उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बंगळुरू येथील नशा मुक्त भारत परिषदेला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित

प्रविष्टि तिथि: 28 JUN 2026 2:33PM by PIB Mumbai


उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज, नशा मुक्त भारताच्या उभारणीसाठी शैक्षणिक संस्था, कुटुंबे, आरोग्यसेवा व्यावसायिक, कायदा अंमलबजावणी संस्था आणि नागरी समाजाला एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. अमली पदार्थांच्या सेवनाविरूद्धचा हा लढा व्यक्तीपासून सुरू होऊन त्याचे रूपांतर एका देशव्यापी चळवळीत झाले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठाच्या 31व्या स्थापना दिन सोहळ्यादरम्यान, बंगळुरू येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर, राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (आरजीयूएचएस) अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि दिशा बोध फाउंडेशन यांच्या सहयोगाने आयोजित नशा मुक्त भारत परिषदेला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, अमली पदार्थांचे सेवन केवळ वैयक्तिक आरोग्यालाच नव्हे तर शैक्षणिक प्रगती, उत्पादकता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय विकासालाही धोका पोहोचवते.

सी. पी राधाकृष्णन यांनी बंगळुरू, कर्नाटक यांच्यासह संपूर्ण देशाला अमली पदार्थ मुक्त करण्याचा संकल्प करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थितीविषयी आनंद व्यक्त केला. 'नशा मुक्त भारत' म्हणजे केवळ अमली पदार्थ उपलब्ध न होणे नव्हे तर आरोग्यदायी पर्याय, सुजाण निर्णयक्षमता, आधार देणारी कुटुंबे आणि कणखर समाज या गोष्टींना प्रोत्साहन देणे आहे. व्यक्तीचे स्वतःच्या मनावर नियंत्रण असणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करताना, अमली पदार्थ मनावर ताबा मिळवतात तेव्हा व्यक्तीचे स्वतःच्या आयुष्यावरील नियंत्रण सुटते असे त्यांनी नमूद केले.
उपराष्ट्रपती म्हणाले की, व्यसनामुळे जीव गमावलेला प्रत्येक तरूण म्हणजे देशाच्या क्षमतेचे नुकसान असते. त्यांनी भावी डॉक्टर्स, परिचारिका, फार्मासिस्ट, मानसशास्त्रज्ञ, संशोधक आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना जनजागृतीचे दूत होण्याचे आणि अमली पदार्थांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी प्रतिबंध, उपचार, संशोधन आणि पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मिती यांमध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

***

सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2278613) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam