"चित्रपट ही एकमुखी अभिव्यक्ती असलेली एक सहयोगी कला आहे": चित्रपट संकलनावरील मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 च्या कार्यशाळेत दीपा भाटिया
प्रभावी संक्रमण तंत्राच्या माध्यामातून दीर्घ कालावधीला पडद्यावर काही मिनिटांमध्ये बांधून "काळाच्या कल्पनेमध्ये बदल करणे" ही संकलकाची प्रमुख जबाबदारी : दीपा भाटिया
मुंबई, 18 जून 2026
आज 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यान आयोजित "सर्व्हायव्हिंग द कट" या कार्यशाळेत प्रख्यात चित्रपट संकलक दीपा भाटिया यांनी चित्रपट संकलनाची कला आणि कौशल्य यावर बहुमूल्य विचार मांडले. या सत्रात चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंशी संबंधित चित्रपट विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
चित्रपट हा हलत्या प्रतिमा आणि संकलन यांचा मिलाफ आहे आणि संकलनाच्या कौशल्यातून चित्रपटात मानवी स्पर्श प्रतिबिंबित झाला पाहिजे, कारण तोच खरा चित्रपट अनुभवाचा गाभा असतो, असे चित्रपट माध्यमाच्या स्वरुपाबद्दल बोलताना दिग्दर्शक आणि निर्मात्या दीपा भाटिया यांनी सांगितले.

संकलकामध्ये आवश्यक असलेल्या गुणांविषयी बोलताना त्यांनी पारख आणि निरीक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. "संकलकाकडे शॉटची पारख करण्याची क्षमता असली पाहिजे," असे त्या म्हणाल्या. संकलकाने चित्रपटाचा आशय नीट समजण्यासाठी संपूर्ण फूटेज अत्यंत काळजीपूर्वक आणि शांतपणे, जवळजवळ ध्यानस्थ अवस्थेत आणि विचलित न होता पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. दीपा भाटिया यांनी फूटेज प्रामाणिकपणे पाहणे ही संकलन प्रक्रियेतील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असल्याचे नमूद केले.
संकलकांनी चित्रपटकर्त्याचा दृष्टिकोन आणि भावनिक तीव्रता समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि संकलन टेबलवर त्या चित्रपट-प्रकल्पाविषयी एक जवळीक आणि ओढ निर्माण केली पाहिजे, असे भाटिया यांनी आवर्जून सांगितले. अशा प्रकारच्या सहभागामुळे सर्वोत्तम सर्जनशील परिणाम साध्य होतात, असे त्यांनी नमूद केले. या प्रक्रियेत सर्वोत्कृष्ट टेक ओळखणे, त्यांना सर्वात प्रभावी क्रमाने मांडणे आणि सर्वात योग्य फ्रेम्स आणि कट निवडणे यांचा समावेश असतो.
संकलनाचे वर्णन चित्रपटाची लय समजून घेण्याची कला असे करताना, दीपा भाटिया यांनी स्पष्ट केले की संकलन प्रक्रियेदरम्यान दृश्यांच्या मांडणीला आकार देण्यात शॉट्सची आंतरिक आणि बाह्य लय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
आपल्या प्रदीर्घ व्यावसायिक अनुभवाचा संदर्भ देत दीपा भाटिया यांनी त्यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांवर चर्चा केली. त्यांच्या नावावर तारे जमीन पर, माय नेम इज खान, रॉक ऑन!!, काय पो छे!, रईस, स्टुडंट ऑफ द इयर आणि सचिन: अ बिलियन ड्रीम्स यांसारखे चित्रपट आहेत. त्यांनी चित्रपटातल्या सीक्वेन्सच्या परिपक्वतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि प्रभावी संक्रमणांद्वारे दीर्घ कालावधीला पडद्यावर काही मिनिटांमध्ये बांधून "काळाच्या कल्पनेमध्ये बदल करणे" ही संकलकाची प्रमुख जबाबदारी आहे, असे स्पष्ट केले.

रॉक ऑन!! या चित्रपटाचे उदाहरण देताना त्यांनी चित्रपटाच्या संकलनाने सुरुवातीच्या प्रसंगांमध्ये एकप्रकारचा रांगडेपणा कसा राखला होता, आणि शेवटी हळूहळू त्याचे रुपांतर शांततेत कसे होत गेले, हे उलगडून सांगितले. सचिन: अ बिलियन ड्रीम्स या चित्रपटाबद्दल बोलताना, त्यांनी लंडनमध्ये दीड वर्षाहून अधिक काळ या चित्रपटाचे संकलन केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. हा माहितीपट या महान क्रिकेटपटूच्या जीवनाचे आणि कारकिर्दीचे सार टिपण्यासाठी तयार केलेल्या मॉन्ताजने सुरू होतो, असे त्यांनी नमूद केले.
माहितीपटांच्या वाढत्या लोकप्रियतेवर भाष्य करताना दीपा भाटिया यांनी ओटीटीच्या आगमनामुळे प्रेक्षकांची माहितीपटांची आवड लक्षणीयरीत्या वाढली आहे, असे सांगितले.
या माध्यमाबद्दलची आपली समज थोडक्यात मांडताना, दीपा भाटिया यांनी सिनेमाचे वर्णन "एकमुखी अभिव्यक्ती असलेली सहयोगी कला" असे केले. त्यांनी चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या सामूहिक प्रयत्नांना अधोरेखित करताना एकात्मिक सर्जनशील दृष्टिकोनाच्या महत्त्वावर भर दिला.
Click here to access the press releases and high-quality photos of daily events at MIFF.
* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2274926
| Visitor Counter:
14