शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नीट युजी फेरपरीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक


परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्ये, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानके राखण्याचे महत्त्व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले अधोरेखित

शिक्षण मंत्रालय, राज्य सरकारे, राष्ट्रीय परीक्षा संस्था आणि उच्च शिक्षण संस्थांचे वरिष्ठ अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांचा बैठकीत सहभाग

प्रविष्टि तिथि: 18 JUN 2026 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2026

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज शिक्षण मंत्रालय, राज्य सरकारे, राष्ट्रीय परीक्षा  संस्था (NTA) आणि उच्च शिक्षण संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. येत्या 21 जून 2026 रोजी होणार असलेल्या नीट युजी फेरपरीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार, उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंहदेखील उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले तसेच आवश्यक निर्देश आणि सूचनाही केल्या. परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्ये, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानके राखण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. सर्व संबंधित प्राधिकरणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. सर्व स्तरांवर योग्य समन्वय असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयाने नियुक्त केलेले अधिकारी फेरपरीक्षा प्रक्रियेशी संबंधित कामकाजात समन्वय ठेवण्यासाठी सर्व राज्यांमध्ये पोहोचतील आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखालील कमांड सेंटरला आपला अहवाल देतील असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही तणावाशिवाय या फेरपरीक्षेला सामोरे जावे यासाठी त्यांना सर्व आवश्यक सोयीसुविधा पुरवल्या जातील याची सुनिश्चिती करावी, असे निर्देश त्यांनी राज्य सरकारांच्या नियुक्त समन्वय अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनीही उपस्थितांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसताना चांगले वातावरण, आवश्यक सुविधा मिळायला हव्या.  यासाठी परीक्षेपूर्वी बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय यासह सर्व आवश्यक सुविधा त्यांना पुरवल्या गेल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारांच्या समन्वय अधिकाऱ्यांनी या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची विनंतीही त्यांनी  केली.

उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांनीही आपली मते मांडली. आतापासून ते फेरपरीक्षेच्या तारखेपर्यंतचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने आधीच योग्य ती कार्यवाही करत समन्वय साधणे, सूचना वेळेत पोहोचवणे आणि ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ही फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील जिल्हास्तरीय समन्वय समित्या, राज्य पोलीस विभाग आणि गुप्तहेर संस्थांसह सर्व संबंधित घटकांसोबत समन्वयाने काम करत असल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी या बैठकीत दिली.

या बैठकीत परीक्षेची पूर्वतयारी, समन्वय यंत्रणा, सुरक्षाविषयक नियम, वाहतूक आणि आवश्यक रसदेच्या व्यवस्थापनासाठी केलेले नियोजन, तक्रार निवारण यंत्रणा तसेच परीक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन या आणि अशा अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा केली गेली. फेरपरीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि कोणत्याही अडचणींशिवाय पार पाडण्यासाठी सर्व घटकांशी परस्परांसोबत निकट समन्वय राखावा, असा सल्लाही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला.

ही बैठक प्रत्यक्ष उपस्थिती आणि ऑनलाइन उपस्थिती अशा संमिश्र पद्धतीने पार पडली. या  बैठकीला एकूण 222 प्रतिनिधी उपस्थित होते. यात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी, केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यित संस्थांचे समन्वय अधिकारी, कुलगुरू आणि देशभरातील उच्च शिक्षण संस्थांचे  संचालक यांचा समावेश होता. या सगळ्यांनी पूर्ण सहकार्य करण्याची हमी या बैठकीत दिली. यासोबतच परीक्षेचे आयोजन सुरळीत व्हावे तसेच उमेदवारांना कोणताही त्रास न होता चांगला अनुभव मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याबद्दलची वचनबद्धताही त्यांनी व्यक्त केली.


सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2274675) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam