दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 1600 आणि 140 या विशेष मालिकांच्या कार्यप्रणालीबाबत स्पष्टीकरण केले जारी

प्रविष्टि तिथि: 10 JUL 2026 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2026

 

काही वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये 1600 आणि 140 ‘सिरीजच्या कार्यप्रणालीबाबत प्रसिद्ध झालेल्या अहवालातील टिप्पण्या/ मते, यामुळे संबंधित मालिकेच्या कार्याबाबत चुकीची माहिती पसरण्याची, अथवा त्याचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील योग्य नियामक भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे:

  1. ट्रायने, अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 'बीएफएसआय' क्षेत्रातील नियामक संस्थांच्या, म्हणजेच आरबीआय, सेबी, आयआरडीएआय आणि पीएफआरडीए द्वारे नियंत्रित असलेल्या संस्थांच्या विद्यमान ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा आणि व्यवहारविषयक कॉल्ससाठी '1600xx' मालिकेतील क्रमांकांचा वापर करणे अनिवार्य केले आहे. तसेच, सरकारी संस्थांद्वारे नागरिकांशी केल्या जाणाऱ्या संवादासाठीही या क्रमांकांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. ग्राहकांना/नागरिकांना हे कॉल्स अधिक विश्वासार्ह वाटवेत, हा या महत्त्वाच्या संवादासाठी विशिष्ट सिरीजचे क्रमांक देण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन (टीसीसीसीपीआर) अंतर्गत, 1600 सिरीजच्या नंबरवरून येणाऱ्या कॉल्सना कोणत्याही प्रकारचे टॅगिंग, ब्लॉकिंग अथवा फिल्टरिंग करण्याची परवानगी नाही.
  2. ट्रायने कोणत्याही क्षेत्रातील संस्थांना प्रमोशनल (जाहिरात अथवा प्रचार) कॉल करण्यासाठी 140xx मालिकेतील क्रमांकांचा वापर करणे अनिवार्य केले आहे. प्रमोशनल कॉल करण्यासाठी 140 मालिकेतील क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या संस्थांनी टीसीसीसीपीआर चौकटी अंतर्गत दूरसंचार सेवा प्रदात्यांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे आणि नियमातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. ग्राहकांना डू नॉट डिस्टर्ब (डीएनडी) रजिस्ट्रीवर आपली पसंती नोंदवून, कोणत्याही किंवा सर्व क्षेत्रांतील संस्थांकडून 140 सिरीजच्या क्रमांकांवरून येणारे प्रमोशनल कॉल्स स्वीकारण्याचा अथवा ते ब्लॉक करण्याचा अधिकार आहे. ज्या ग्राहकाने ‘डीएनडी रजिस्ट्री’वर प्रचारात्मक कॉल करण्यापासून कोणत्याही अथवा सर्व क्षेत्रांना ब्लॉक केले आहे, त्या ग्राहकाला ब्लॉक केलेल्या क्षेत्रांमधील संस्थांकडून केले जाणारे 140 मालिकेतील कोणतेही कॉल येणार नाहीत. ग्राहक ट्राय डीएनडी  ॲपसह विविध माध्यमांद्वारे आपली डीएनडी पसंती नोंदवू शकतात. डीएनडी रजिस्ट्रीवर ब्लॉक करण्याव्यतिरिक्त, 140 सिरीजच्या क्रमांकांवरून येणाऱ्या कॉल्सना कोणत्याही प्रकारचे टॅगिंग किंवा फिल्टरिंग करण्याची परवानगी नाही, कारण अशा कोणत्याही टॅगिंगमुळे, ज्या ग्राहकाने डीएनडी रजिस्ट्रीवर एखाद्या क्षेत्राकडून असे कॉल प्राप्त करण्याची परवानगी दिली आहे, त्याची  दिशाभूल होऊ शकते.


* * *

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2283437) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Gujarati , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil