वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते भारत टेक्स 2026 चे उद्घाटन, विक्रमी आंतरराष्ट्रीय सहभागासह भारतातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवाचा प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 14 JUL 2026 9:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2026

 

नवी दिल्ली इथल्या भारत मंडपममध्ये आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते भारत टेक्स 2026 या भारताच्या प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवाचे  उद्घाटन झाले. या महोत्सवासाठी विक्रमी आंतरराष्ट्रीय सहभागाची नोंद झाली असून, हा महोत्सव जगातील सर्वात मोठा एकात्मिक वस्त्रोद्योग मूल्य साखळी सोहळा ठरला आहे. भारत टेक्स व्यापार महासंघाने या महोत्सवाचे आयोजन केले असून, या आयोजनासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे पाठबळ लाभले आहे. या महोत्सवाच्या निमीत्ताने जगभरातील 130  पेक्षा जास्त देशांतील 6,000 पेक्षा जास्त खरेदीदार आणि 1.3 लाखांपेक्षा जास्त व्यापार अभ्यागत  एकत्र आले आहेत. भारत मंडपम मधील 1.6 दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त भव्य प्रदर्शन क्षेत्रात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात 20,000  पेक्षा जास्त वस्त्रोद्योग उत्पादने मांडण्यात आली आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून एक विश्वासार्ह जागतिक पुरवठा केंद्र म्हणून तसेच शाश्वत आणि नवोन्मेषी वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील धोरणात्मक भागीदार म्हणून भारताचे वाढते स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

   

या उद्घाटन समारंभाला केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांच्यासह जागतिक खरेदीदार, पुरवठा प्रमुख, उद्योग क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे, निर्यातदार, गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग परिसंस्थेतील प्रतिनिधी उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्याला रशियाचे कृषी मंत्री तिमूर गव्हाएव्ह यांच्या नेतृत्वाखालील रशियाचे मंत्रीस्तरीय शिष्टमंडळही उपस्थित होते. यासोबतच न्यूझीलंडचे सह कृषी आणि ग्रामीण समुदाय मंत्री मार्क पॅटरसन यांच्या नेतृत्वाखालील उच्चायुक्त आणि मंत्रीस्तरीय शिष्टमंडळही या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले. या सहभागातून भारत टेक्सच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या प्रभावाची प्रचिती आली. यामुळे हा महोत्सवाने जागतिक व्यापार आणि धोरणात्मक संवादाचे एक प्रमुख व्यासपीठ अशी ओळखही प्रस्थापित केली आहे.

मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू ही देशातली आठ राज्ये या महोत्सवाची प्रायोजक राज्ये आहेत, तर इतर नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशही सहभागी राज्ये आहेत. ही सर्व राज्ये या महोत्सवात आपापल्या प्रदेशांतील औद्योगिक पायाभूत सुविधा, गुंतवणुकीच्या संधी आणि राज्य सरकारच्या वतीने पुरवले जाणारे धोरणात्मक पाठबळ यांची मांडणी करणार आहेत. या सर्व राज्यांच्या सहभागातून या महोत्सवाच्या यंदाचे पर्व हे संपूर्ण भारताचे प्रतिनिधीत्व करणारे ठरले आहे.

   

भारत टेक्स 2026 मध्ये आज झालेल्या उद्घाटन सत्रासोबतच, विविध सत्रांमध्ये 20 पेक्षा जास्त देशांमधील आंतरराष्ट्रीय तज्ञ, या उद्योग क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी, धोरणकर्ते आणि विचारवंतांसह 350 पेक्षा जास्त वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियोजनबद्ध संवाद घडून यावा यासाठी एक विशेष आंतरराष्ट्रीय दालनही  उभारण्यात आले आहे. या चार दिवसीय महोत्सवाला अमेरिका, जपान, स्पेन, ब्रिटन, पोर्तुगाल, रशिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिराती, थायलंड, बांगलादेश, श्रीलंका आणि म्यानमार या देशांमधील उद्योग क्षेत्रांची तसेच उद्योग व्यावसायिकांची शिष्टमंडळेही भेट देणार आहेत. या दरम्यान होणाऱ्या विशेष द्विपक्षीय सत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेतील कापूस भागीदारी, भारत आणि न्यूझीलंडमधील लोकरीची परिसंस्था, भारत आणि ब्रिटनमधील अमलात येणारा मुक्त व्यापार करार, जपानच्या शिष्टमंडळासोबतची विशेष चर्चा आणि रशियावर भर असलेला वस्त्रोद्योग विषयक संवाद यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील सत्रांचा समावेश असणार आहे.

