आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा 29 जून 2026 रोजी आरोग्य क्षेत्रासाठी 'आरोग्य सेतू 2.0' आणि इतर डिजिटल उपक्रमांचा करणार शुभारंभ



भारताची आरोग्य क्षेत्रातील 'डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा' (डीपीआय) मजबूत करण्यासाठी आयुष्मान सारथी चॅटबॉट, आयुष्मान अ‍ॅप, ई-सुश्रुत क्लिनिक,एन एच सी एक्स आणि इन्शुरन्स प्लॅन एफ एच आय आर ऑब्जेक्ट आणि आरोग्य मानके सज्ज

आरोग्य सेवा अधिक सुलभ, जोडलेली आणि कार्यक्षम बनवण्यासाठी नवीन डिजिटल उपक्रम

नागरिक-केंद्री तंत्रज्ञान आणि परस्परांशी जोडलेल्या आरोग्य नेटवर्कच्या माध्यमातून भारताच्या डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण

आरोग्य नोंदींपासून ते हेल्थ क्लेम्स: नवीन डिजिटल उपक्रम आरोग्य सेवा वितरणामध्ये घडवून आणणार मोठे परिवर्तन

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2026 11:23AM by PIB Mumbai

 

भारताच्या डिजिटल आरोग्य परिसंस्थेला बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा सोमवार, 29 जून रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आरोग्य क्षेत्रासाठी डिजिटल उपक्रमांच्या मालिकेचा शुभारंभ करतील. 'नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी' (एनएचए-राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण) आणि 'नॅशनल रिसोर्स सेंटर फॉर ईएचआर स्टँडर्ड्स' यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमांचा उद्देश आरोग्य सेवांचा विस्तार करणे, परस्परांशी जोडणी मजबूत करणे आणि देशभरात आरोग्य क्षेत्रातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा (डीपीआय) स्वीकार वेगाने वाढवणे हा आहे.

भारताला एकात्मिक आणि परस्परांशी जोडलेल्या आरोग्य परिसंस्थेकडे नेणाऱ्या या प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड ठरणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यांचे प्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी, आरोग्य क्षेत्रातील आघाडीचे नेते, तंत्रज्ञान भागीदार, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि प्रमुख भागधारक एकत्र येणार आहेत.

या अंतर्गत नागरिकांसाठी उपयुक्त ॲप्स, सेवा देणाऱ्या संस्थांसाठी उपाययोजना, विविध प्रणालींमध्ये सुसंगतपणे माहितीची देवाणघेवाण होण्यासाठी आवश्यक चौकट, नोंदणी व्यवस्था आणि माहितीची एकसमान मानके विकसित केली जाणार आहेत. यामुळे आरोग्य परिसंस्थेमध्ये सुलभता, कार्यक्षमता आणि परस्परांमधील समन्वय वाढण्याची अपेक्षा असून याचा फायदा नागरिक, आरोग्य सेवा पुरवठादार, विमा कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातील नवसंशोधक आणि धोरणकर्ते या सर्वांनाच होणार आहे.

या उपक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे 'आरोग्य सेतू 2.0' हे नागरिकांसाठी सर्वसमावेशक वैयक्तिक आरोग्य नोंदी ठेवणारे ॲप आहे. कोविड-19 महासाथीच्या काळात 'आरोग्य सेतू'ला मिळालेल्या विश्वास आणि व्यापक वापराच्या आधारावर या नव्या आवृत्तीत एकाच व्यासपीठावर अनेक डिजिटल आरोग्य सेवांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे नागरिकांना 'आभा' (आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट) तयार आणि व्यवस्थापित करता येईल, डिजिटल आरोग्य नोंदी पाहता आणि शेअर करता येतील, संमती-आधारित आरोग्य माहितीची देवाणघेवाण, एआय-आधारित आरोग्य सल्ले आणि स्मार्ट हेल्थ रिपोर्ट, वेअरेबल डिव्हाइसेसची (स्मार्ट वॉच इ.) जोडणी, 'स्कॅन आणि रजिस्टर'द्वारे ओपीडी (OPD) नोंदणी, 'स्कॅन आणि पे'द्वारे हॉस्पिटलचे पेमेंट, औषधोपचारांची आठवण (रिमाइंडर्स) आणि कुटुंबाच्या आरोग्याचे व्यवस्थापन यांसारख्या सुविधा मिळतील.

याशिवाय, हे अ‍ॅप्लिकेशन जवळच्या आरोग्य सुविधा आणि डॉक्टर, रुग्णवाहिका सेवा, रक्ताची उपलब्धता दर्शवणाऱ्या रक्तपेढ्या आणि जन औषधी केंद्रांचा शोध घेण्यासही मदत करते. तसेच, या ॲपद्वारे 'पीएम-जय' योजनेच्या विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये पीएम-जय अंतर्गत असलेली रुग्णालये शोधणे, 'एबी पीएम-जय' वॉलेट आणि आयुष्मान 'सीएपीएफ' योजनेची माहिती पाहणे, तसेच इतर आरोग्य सेवांचा सहज लाभ घेता येईल.

अद्ययावत केलेले 'आयुष्मान अ‍ॅप' देखील 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'च्या ('एबी पीएम-जय') लाभार्थ्यांसाठी एकाच व्यासपीठावर सर्व डिजिटल सेवा मंच (वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म) म्हणून काम करेल. हे अ‍ॅप लाभार्थ्यांना योजनेशी संबंधित आवश्यक सेवा मिळवून देईल; ज्यामध्ये पात्रता पडताळणी, आयुष्मान कार्ड सेवा, उपचारांचा इतिहास, रुग्णालयांचा शोध, तक्रार निवारण आणि लाभार्थी साहाय्य यांचा समावेश आहे.

दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे 'आयुष्मान सारथी' जो आयुष्मान भारत पीएम-जेएवाय च्या लाभार्थ्यांसाठी एक व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट आहे.'आयुष्मान सारथी' हे पीएम-जय योजनेच्या सेवा सहज मिळाव्यात यासाठी तयार करण्यात आलेले संवादात्मक व्यासपीठ आहे. याच्या माध्यमातून नागरिकांना योजनेशी संबंधित प्रमुख सेवा सुलभपणे मिळतील आणि त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

नागरिकांसाठीच्या ॲप्सव्यतिरिक्त, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आरोग्य सेवा, विमा दाव्यांची प्रक्रिया, सेवांमध्ये सुसंगतता आणि नवकल्पनांना चालना देणारे अनेक डिजिटल आरोग्य उपक्रम देशाला समर्पित करतील.

'नॅशनल हेल्थ क्लेम्स एक्स्चेंज' (एनएचसीएक्स) ही राष्ट्रीय आरोग्य दावे विनिमय व्यवस्था, आरोग्य विमा दाव्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आलेली डिजिटल व्यवस्था आहे. यामुळे सार्वजनिक आणि खासगी आरोग्य विमा योजनांतील रुग्णालये आणि विमा कंपन्यांमध्ये दाव्यांची माहिती एकसमान पद्धतीने आणि सहज देवाणघेवाण करता येईल.

यामुळे प्रशासकीय भार कमी होईल आणि दाव्यांची प्रक्रिया जलद आणि अधिक कार्यक्षमतेने पूर्ण होण्यास मदत होईल.

आरोग्य विमा दाव्यांच्या परिसंस्थेमध्ये परस्पर समन्वय (इंटरऑपरेबिलिटी) मजबूत करण्यासाठी, 'एनएचए' एक अशी सुविधा (युटिलिटी) सादर करणार आहे जी विमा कंपन्यांच्या विमा योजनांना प्रमाणित 'एफएचआयआर' (फास्ट हेल्थकेअर इंटरऑपरेबिलिटी रिसोर्सेस) बंडल्समध्ये (आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केलेले माहिती संच) रूपांतरित करण्यास सक्षम करेल. या सुविधेमुळे सर्व विमा कंपन्यांची विमा योजनांची माहिती एकसमान आणि अचूक पद्धतीने तयार करता येईल. त्यामुळे कामातील सुसंगतता वाढेल, मानवी श्रम कमी होतील आणि आरोग्य विमा दाव्यांची प्रक्रिया अधिक जलद व कार्यक्षम होईल.

आरोग्यसेवेची उपलब्धता अधिक मजबूत करण्यासाठी, एका खुल्या आणि आंतरकार्यक्षम संगणकीय प्रणाली द्वारे युनिफाइड हेल्थ इंटरफेस देखील राष्ट्राला समर्पित केला जात आहे. युएचआय, डिजिटल प्रणालींना एका सुलभ आंतरकार्यक्षम संगणकीय प्रणालीद्वारे नागरिकांना आरोग्यसेवा प्रदात्यांशी जोडण्यास मदत करते, ज्यामुळे आरोग्यसेवेचा शोध घेणे आणि ती मिळवणे सोपे होते.

प्रदाता स्तरावर डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास समर्थन देण्यासाठी, ई-सुश्रुत क्लिनिकचे अनावरण एक प्लग-अँड-प्ले म्हणजेच त्वरित कार्यन्वयित दवाखाना व्यवस्थापन उपाय म्हणून केले जाईल, जे आरोग्यसेवा प्रदात्यांना दवाखान्यातील दैनंदिन कार्य डिजिटल करण्यास, इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी ठेवण्यास आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या परिसंस्थेशी अखंडपणे एकीकृत जोडुन घेण्यायोग्य करते. हे व्यासपीठ आरोग्य सुविधांना डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास आणि अधिक कार्यक्षम रुग्णसेवा प्रदान करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.

संपूर्ण आरोग्यसेवा परिसंस्थेमध्ये औषधांशी संबंधित माहितीचे मानकीकरण करण्याच्या उद्देशाने ड्रग रजिस्ट्री देखील सुरू केली जाईल. डिजिटल आरोग्य ॲप्लिकेशन्सवर औषधांचे एकसमान कोडिंग सक्षम करून, ही रजिस्ट्री प्रिस्क्रिप्शन, वितरण आणि आरोग्यसेवा डेटाची देवाणघेवाण मजबूत करेल, तसेच आरोग्यसेवा प्रणालींमधील आंतरकार्यक्षमता सुधारेल.

आंतरकार्यक्षमता ही समान मानके आणि सामायिक शब्दसंग्रहांवर आधारित असते हे ओळखून, सरकार कॉमन एलओआयएनसी कोड्स फॉर इंडिया (सीएलसीआय) सुरू करणार आहे. हे एनआरसीईएस द्वारे विकसित केलेले, भारतीय आरोग्यसेवेच्या गरजांनुसार तयार केलेले आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा मानकांचे राष्ट्रीय स्तरावर संकलित केलेले उपसंच आहेत. प्रयोगशाळेतील निरीक्षणे आणि निदानासंबंधी माहितीचे प्रमाणित सादरीकरण सक्षम करून, सीएलसीआय रुग्णालये, प्रयोगशाळा आणि डिजिटल आरोग्य प्लॅटफॉर्म्समध्ये प्रयोगशाळा डेटाच्या अखंड देवाणघेवाणीला समर्थन देईल, तसेच सुसंगतता, डेटाची गुणवत्ता आणि वैद्यकीय निर्णयक्षमता सुधारेल.

या प्रयत्नांना पूरक म्हणून, एनआरसीईएस यांनीच विकसित केलेली भारत आरोग्य परिभाषा सेवा (बीएचटीएस), ही आरोग्यविषयक माहितीचा सुसंगत अर्थ लावणे आणि देवाणघेवाण सक्षम करून, डिजिटल आरोग्य प्रणालींमध्ये अर्थपूर्ण आंतरकार्यक्षमतेला समर्थन देण्यासाठी प्रमाणित आरोग्यसेवा परिभाषा, कोड प्रणाली आणि मूल्य संचांमध्ये प्रवेश प्रदान करेल.

ड्रग रजिस्ट्री, सीएलसीआय आणि बीएचटीएस भारतातील डिजिटल आरोग्यसेवेसाठी एक समान भाषा स्थापित करतील, ज्यामुळे आरोग्य सेवा प्रदाते, प्रयोगशाळा, विमा कंपन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सना आरोग्यविषयक माहितीची अखंडपणे देवाणघेवाण आणि अर्थ लावणे शक्य होईल.

या उपक्रमांमुळे, सर्व संबंधित घटकांमध्ये वाढीव आंतरकार्यक्षमता, मानकीकरण आणि आरोग्यविषयक माहितीच्या अखंड देवाणघेवाणीद्वारे भारताची आरोग्यासाठीची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. अधिक संपर्क असलेली, कार्यक्षम आणि आंतरकार्यक्षम आरोग्यसेवा वितरण प्रणाली सक्षम करून, हे उपक्रम सर्वांसाठी सुलभ, परवडणारी आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा देण्याच्या सरकारच्या दूरदृष्टीला पाठिंबा देतील.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) बद्दल

आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा उद्देश देशाच्या एकात्मिक डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांना आधार देण्यासाठी आवश्यक असलेला मुख्य सांधा तयार करणे हा आहे. एबीडीएम डिजिटल माध्यमांद्वारे आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध घटकांमधील सध्याची दरी सांधण्याचा प्रयत्न केला जातो ज्यामुळे सर्व नागरिकांसाठी सुलभ, परवडणाऱ्या आणि कार्यक्षम आरोग्यसेवा उपलब्ध होऊ शकतील.

अधिक माहितीसाठी येथे भेट द्या: https://abdm.gov.in/

***

यश राणे/ आशुतोष सावे/ राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2278435) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Telugu , Kannada