आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकाता येथील 'रेड रोड'वर आयोजित 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले


योगामध्ये लोक,  समाज आणि राष्ट्रांना जोडण्याची विलक्षण शक्ती आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

योग, वाढत्या वयातही निरोगी, सक्रिय आणि उत्साही राहण्यास मदत करतो - पंतप्रधान

योग केवळ व्यक्तिगत कल्याणासाठीच नव्हे तर तो जागतिक शांततेचा मार्गही आहे - पंतप्रधान

योगाला केवळ एका दिवसापुरते मर्यादित ठेवू नका; त्याला दैनंदिन जीवनाचा भाग बनवा - पंतप्रधान

दार्जिलिंगपासून ते दिघा आणि कूचबिहारपर्यंतच्या लोकांनी योग उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला आहे - मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी

'योग 365, नागरिकांना योगाचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यात वर्षभर समावेश करण्यास प्रोत्साहित करते" - आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभारी) - प्रतापराव जाधव

Posted On: 21 JUN 2026 8:14AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ऐतिहासिक 'रेड रोड'वर आयोजित 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेतला. निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेवर आधारित या राष्ट्रीय कार्यक्रमाचे नेतृत्व करताना, त्यांनी हजारो सहभागींसोबत सामायिक योग पद्धतीचं अनुसरण केले. याच वेळी भारत आणि जगभरातील लाखो लोकांनीही या उत्सवात सहभाग नोंदवला. यावेळी  पश्चिम बंगालचे राज्यपाल  आर. एन. रवी, , मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी,  आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभारी)  प्रतापराव जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारत आणि जगभरातील लोकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, 21 जून हा दिवस जगातील सर्वात मोठ्या सामूहिक उत्सवांपैकी एक बनला असून इथे विविध देश आणि संस्कृतींमधील लोक योगाभ्यासासाठी एकत्र येतात. हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि बंगालपासून सौराष्ट्रापर्यंत संपूर्ण राष्ट्र योगाच्या ऊर्जेने आणि भावनेने भारलेले आहे. योगामध्ये लोक,  समाज आणि राष्ट्रांना जोडण्याची विलक्षण  शक्ती आहे आणि तो मानवी एकतेचे बंध अधिक दृढ करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पश्चिम बंगालचा समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेता, तिथे हा राष्ट्रीय उत्सव आयोजित करणे विशेष महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामी विवेकानंद, श्री अरबिंदो आणि जगापर्यंत योगाचा संदेश पोहोचवण्यात मदत करणाऱ्या इतर महान आध्यात्मिक नेत्यांचे व विचारवंतांचे योगदानाचे स्मरण करताना ते म्हणाले की, या भूमीने मन, शरीर आणि आत्मा यांच्या एकतेवर भर देणाऱ्या परंपरांचे दीर्घकाळापासून जतन केले आहे. कोलकात्यातील सामूहिक योगाभ्यास हा याच चिरंतन वारशाचे प्रतिबिंब असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची निरोगी वृद्धत्वासाठी योग ही संकल्पना विशद करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, योग हा केवळ शारीरिक व्यायाम किंवा विशिष्ट वयोगटापुरता मर्यादित नाही, तर तो जीवनाकडे पाहण्याचा एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे जो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चैतन्य, लवचिकता आणि आरोग्य यांना चालना देतो. ते म्हणाले की, योग व्यक्तींना वृद्धपकाळातही निरोगी, सक्रिय आणि उत्साही राहण्यास सक्षम करतो, तसेच शारीरिक लवचिकता, मानसिक संतुलन आणि भावनिक बळ टिकवून ठेवण्यास मदत करतो.

जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये समतोलाचे महत्त्व योग शिकवतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भगवद्गीतेतील शिकवणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले की, संतुलित सवयी, संतुलित कृती आणि संतुलित जीवनशैली हाच आरोग्याचा आणि कल्याणाचा पाया आहे. आधुनिक समाजासमोरील अनेक आव्हाने ही जीवनशैलीतील असंतुलनामुळे निर्माण होतात आणि योग हा सुसंवाद, शिस्त व आंतरिक शांततेकडे नेणारा एक व्यावहारिक मार्ग आहे, असे निरीक्षणही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

योगाच्या सर्वांगीण स्वरूपावर भर देत, मोदी म्हणाले की, त्याचे फायदे केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरते मर्यादित नसून ते मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थिरतेपर्यंत विस्तारलेले आहेत. योग आत्म-जागृती वाढवतो, तणाव कमी करतो आणि अधिक शांततापूर्ण व सामंजस्यपूर्ण समाजाच्या निर्मितीस हातभार लावतो. योग वैयक्तिक जीवन समृद्ध करतोच, शिवाय जगभरात परस्पर समंजसपणा, सहकार्य आणि शांतता वाढवण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणूनही कार्य करतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. त्याचबरोबर योग केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली. त्यांनी योग 365 उपक्रम आणि या वर्षी सुरू करण्यात आलेल्या 100 दिवसांच्या ऑनलाइन योग कार्यक्रमाचा उल्लेख केला; या कार्यक्रमात 130 देशांमधील 30 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. योगाचा व्यापक स्वीकार एका अधिक निरोगी, सशक्त आणि स्वावलंबी समाजाच्या निर्मितीस हातभार लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः (सर्वजण सुखी होवोत, सर्वजण निरोगी होवोत) या प्रार्थनेने आपल्या भाषणाचा समारोप केला.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी कोलकाता येथे पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले आणि 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यासाठी पश्चिम बंगालची निवड केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की या कार्यक्रमामुळे संपूर्ण राज्यात अभूतपूर्व उत्साह निर्माण झाला असून, दार्जिलिंगपासून दिघा आणि कूचबिहारपर्यंतच्या सर्व जिल्ह्यांतील लोकांनी योग उपक्रम आणि उत्सवांमध्ये सहभाग घेतला आहे. कोलकाता आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने नागरिक या उपक्रमात सहभागी झाले, ज्यातून जीवनशैली म्हणून योगाचा स्विकार वाढवत असल्याचं दिसून येत आहे.  

बंगालच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा विशद करताना अधिकारी यांनी स्वामी विवेकानंद आणि इतर महान विचारवंतांच्या योगदानाची आठवण करून दिली; ज्यांनी मन, शरीर आणि चारित्र्याच्या विकासासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्यांनी सांगितले की, योगाची तत्त्वे भारताच्या सभ्यतेसंबंधी परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहेत आणि ती लोकांना संतुलित व शिस्तबद्ध जीवनाकडे वाटचाल करण्यास प्रेरित करत आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सोहळा कोलकाता येथे आयोजित केल्याबद्ल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाल्याबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेतर्फे कृतज्ञता व्यक्त केली.

उपस्थितांचे स्वागत करताना, आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आरोग्य आणि कल्याणासाठी योगाची खऱ्या अर्थाने जागतिक चळवळ म्हणून प्रगती झाली आहे. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा ठराव स्वीकारल्यापासून, आता 180 हून अधिक देशांमध्ये योग साजरा केला जातो; हे योगाचे समाजातले आकर्षण आणि समकालीन समाजात त्याचे वाढते महत्त्व दाखवत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या वर्षीच्या 'निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेचा उल्लेख करत,  श्री जाधव यांनी मंत्रालयाच्या योग 365 या उपक्रमावर प्रकाश टाकला. नागरिकांनी वर्षभर योगाचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करावा, यासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली; यामध्ये मोठ्या प्रमाणावरील जनजागृतीपर कार्यक्रम, डिजिटल सहभाग मोहिम आणि नाविन्यपूर्ण योग उपक्रमांचा समावेश आहे. भारताच्या पारंपरिक वैद्यकीय पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली आयुष मंत्रालय आयुष सेवांचा विस्तार करण्यासाठी आणि देशातील आरोग्य व कल्याण परिसंस्था बळकट करण्यासाठी कार्यरत आहे.

कोलकाता येथील रेड रोड वर आयोजित या उत्सवात योग साधक, विद्यार्थी, स्वयंसेवक, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच, देशभरातील आणि जगभरातील लाखो लोकांनी योग सत्रे, सामुदायिक कार्यक्रम आणि दूरदृश्य माध्यमांतून या उपक्रमात सहभाग नोंदवला; यावरून आरोग्य आणि कल्याणासाठीची चळवळ म्हणून योगाचे व्यापक आकर्षण दिसून येते.

या उत्सवात अभूतपूर्व जनसहभाग दिसून येत असून, योग संगम पोर्टल वर नोंदणी करणाऱ्या संस्थांची संख्या सहा लाखांच्या वर गेली आहे. हा प्रचंड प्रतिसाद संस्था, समुदाय आणि नागरिकांचा योग ही खऱ्या अर्थाने 'लोकचळवळ' बनवण्याबाबतचा उत्साह दाखवत आहे. 

आंतरराष्ट्रीय योग दिन 2026  मध्ये उल्लेखनीय जागतिक सहभागही दिसून येत आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद  च्या एकत्रित प्रयत्नांतून, 210 हून अधिक भारतीय दूतावास आणि मिशन जगभरातील सुमारे 2,500 ठिकाणी योग उत्सवांचे आयोजन करत आहेत.

या उत्सवाला सांस्कृतिक स्वरुप देण्यासाठी, संस्कृती मंत्रालय,  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण  च्या सहकार्याने देशातील 100 प्रतिष्ठित स्थळांवर विशेष योग कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे आणि योग परंपरा यांना एकमेकांशी जोडले जात आहे.

***

आशिष सांगळे / राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2276138) अभ्यागत कक्ष : 45