रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत जून 2026 मध्ये भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत 4 टक्के मजबूत वाढ तर प्रवासी वाहतुकीत स्थिर वाढ नोंदवली
प्रविष्टि तिथि:
02 JUL 2026 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जुलै 2026
भारतीय रेल्वेने जून 2026 मध्ये मालवाहतूक आणि प्रवासी सेवा या दोन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण वाढ नोंदवत आपली दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. मालवाहतुकीतील वाढ, प्रवाशांची वाढती संख्या आणि प्रवासी सेवांचा सातत्याने होणारा विस्तार या गोष्टी आर्थिक विकासाला गती देण्यासाठी, लॉजिस्टिक व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशभरात सुलभ प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वे करत असलेल्या अथक प्रयत्नांचे द्योतक आहेत.
गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 136.71 दशलक्ष टनाच्या तुलनेत रेल्वेने जून 2026 मध्ये 142.21 दशलक्ष टन मालवाहतूक केली असून, यात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. मालवाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली असून, जून 2025 च्या तुलनेत सुमारे 430 कोटी रुपयांची (3 टक्के वाढ) अतिरिक्त कमाई झाली आहे.
या महिन्यात अनेक प्रमुख वस्तूंच्या वाहतुकीत मोठी वाढ पाहायला मिळाली. देशातील मुख्य क्षेत्रांमधून असलेली सातत्यपूर्ण मागणी लक्षात घेता, खतांच्या वाहतुकीत 19.1 टक्के, इतर संकीर्ण वस्तूंमध्ये 17.3 टक्के, लोहखनिजात 9.4 टक्के, देशांतर्गत कोळशात 4.9 टक्के, एकूण कोळशात 3.6 टक्के आणि क्लिंकरच्या वाहतुकीत 7.2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
जून 2026 मधील ही कामगिरी आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) झालेल्या सातत्यपूर्ण वाढीचाच पुढचा टप्पा आहे. या तिमाहीत भारतीय रेल्वेने 419.08 दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी मागील आर्थिक वर्ष 2025-26 च्या याच कालावधीतील 413.05 दशलक्ष टनांच्या तुलनेत अधिक आहे.
लांबलेल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर औष्णिक वीज केंद्रांची वाढती गरज भागवण्यासाठी भारतीय रेल्वेने देशांतर्गत कोळशाच्या वाहतुकीचा वेग वाढवला. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत जून 2026 मध्ये वीज केंद्रांना 7 टक्के अधिक कोळशाचा पुरवठा करण्यात आला, ज्यामुळे देशभरात विनाव्यत्यय वीज निर्मिती होण्यास मोठी मदत झाली.
जून 2026 दरम्यान प्रवाशांच्या संख्येतही सातत्यपूर्ण वाढ दिसून आली. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 62.37 कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता, तर यंदा हा आकडा वाढून 63.81 कोटींवर पोहोचला आहे.
* * *
सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2280348)
आगंतुक पटल : 15