गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एफसीआरए 2.0 पोर्टल आणि ई-ओसीआय कार्डचा केला शुभारंभ


एफसीआरए 2.0 पोर्टल आणि ई-ओसीआय कार्ड उपक्रमांमुळे नागरिकांना मिळेल अधिक सुविधा, ई-ओसीआय कार्डमुळे 50 लाखांहून अधिक ओसीआय कार्डधारकांचा होईल फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ या तत्त्वावर काम करत आहे

प्रविष्टि तिथि: 30 JUN 2026 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे एफसीआरए 2.0 पोर्टल आणि ई-ओसीआय कार्डचे अनावरण केले. या प्रसंगी अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज सुरू करण्यात आलेले हे दोन्ही नवीन उपक्रम नागरिकांची सुविधा वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. ते म्हणाले की आज सुरू करण्यात आलेल्या या दोन्ही उपक्रमांमुळे नागरिकांच्या सुविधा वाढतील आणि विशेषतः एफसीआरए (FCRA) पोर्टलद्वारे देणगी स्वीकारणाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होतील. त्यांनी आठवण करून दिली की 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा ते म्हणाले होते की आमचे सरकार ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ या तत्त्वावर काम करेल. शाह पुढे म्हणाले की जेव्हा हेतू स्पष्ट असतो, धोरण पारदर्शक असते आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची मानसिकता असते, तेव्हा प्रामाणिक लोकांसाठी शासनाचे सर्व प्रकार खूप सोपे होतात, गैरकृत्ये करणाऱ्यांसाठी एक कडक देखरेख यंत्रणा कार्यान्वित केली जाते आणि देशाला अधिकाधिक सुरक्षित बनवता येते.

एफसीआरए पोर्टलच्या आज झालेल्या नूतनीकरणामुळे संस्थांच्या कामकाजात मोठी सुलभता येईल. ते म्हणाले की गेल्या काही वर्षांत अर्जांची संख्या आणि देणग्यांच्या ओघात लक्षणीय वाढ झाली आहे. हे लक्षात घेता कागदपत्रांचे काम कमी करणे आणि परदेशी देणग्यांवर रिअल-टाइम प्रभावी देखरेख सुनिश्चित करणे हे देशाच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की एफसीआरए कायद्यामुळे चुकीच्या हेतूने येणाऱ्या परदेशी देणग्यांवर लक्ष ठेवता येईल. शाह म्हणाले की या नवीन प्रणालीच्या प्रारंभाने कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करण्याची प्रक्रिया संपुष्टात येईल.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की आज ई-ओसीआय कार्ड देखील सुरू करण्यात आले आहे. ते म्हणाले की ओसीआय प्रणालीमध्ये सुरुवातीला येणाऱ्या समस्या या नवीन प्रणालीमध्ये दूर करण्यात आल्या आहेत. यामुळे 50 लाखांहून अधिक ओसीआय कार्डधारकांची मोठी सोय होईल. 20 वर्षांनंतर जेव्हा नवीन पासपोर्ट जारी केला जाईल, तेव्हा ओसीआय पुस्तिका पुन्हा जारी करण्याची गरज भासणार नाही आणि कार्डधारकाचा नोंदणी क्रमांकही तसाच राहील. याशिवाय, डिजिटल ओसीआय कार्डमुळे कागदपत्रे हरवण्याची किंवा खराब होण्याची समस्या दूर होईल आणि कार्डधारक स्वतःच प्रत्यक्ष पडताळणी करू शकतील.

एफसीआरए 2.0 पोर्टल

परदेशी योगदान निधी नियमन कायदा -एफसीआरए पोर्टलच्या दुसऱ्या टप्पाचा म्हणजेच 2.0 चा विकास, या कायद्याअंतर्गत असणारी अनुपालने अधिक सुलभ करण्यासाठी तसेच देखरेख आणि अंमलबजावणी व्यवस्था अधिक भक्कम करण्याच्या हेतूने करण्यात आला आहे. यासाठी करण्याचे अर्ज, नूतनीकरण, वार्षिक विवरणपत्रे आणि इतर सेवा आता संपूर्णपणे डिजिटल करण्यात आल्या आहेत. सध्या, सुमारे 14,500 सक्रिय एफसीआरए संघटना देशभरात कार्यरत आहेत.  

अशा संघटनांसाठी, या पोर्टलमुळे कागदोपत्री कामे कमी होतील, वेळ वाचेल, आणि एक सुलभ तसेच  सर्वांसाठी उपयुक्त असा अनुभव मिळेल. यात अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याची प्रक्रिया समाविष्ट करण्यात आली असून, त्यासोबत, एकात्मिक, लॉगिन आधारीत्त डॅश बोर्ड देखील असेल. सरकारसाठी, महत्वाच्या डेटाबेससाठी  एपीआय आधारित एकात्मकरण केल्यामुळे, पडताळणी प्रक्रिया अधिक अचूक आणि जलद होऊ शकेल, अनुपालनवर देखरेख प्रक्रिया सुधारेल, आणि पावती तसेच परदेशी निधीचा वापर यावर देखरेख ठेवणेही सोपे ठरेल. त्यातून, राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रशासन दोन्ही मजबूत होईल.

ई- ओसीआय कार्ड

इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (e-OCI) कार्ड, जगभरातील भारतीय वंशाच्या समुदायासाठी ही सेवा पूर्णपणे डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा नागरिक-केंद्री उपक्रम आहे. या प्रणालीअंतर्गत अर्जदारांना अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर डिजिटल स्वरूपातील ओसीआय कार्ड डाउनलोड करणे, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता येणार आहे. सध्याच्या ओसीआय कार्डधारकांनाही बहुतांश प्रकरणांमध्ये नवीन अर्ज किंवा प्रत्यक्ष पडताळणीची आवश्यकता न पडता त्यांचे ई-ओसीआय कार्ड डिजिटल स्वरूपात मिळू शकणार आहे. नव्या व्यवस्थेनुसार, वयाच्या 20 वर्षांनंतर नवीन पारपत्र मिळाल्यास ओसीआय पुस्तिका पुन्हा जारी करण्याची  आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक वेळी नवीन पारपत्र जारी झाल्यानंतर कार्डधारकांनी त्यासंबंधीची माहिती ऑनलाइन अद्ययावत करणे आवश्यक असेल.

 

* * *

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2279509) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Kannada