शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत इनोव्हेट्स 2026 चा नाईस इथे समारोप, जागतिक डीप-टेक आणि नवोन्मेष केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट

प्रविष्टि तिथि: 17 JUN 2026 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जून 2026

भारत इनोव्हेट्स 2026 चा नाईस इथे समारोप झाला. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात तंत्रज्ञान प्रदर्शन, व्यावसायिक बैठका, गुंतवणूकदारांसमोर सादरीकरणे आणि संस्थात्मक सहभागासंबंधित उपक्रमांना भारत, फ्रान्स आणि जगभरातून सहभाग लाभला.

समारोप सत्राला संबोधित करताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारत इनोव्हेट्सच्या पहिल्या आवृत्तीचे महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून वर्णन केले. तसेच, संशोधनाधारित नवोन्मेष व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात भारताच्या उच्च शिक्षण परिसंस्थेची भूमिका ठळकपणे मांडली.

भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 विषयी सांगताना, हा उपक्रम पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहे आणि भविष्यातील सहकार्यासाठी एक परिवर्तनकारी व्यासपीठ ठरू शकते, असे मंत्री म्हणाले.

स्टार्टअप्स, नवोन्मेषी, संशोधक आणि विद्यार्थ्यांना जागतिक संधींचा पाठपुरावा करण्याचे आवाहन गोयल यांनी केले. “संपूर्ण जग हे तुमचे व्यासपीठ आहे,” असे ते म्हणाले. भारत इनोव्हेट्सने नवोन्मेषाला चालना देण्यासाठी नवा अध्याय सुरू केला आहे असे सांगून जागतिक तंत्रज्ञान आणि स्टार्टअप केंद्र म्हणून भारताची वाढती भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.

भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद यांनी या शिखर परिषदेचे ठळक निष्कर्ष सादर केले. सरकार, शैक्षणिक क्षेत्र, उद्योग, गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय भागीदार हे सर्वजण एका समान उद्दिष्टासाठी एकत्र काम केल्यास व्यापक संधी निर्माण होऊ शकतात हे भारत इनोव्हेट्समुळे दिसून आले आहे, असे ते म्हणाले. शिखर परिषदेचा समारोप झाला असला तरी भारतीय नवोन्मेषाला गती देण्याची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

डीप-टेक नवोन्मेषी आणि भारतातील 15 अग्रगण्य उच्च शिक्षण संस्थांमधील सुमारे 45 तंत्रज्ञान प्रकल्प या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सहभागी स्टार्टअप्सपैकी जवळपास 60 टक्के स्टार्टअप्सची सुरुवात आयआयटी, आयआयएससी आणि तत्सम भारतीय संस्थांमध्ये झाली किंवा त्यांचा या संस्थांशी निकटचा संबंध होता.

सहभागी झालेल्या अनेक स्टार्टअप्सना फ्रान्स तसेच इतर देशांतील खरेदीदारांकडून निश्चित मागण्या आणि स्वारस्य दर्शविणारे प्रस्ताव आले आहेत. यामुळे ग्राहक मिळविणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश आणि व्यावसायिक भागीदारी यांसाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2274272) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Malayalam