युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत युवा संसद 2026 च्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची, निवडक युवा प्रतिनिधींच्या विकसित भारत @2047 च्या संकल्पना आणि दृष्टिकोनासह सुरुवात


“विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यात, भारताची युवा शक्ती सर्वात मोठी ताकद ठरते आहे” लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

“जेन झी म्हणजे ध्यास आणि उत्साह; त्यांच्या कल्पना आणि ऊर्जा राष्ट्र उभारणीसाठी वापरात आणल्या जाव्यात” केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया

प्रविष्टि तिथि: 16 JUN 2026 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2026

विकसित भारत युवा संसद 2026 च्या राष्ट्रीय स्तरावरील संवादाचे आज नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन झालं. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा, कामगार आणि रोजगार मंत्री, डॉ मनसुख मंडवीय यांच्या नेतृत्वाखळी, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्यासह, युवा व्यवहार विभागाच्या सचिव, पल्लवी जैन गोविल याही यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात देशभरातील 757 विद्यापीठे आणि संस्थांमधील युवा प्रतिनिधी सहभागी झाले असून, त्यांनी विकसित भारत@2047 साठीची दृष्टी याविषयावर, आपल्या कल्पना आणि दृष्टिकोन यावेळी मांडला.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी युवकांना, विकसित भारटाचा संकल्प प्रत्यक्षात साकार करण्यात आघाडीची भूमिका सादर करण्याचे आवाहन केले. भारताचा युवा आकांक्षी, महत्वाकांक्षा आणि मोठमोठी स्वप्ने बघणारा आहे, असे त्यांनी सांगितले. “ विकसित राष्ट्राचे भविष्य सत्यात उतरवण्यासाठी सर्वात मोठी ताकद, देशाची युवाशक्ती आहे” त्यांचा दृढविश्वास, नवोन्मेषी विचारप्रक्रिया आणि नेतृत्व क्षमता, 2047 चा भारत घडवण्यात महत्वाची ठरेल,” असे बिर्ला यावेळी म्हणाले. येत्या काही वर्षात, भारताचा युवा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष अशा क्षेत्रात जगाचे नेतृत्व करेल. आज संपूर्ण जग, भारताकडे, आशा, आत्मविश्वास आणि भविष्यातील संधी यांचे प्रतीक म्हणून बघत आहे.” असेही त्यांनी सांगितले. विकसित भारत या संकल्पाच्या एकत्रित स्वरूपाकडे लक्ष वेत, ओम बिर्ला म्हणाले, की विकसित भारताचे स्वप्न कुठल्या एका व्यक्तीची, संस्थेची अथवा सरकारची आकांक्षा नाही. “विकसित भारताचे स्वप्न, देशाचा, देशातील 140 कोटी लोकांचा सामाईक संकल्प आहे”, असे त्यांनी सांगितले. हे उद्दिष्ट 2047 पर्यंत साध्य करण्याची सर्वात मोठी जबाबदारी देशांतील युवकांची आहे, असे ते पुढे म्हणाले. “आपल्या युवाशक्तीची ऊर्जा, नवोन्मेष धाडस आणि दृढनिश्चय, हेच, हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठीची सर्वात मोठी ताकद ठरेल.”  असे त्यांनी पुढे सांगितले.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनीही सहभागी युवकांना संबोधित करत राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची परिवर्तनकारी भूमिका अधोरेखित केली.अत्यंत कठोर निवड प्रक्रियेतून यशस्वीपणे निवड होऊन या सहभागी युवकांनी आपले स्थान मिळवले आहे, असे त्यांनी प्रतिनिधींचे स्वागत करतांना सांगितले. लोकसभाध्यक्षांसमोर आपली मते मांडण्याची संधी मिळणे हे त्यांचे भाग्य असल्याचेही मांडवीय यांनी नमूद केले.

2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल,तो पर्यंत देशाला विकसित भारत म्हणून घडवण्याचा संकल्प  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आहे असे ते म्हणाले.  हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवा वर्गाने सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय ताकदीचा उल्लेखही त्यांनी केला. हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश हीच आपली ताकद आणि आपली शक्ती आहे. युवा वर्ग हे केवळ आपले भविष्य नसून तेच प्रत्येक समस्येवरचे उत्तर आहेत असे ते म्हणाले.

भारताची जवळपास 65 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. या युवा वर्गाने जर एखादा सामूहिक संकल्प केला, तर ते देशासमोरील प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधू शकतात, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

पंतप्रधानांनी भारताच्या युवा वर्गाच्या क्षमतेवर सातत्याने विश्वास दाखवला आहे, असे डॉ. मांडविया यांनी नमूद केले. यादृष्टीनेच त्यांनी आदिवासी समुदाय, किनारपट्टी भागातील तसेच ईशान्येकडील राज्यांसह विविध पार्श्वभूमीतील 1 लाख युवा नेते तयार करण्याचे आवाहन केले असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी असे 1 लाख युवा नेते तयार केले पाहिजेत, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे आणि युवा व्यवहार मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली आहे, असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. मांडविया यांनी विकसित भारत युवा नेतृत्व संवाद, बहुआयामी ग्राम कार्यक्रम, विकसित भारत अर्थसंकल्प प्रश्नमंजुषा, युवा कनेक्ट आणि अनुभवातून शिकण्याच्या कार्यक्रमांसह माय भारत उपक्रमांतर्गत युवा वर्गाच्या नेतृत्वाखालील उपक्रमांचा वाढता प्रभावही अधोरेखित केला. हे कार्यक्रम युवा वर्गाला प्रशासन, समुदाय सेवा आणि राष्ट्र उभारणीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी जेन झी च्या उत्साहाची प्रशंसाही केली. युवा वर्गाची ऊर्जा, आवड आणि विचार विकसित भारताच्या उभारणीसाठी योग्य दिशेने वळवली पाहिजे असे ते म्हणाले. देशाच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी, शिकण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी युवा संसंद सारखे मंच भावी नेत्यांना उत्तम संधी उपलब्ध करून देत आहेत असे ते म्हणाले.

लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह आणि अतिरिक्त सचिव (युवा व्यवहार) नितेश मिश्रा यांच्यासह मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली इथे दि. 15 ते 17 जून 2026 या कालावधीत विकसित भारत युवा संसद 2026 चे आयोजन केले गेले आहे. लोकशाही प्रक्रियांमधील युवा वर्गाचा सहभाग अधिक दृढ ण्यासाठी तसेच त्यांना प्रशासन, धोरणात्मक चर्चा आणि संसदीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची आखणी केली गेली आहे.

राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमाच्या निमित्ताने महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि विकसित भारत@2047 चा संकल्प साकार करण्यात योगदान देण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा प्रतिनिधींना एकत्र आणले गेले आहे.

 

शैलेश पाटील/राधिका अघोर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2273654) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Telugu , Kannada