पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला सुरक्षा आणि लैंगिक समानतेच्या मुद्यांवर तळागाळातील 17.5 लाखांहून अधिक पुरुष लोक-प्रतिनिधींमध्ये संवेदनशीलता निर्माण करणाऱ्या 'निर्भय चेतना' उपक्रमाचा शुभारंभ


निर्भया निधींतर्गत अशा प्रकारच्या पहिल्याच राष्ट्रीय उपक्रमांतर्गत 28,500 'मास्टर ट्रेनर्स'चा गट तयार केला जाणार

प्रविष्टि तिथि: 20 JUN 2026 12:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जून 2026

 

पंचायती राज मंत्रालयाने निर्भया निधी प्रकल्पांतर्गत 17 ते 19 जून 2026 या कालावधीत नवी दिल्ली येथे 'निर्भय चेतना' या विषयावर, प्रशिक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण (टीओटी) कार्यक्रम आयोजित केला होता. निर्भय चेतना ही जगातील अशा प्रकारची सर्वात मोठी मोहीम म्हणून ओळखली जात असून, महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता यासह महिलांशी संबंधित मुद्यांवर पुरुषांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणारा एक महत्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. तळागाळातील स्तरावर लिंग-प्रतिसादात्मक प्रशासन मजबूत करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात ‘ट्रान्सफॉर्म रूरल इंडिया’ द्वारे विकसित करण्यात आलेल्या निर्भय चेतना प्रशिक्षण मॉड्यूलचा शुभारंभ देखील करण्यात आला. या उपक्रमाद्वारे 'मास्टर ट्रेनर्स' (प्रशिक्षकांचा) एक गट तयार करण्याचे उद्दिष्ट असून, हे प्रशिक्षक पंचायत राज संस्थांमधील पुरुष लोकप्रतिनिधींशी, लिंगभाव समानता, महिलांची सुरक्षा, अधिकार आणि नेतृत्व या विषयांवर संवाद साधतील. प्रायोगिक तुकडीमध्ये आसाम, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील सुमारे 40 प्रमुख प्रशिक्षकांचा समावेश असून, ही तुकडी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तारित केल्या जाणाऱ्या प्रशिक्षण मॉडेलचा आधार म्हणून काम करेल.

उद्घाटन सत्राला संबोधित करताना, पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी या गोष्टीवर भर दिला की, महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि समान सहभाग सुनिश्चित केल्याशिवाय 'विकसित भारता'चे स्वप्न साकार होऊ शकत नाही. सामाजिक आणि लोकशाहीवादी परिवर्तनाच्या संस्था म्हणून, तळागाळातील लोकांच्या दृष्टिकोनात आणि वर्तनात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी सक्षम असलेल्या पंचायतींची महत्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. निर्भय चेतनाच्या उद्दिष्टावर भर देताना ते म्हणाले की, हा उपक्रम महिलांची प्रतिष्ठा, सुरक्षा आणि संधी याला विकासाचे महत्वाचे आधारस्तंभ म्हणून स्थान देऊन लिंग-संवेदनशील नेतृत्व वाढवण्याचा प्रयत्न करतो. उपस्थितांना संबोधित करताना, पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशील कुमार लोहानी यांनी महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करणे ही सामूहिक सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. लिंग-संवेदनशील प्रशासन व्यवस्था रुजवण्यामध्ये, तसेच महिला आणि मुलींसाठी अधिक सुरक्षित, पोषक वातावरण निर्माण करण्यामध्ये पंचायतींच्या महत्वाच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, 'निर्भय चेतना'चा उद्देश पुरुष लोकप्रतिनिधींमध्ये जागरूकता, संवेदनशीलता आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे हा आहे, जेणेकरून ते आपापल्या समुदायांमध्ये महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि सक्षमीकरण याला चालना देण्यासाठी पुढाकार घेऊ शकतील.

या कार्यक्रमात तज्ञांच्या मार्गदर्शनाखालील सत्रे, गट चर्चा, केस स्टडीज आणि अनुभवात्मक शिक्षणाद्वारे, लिंगभाव विषयक समस्यांचे सखोल आकलन करण्यासाठी, सामाजिक रूढीवादी विचारांना आव्हान देण्यासाठी आणि लिंग-प्रतिसादात्मक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागात्मक दृष्टिकोन स्वीकारला गेला. सकारात्मक पुरुषत्व, समुदायाचा सहभाग आणि महिलांची सुरक्षा, सन्मान आणि समावेशकता वाढवण्यासाठी पंचायतींची भूमिका या प्रमुख संकल्पनांवर चर्चा झाली.

निर्भय चेतना

11 मार्च 2026 रोजी सुरू करण्यात आलेल्या 'निर्भय रहो' उपक्रमांतर्गत, 'निर्भय चेतना' हा एक महत्त्वाचा उपक्रम असून, यात तीन पूरक घटकांचा समावेश आहे. 'निर्भय नेत्री' हा उपक्रम निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींची क्षमता बांधणी आणि त्यांच्यात कायदेशीर जागरूकता निर्माण करण्यावर भर देतो, 'निर्भय चेतना' हा उपक्रम निवडून आलेल्या पुरुष लोकप्रतिनिधींना लिंगभाव समानता आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न करतो, तर 'निर्भय दृष्टी' हा उपक्रम पंचायतींमधील तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रामीण भागातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्याची संकल्पना मांडतो. 'निर्भय चेतना' अंतर्गत, देशभरातली 17.5 लाखांहून अधिक पुरुष लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य, जिल्हा आणि गट स्तरावर 28,500 'मास्टर ट्रेनर्स'चा  गट तयार केला जात आहे.

 

* * *

आशिष सांगळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2276721) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Kannada , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam