक भागीदारी निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या व्यवसाय मंचाच्या निमित्ताने घडून येणारा संवाद नव्या भागीदाऱ्या आणि नवोन्मेषी सहकार्याचा पाया रचणारा ठरेल, यामुळे भारत आणि मोल्दोव्हा या दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या व्यावसायिक मंचानिमित्त होत असलेल्या संवादात दोन्ही देशांमधील आघाडीचे उद्योग व्यवसाय प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सहभागी झालेले सर्व प्रतिनिधी कृषी आणि अन्न प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, आरोग्य सेवा, नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण, रसद पुरवठा व्यवस्थापन (लॉजिस्टिक्स) आणि डिजिटल तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करत आहेत.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2286834)
आगंतुक पटल : 17