राष्ट्रपती कार्यालय
‘सौश्रुतम 2026’ चे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
आचार्य सुश्रुतांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करा आणि वैद्यकीय नीतीमत्ता आणि रूग्णांप्रति करुणामय सेवेसाठी असलेल्या आपल्या वचनबद्धतेशी ठाम राहा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं तरुण विद्यार्थी आणि संशोधकांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2026 3:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,15 जुलै 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (15 जुलै 2026) ‘सुश्रुत जयंती’ निमित्त, नवी दिल्ली येथील ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्था’ (एआयआयए) इथे, ‘सौश्रुतम 2026’ चे उद्घाटन केले. याप्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते एआयआयए मधील एम आर आय विभागाचे देखील उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी, ‘शल्यचिकित्सेचे जनक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आयुर्वेदाशी निगडीत असणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. शतकांपूर्वी जेव्हा आचार्य सुश्रुतांनी शस्त्रक्रियेच्या पद्धतीचा पाया रचला, सुरुवात केली, तेव्हा त्या काळासाठी ती एका क्रांतीपेक्षा कमी नव्हती." असं त्या म्हणाल्या.

आचार्य सुश्रुत हे असंख्य गुंतागुंतीच्या आणि नाविन्यपूर्ण शस्त्रक्रिया पद्धतींचे उद्गाते म्हणून ओळखले जातात,असे राष्ट्रपती म्हणाल्या. त्यांनी त्या काळात, प्लास्टिक सर्जरी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विविध गाठींवरील (ट्युमर) उपचार तसंच कान, नाक आणि घशावरील शस्त्रक्रिया यांसारख्या शस्त्रक्रियेतील विविध क्षेत्रांत नवीन तंत्रे आणली. त्यांनी लिहिलेल्या ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथाने केवळ भारतीय उपखंडालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला एक नवीन दिशा प्रदान केली आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या, आपल्या परंपरेमध्ये अंतर्भूत असलेले, मानवी कल्याणासाठी पूरक ठरणारे ज्ञान पुढे नेताना, बदलत्या काळाशी त्याची सांगड घालणे समाजासाठी फायदेशीर ठरेल. आयुर्वेदाचा जीवनाकडे बघण्याचा सर्वसमावेशक दृष्टीकोन हे मानवजातीसाठी वरदान आहे. हे प्राचीन ज्ञान आजच्या काळातही प्रासंगिक आणि प्रभावी राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. भारत सरकारने आयुर्वेद आणि योग यांना नव्या जोमाने जागतिक स्तरावर प्रस्थापित केले आहे असे त्यांनी सांगितले. शस्त्रक्रियेच्या प्राचीन परंपरेला सर्व वैज्ञानिक निकषांवर प्रमाणित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रमाणित दस्तऐवजीकरण, डिजिटल आरोग्य प्रणालीचा मेळ आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन पद्धतींचा प्रभावी वापर यांमुळे या प्रणालीचा जागतिक स्तरावर स्वीकार होण्याला चालना मिळेल असे त्या म्हणाल्या.
आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या तरुण विद्यार्थी आणि संशोधकांना राष्ट्रपती म्हणाल्या की, आयुर्वेदाचे भवितव्य आता तुमच्या हातात आहे. जिज्ञासा, सचोटी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगत आपल्या क्षेत्रात प्रत्यक्ष संशोधन आणि उच्च-गुणवत्तेचे तपासणीत खरे उतरणारे पुरावे निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा त्यांनी सल्ला दिला. जिथे योग्य वाटेल तिथे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला संकोचू नका असेही त्या म्हणाल्या. आचार्य सुश्रुतांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करण्याचे आणि वैद्यकीय नीतीमत्ता आणि रूग्णांप्रति करुणामय सेवेसाठी असलेल्या आपल्या वचनबद्धतेशी ठाम राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
‘सौश्रुतम 2026’ या चर्चासत्रातून नवीन ज्ञान निर्मिती होऊन, आयुर्वेद शल्यचिकित्सेच्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. अशा महत्वपूर्ण कार्यक्रमांमुळे सर्वांगीण आरोग्य सेवा प्रणालीमध्ये आयुर्वेदाचे योगदान वाढण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए) द्वारे आयोजित या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात भारत आणि इतर देशांतील प्रख्यात शल्यचिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक एकत्र येणार आहेत.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
शैलेश पाटील/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284827)
आगंतुक पटल : 12