महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स महिला कार्यगटाच्या बैठकीला आज कोची येथे प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 06 JUL 2026 7:25PM by PIB Mumbai

तिरुवनंतपुरम,6 जुलै 2026

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपद 2026 अंतर्गत केरळमधील कोची येथे आजपासून ब्रिक्स महिला कार्यगट  बैठकीला प्रारंभ झाला. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच परस्पर सामायिक हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांतील वरिष्ठ सरकारी अधिकारी या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होत आहेत.

भौगोलिक अंतरामुळे आपण प्रत्यक्षात दूर असलो तरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रगती करण्याच्या आपल्या सामायिक वचनबद्धतेमुळे आपण एकमेकांशी घट्ट जोडले गेलो आहोत, असे महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी शिष्टमंडळ प्रतिनिधींचे स्वागत करताना सांगितले. या बैठकीमुळे अर्थपूर्ण चर्चा, परस्परांकडील माहितीबद्दल अध्ययन आणि ठोस सहकार्य शक्य होईल आणि महिला सक्षमीकरणासाठीच्या ब्रिक्स राष्ट्रांच्या एकत्रित वचनबद्धतेला बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा उल्लेख करुन मलिक यांनी सांगितले की महिलांच्या नेतृत्त्वाचा पैलू हा चार प्राधान्य क्षेत्रांवर आधारित असून त्यातून ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक महत्त्वाकांक्षा आणि समकालीन जागतिक आव्हानांचे प्रतिबिंब दिसून येते. महिलांच्या शासनाखाली आणि नेतृत्त्वाखाली अधिक लवचिक ब्रिक्सची उभारणी, परिवर्तनासाठी वित्तीय आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा उत्प्रेरक म्हणून समावेश, महिलांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देणे आणि हवामान बदल, अन्नसुरक्षा आणि पोषण या आव्हानांमध्ये महिलांच्या भूमिकेला अधिक सक्षम करणे यांचा यामध्ये समावेश आहे.

या प्राधान्यक्रमांमुळे गेल्या अनेक दशकांमध्ये प्रत्यक्ष कृतीसाठी एक व्यापक आराखडा प्राप्त झाला असून कोची येथे होत असलेल्या बैठकीत होणाऱ्या विचार-विनिमयालाही तेच मार्गदर्शन करत राहतील, असे त्यांनी सांगितले.  सदस्य देशांनी पूर्वतयारीच्या सल्ला-मसलतीदरम्यान दाखवलेला रचनात्मक दृष्टिकोन पुढील दोन दिवसांच्या चर्चेलाही आकार देत राहील, ज्यामुळे सहभागींना आपापल्या दृष्टिकोनांची देवाणघेवाण करता येईल, त्यांची सामायिक समज अधिक स्पष्ट करता येईल आणि बैठकीच्या निष्कर्षांवर एकमत निर्माण करता येईल, असे ते म्हणाले.

भारताच्या ब्रिक्स  अध्यक्षपदाच्या  लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता निर्माण या संकल्पनेअंतर्गत ही चर्चा आयोजित करण्यात आली असून हा विषय लोककेंद्रित आणि मानवतेला प्राधान्य देणाऱ्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. कार्यगटाच्या बैठकीनंतर 8 आणि 9 जुलै 2026 रोजी कोची येथे दोन दिवसीय मंत्रिस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
 

माधुरी पांगे/भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2281812) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam