उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिन 2026 च्या सोहळ्यात उपराष्ट्रपती झाले सहभागी; एमएसएमईंसाठी प्रमुख डिजिटल उपक्रमांचा केला प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2026 2:32PM by PIB Mumbai


उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित 'आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिन 2026' च्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे केवळ एक आर्थिक वर्गीकरण नसून, ते पहिल्या पिढीतील उद्योजकांचे धैर्य, तरुणांच्या आकांक्षा, महिला उद्योजकांची जिद्द आणि आव्हानांचे संधीत रूपांतर करणाऱ्या लाखो लघु उद्योगांची चिकाटी यांचे प्रतीक आहेत. त्यांनी पुढे नमूद केले की, 'विकसित भारत @2047' च्या दिशेने होणाऱ्या भारताच्या प्रवासाला एका चैतन्यशील आणि गतिमान एमएसएमई क्षेत्राची बळकट साथ मिळेल.


गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की गुणवत्तेच्या मानकांशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यांनी नमूद केले की, खर्च कपात कधीही गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून होऊ नये.

या क्षेत्रात अधिक गतिशीलतेचे आवाहन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, प्रत्येक सूक्ष्म उद्योगाने लघु उद्योग बनण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे आणि प्रत्येक लघु उद्योगाने मध्यम उद्योगात विकसित झाले पाहिजे. हे स्थित्यंतर सुलभ करण्याच्या दृष्टीने पुरेशी गुंतवणूक, धोरणात्मक पाठिंबा आणि वित्तपुरवठ्याची सुलभ उपलब्धता यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

उपराष्ट्रपतींनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सार्वत्रिक नोंदणीस प्रोत्साहन देण्याचे आवाहन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला केले. उत्तम नोंदणीमुळे माहितीची गुणवत्ता सुधारेल आणि या क्षेत्राच्या प्रत्यक्ष गरजांवर आधारित अधिक प्रभावी धोरण तयार करणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले.

या वर्षीच्या संयुक्त राष्ट्रांच्या 'एआय-चालित भविष्यातील मानवकेंद्रित उद्योजकता' या संकल्पनेचा संदर्भ देत सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, तंत्रज्ञान  बदलाकडे धोका म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे.



या प्रसंगी उपराष्ट्रपतींनी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचा  'अ' अनुसूची कंपनीचा दर्जा मिळाल्याबद्दल सत्कार केला. त्यांनी पीएमईजीपी 2.0 पोर्टल, समाधान 2.0 पोर्टल, प्रोक्युरमेंट अँड मार्केटिंग सपोर्ट (पीएमएस) 2.0 पोर्टल, एमएसएमई ग्लोबल मार्ट 2.0 पोर्टल, टेस्टिंग सेंटर पोर्टल आणि एमएसएमई मंत्रालयाच्या बहुभाषिक सक्षमीकरण उपक्रमाचेही उद्घाटन केले. एमएसएमई आयडिया हॅकेथॉन 6.0 चेही उद्घाटन करण्यात आले. उपराष्ट्रपतींनी आत्मनिर्भर भारत (एसआरआय) निधी आणि पीएम विश्वकर्मा (पीएमव्ही) योजनेवरील ई-पुस्तकांचे प्रकाशन केले तसेच खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या  नवीन उत्पादनांचे अनावरण केले.

***

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2278413) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam