कृषी मंत्रालय
ब्रिक्स कृषी सहकार्यासाठी इंदूर मध्ये नवीन संकल्प: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उदघाटनपर सत्राला केले मार्गदर्शन
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2026 5:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2026
इंदूर येथे आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या कृषिमंत्र्यांच्या दोन दिवसीय बैठकीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भारताची कृषिक्षेत्रातील कामगिरी, सांस्कृतिक मूल्ये आणि जागतिक सहकार्याप्रती असलेली वचनबद्धता उलगडली.

ब्रिक्स राष्ट्रांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना कृषिमंत्री म्हणाले की भारताने कायमच जागतिक ऐक्य, शांतता आणि सहकार्याचा पुरस्कार केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशाचा दृष्टिकोन शांतता हवी, युद्ध नको , सहकार्य हवे संघर्ष नको असा आहे.
जगभरातील छोटे आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, विशेषतः हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांवरील दबाव, वाढता निविष्ठा खर्च आणि कृषी बाजारातील अनिश्चितता यामुळे उद्भवलेल्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्यासाठी ही परिषद एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असे शिवराजसिंह चौहान म्हणाले. छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण आणि सक्षमीकरण सुनिश्चित करणे हे जागतिक अन्नसुरक्षा आणि शाश्वत कृषी विकास बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, लघु आणि अल्पभूधारक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाले, तर जागतिक अन्नसुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत आणि लवचिक बनेल, असेही त्यांनी नमूद केले.
भारत जगातील सर्वात मोठा अन्नसुरक्षा कार्यक्रम राबवत असून, त्याद्वारे समाजातील मोठ्या लोकसंख्येला अन्नसुरक्षा सुनिश्चित केली जात आहे. कृषी अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात शेतकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करत ते म्हणाले की ही कामगिरी शेतकऱ्यांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहण्याच्या क्षमतेबरोबरच संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित सरकारी धोरणांमुळे प्रत्यक्षात साकारली आहे.

भारताच्या एकूण मनुष्यबळापैकी सुमारे 43 टक्के मनुष्यबळ कृषी आणि संलग्न क्षेत्रांशी संबंधित आहे, ज्यामुळे हे क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सर्वात महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक बनते, असे चौहान यांनी सांगितले.

ब्रिक्स राष्ट्रांना अधिक सहकार्य करण्याचे आवाहन करत चौहान यांनी सर्व सदस्य राष्ट्रांना छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासह अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तसेच जगभरात शाश्वत कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रित कार्य करण्याचे आवाहन केले.

सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272239)
आगंतुक पटल : 12