वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चेसाठी अमेरिकेचे राजदूत जेमिसन ग्रीर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भारत भेट
Posted On:
24 JUN 2026 5:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2026
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमीसन ग्रीर यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या अधिकृत शिष्टमंडळाने 22 ते 24 जून 2026 या कालावधीत नवी दिल्ली येथे भेट दिली. भारत-अमेरिके दरम्यान संतुलित आणि परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करार पुढे नेण्याच्या, तसेच 7 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनाच्या अनुषंगाने, या अंतरिम कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दिशेने, ही भेट महत्वाचा टप्पा आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेचे राजदूत ग्रीर यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार कराराबाबतच्या (बीटीए) प्रमुख घटकांचा सर्वसमावेशक आढावा घेतला. यात वाढीव बाजारपेठ प्रवेश, डिजिटल व्यापार, पुरवठा साखळीतील लवचिकता, बिगर-सीमाशुल्क अडथळे कमी करणे आणि धोरणात्मक क्षेत्रातील सहकार्य वाढवणे, याचा समावेश होता.
दोन्ही बाजूंनी अलीकडच्या काही महिन्यांत परस्परांच्या वाटाघाटी करणाऱ्या प्रतिनिधी मंडळांनी साधलेल्या यशाची नोंद घेतली, आणि सलग झालेल्या तांत्रिक आणि मंत्री-स्तरीय बैठकांमुळे या प्रक्रियेला गती मिळाल्या बद्दल समाधान व्यक्त केले. सर्वसमावेशक बीटीएच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा म्हणून अंतरिम करार पूर्ण करण्याचा मार्ग शोधण्यावर या चर्चेचा भर होता. दोन्ही बाजूंनी संतुलित, व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण आणि दोन्ही देशांमधील व्यवसाय, शेतकरी, कामगार आणि ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ देणाऱ्या कराराप्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
जागतिक व्यापाराच्या बदलत्या स्वरूपामुळे भारत-अमेरिका आर्थिक भागीदारीचे वाढते महत्त्व ओळखून, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापार वाढवणे, नवोन्मेषाला चालना देणे, तसेच लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळ्या उभारणे या सामायिक उद्दिष्टांचा पुनरुच्चार केला.
सध्या सुरू असलेल्या वाटाघाटींमुळे आर्थिक संबंध अधिक दृढ होतील आणि भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी मजबूत होईल, असा विश्वास दोन्ही बाजूंनी व्यक्त केला.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2277465)
अभ्यागत कक्ष : 52