वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-युरोपियन युनियन औद्योगिक आणि तंत्रज्ञान सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ब्रुसेल्स येथे युरोपियन उद्योग क्षेत्रातील धुरिणांबरोबर बैठकांचे आयोजन केले
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,15 जुलै 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 14-15 जुलै 2026 रोजी ब्रुसेल्स येथे भारत-युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद (टीटीसी) मंत्रीस्तरीय बैठकीच्या निमित्ताने उद्योग-केंद्रित बैठकांचे आयोजन केले.
पीयूष गोयल यांनी 14 जुलै 2026 रोजी थेल्स बेल्जियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलेन क्वेवरिन यांची भेट घेतली आणि औद्योगिक सहकार्य बळकट करण्याबाबत आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीच्या संधी शोधण्यावर चर्चा केली. त्यांनी 'सिलॉक्स ग्रुप'चे व्यवस्थापकीय संचालक जीन-क्रिस्टोफ बोगार्ट यांच्याशी द्विपक्षीय व्यापाराच्या संधींचा विस्तार आणि औद्योगिक सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. या बैठकांमुळे ब्रसेल्समधील उद्योग क्षेत्राशी संपर्क साधण्याच्या केंद्रीय मंत्री गोयल यांच्या प्रयत्नांची सुरुवात झाली, यामधून युरोपीय उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी संवाद साधण्यासाठी एक रचनात्मक व्यासपीठ उपलब्ध झाले आणि पुढील संवादांसाठीची पार्श्वभूमी तयार झाली. 15 जुलै 2026 रोजी, पीयूष गोयल यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री यांच्या समवेत बेल्जियममधील उद्योग महासंघाने (एफईबी) आयोजित केलेल्या व्यावसायिक गोलमेज परिषदेत भाग घेतला. या गोलमेज परिषदेत व्यापार सुलभता, गुंतवणुकीचा ओघ, पुरवठा साखळीची लवचिकता आणि डिजिटल नवोन्मेष यावर चर्चा करण्यासाठी भारत आणि युरोपमधील आघाडीच्या उद्योगांचे प्रतिनिधी एकत्र आले.
त्यानंतर, पीयूष गोयल यांनी हॉटेल स्टीगेनबर्गर येथे फिक्कीच्या (FICCI) शिष्टमंडळाच्या सदस्यांशी संवाद साधला. भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी 'टीटीसी' चौकटीअंतर्गत स्पर्धात्मकता वाढवणे, नियामक आव्हानांवर उपाययोजना करणे आणि उपलब्ध संधींचा लाभ घेणे याबाबत त्यांचे विचार मांडले. भारतीय उद्योगांच्या बाजारपेठ प्रवेशाचा विस्तार करण्यासाठी आणि नवोन्मेष-आधारित भागीदारीला चालना देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा गोयल यांनी पुनरुच्चार केला.
ब्रसेल्समधील पीयूष गोयल यांच्या विविध बैठकांमधील सहभागाने, उद्योग-प्रणित विकासावर भारताचा असलेला भर अधोरेखित केला आणि भारत-युरोपियन युनियन आर्थिक सहकार्य पुढे नेण्यात व्यवसाय आणि उद्योगांची महत्वाची भूमिका स्पष्ट झाली. भारत-युरोपियन युनियन - टीटीसी मंत्रीस्तरीय बैठकीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या संवादांनी, औद्योगिक भागीदारी मजबूत करणे, नवोन्मेषाला चालना देणे, बाजारपेठेत अधिक प्रवेश सुलभ करणे आणि युरोपमध्ये भारतीय उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण करण्याप्रति, सरकारची वचनबद्धता अधोरेखित झाली.
माधुरी पांगे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285192)
आगंतुक पटल : 10