भारत टेक्स 2026 मध्ये भारताच्या संपूर्ण वस्त्रोद्योग परिसंस्थेचे प्रदर्शन करण्यात येणार असून, यात तंतू, सूत, कापड, एपारेल  आणि फॅशन, गृह वस्त्र, तांत्रिक वस्त्र, हातमाग, हस्तकला, यंत्रसामग्री आणि पूरक उद्योग यांसह विविध क्षेत्रांतील हजारो व्यावसायिक प्रदर्शक सहभागी होणार आहेत. याशिवाय, तिरुपूर, इचलकरंजी आणि अहमदाबाद यांसारख्या भारतातील प्रसिद्ध वस्त्रोद्योग समूहांचे देखील या प्रदर्शनात प्रतिनिधित्व असणार आहे. 14 देशांतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शक देखील या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. 4 दिवस चालणारा हा कार्यक्रम व्यापार, गुंतवणूक, धोरणात्मक संवाद आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहभागासाठी सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून कार्य करणार असून, जागतिक वस्त्रोद्योग मूल्यसाखळीतील विविध घटकधारकांना एकत्र येणार आहेत.

भारत टेक्सने केवळ 3 आवृत्त्यांमध्येच व्यापार, गुंतवणूक, नवोन्मेष आणि धोरणात्मक संवादासाठी जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त व्यासपीठ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे मंत्री गिरिराज सिंह म्हणाले. भारताच्या उत्पादन क्षमतेवर, धोरणात्मक परिसंस्थेवर आणि दीर्घकालीन विकासक्षमतेवर जागतिक वस्त्रोद्योगाने व्यक्त केलेल्या विश्वासाचे हे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारत टेक्सच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे प्रतिबिंब उद्घाटन समारंभातही दिसून आले. यावेळी भारत टेक्स ट्रेड फेडरेशन आणि जगातील अग्रगण्य वस्त्रोद्योग व फॅशन सोर्सिंग व्यासपीठांपैकी एक असलेल्या प्रिमिअर व्हिजन पॅरिस यांच्यात लेटर ऑफ इंटेंट ची देवाणघेवाण झाली.

ही भागीदारी भारत टेक्सला खऱ्या अर्थाने जागतिक व्यासपीठ म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे या भागीदारीबाबत बोलताना गिरिराज सिंह म्हणाले. यामुळे भारतीय एमएसएमई, प्रथमच निर्यात करणारे उद्योजक आणि उत्पादक यांना युरोपमधील आघाडीच्या खरेदीदारांशी जोडले जाण्यास मदत होईल. तसेच, विश्वासार्ह, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पुरवठा केंद्र म्हणून भारताची बलस्थाने जगासमोर मांडण्यासही याचा हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले.

पुढील 4 दिवसांत भारत टेक्स 2026 अंतर्गत 100 हून अधिक ज्ञान विषयक सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये 39 पॅनेल चर्चा, 16 गोलमेज परिषद, 37 मास्टरक्लासेस आणि 8 राज्यस्तरीय सत्रांचा समावेश असेल. 50 हून अधिक ज्ञान भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या सत्रांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, शाश्वतता, इंडस्ट्री 5.0, नवोन्मेष, तांत्रिक वस्त्रोद्योग, फॅशन, धोरण आणि जागतिक सोर्सिंग या विषयांचा समावेश असेल.

भारत टेक्स 2026 विषयी

भारत टेक्स 2026 हा भारताचा प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग मेळावा आहे. 14 ते 17 जुलै 2026 या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यात भारताच्या संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्यसाखळीचे दर्शन घडविण्यात येणार असून, वस्त्रोद्योग आणि परिधान क्षेत्रातील जागतिक व्यापार, गुंतवणूक, नवोन्मेष, शाश्वतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी हे एक प्रमुख व्यासपीठ ठरणार आहे.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/तुषार पवार/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2284658) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Malayalam