महिला आणि बालविकास मंत्रालय
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना देत आहे मातृ आरोग्य आणि बालसंगोपनाला अधिक बळकटी
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2026 5:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2026
महिला आणि बाल विकास मंत्रालय आपल्या प्रमुख मातृत्व लाभ योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या (पीएमएमव्हीवाय) माध्यमातून मातांचे आरोग्य आणि बाल संगोपनाप्रती आपली वचनबद्धता पूर्ण करत आहे. 2017 मध्ये सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे, तसेच सकारात्मक आरोग्य वर्तनाला आणि सुधारित पोषणाला प्रोत्साहन देणे हा आहे.
1 एप्रिल 2022 पासून 'मिशन शक्ती' अंतर्गत समाविष्ट झाल्यापासून, पीएमएमव्हीवाय योजना तीन हप्त्यांवरून दोन हप्त्यांमध्ये सुव्यवस्थित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, दुसरे अपत्य मुलगी असल्यास त्यासाठीही मातृत्व लाभ दिले जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांना पहिल्या जिवंत अपत्यासाठी दोन हप्त्यांमध्ये 5,000 रुपये आणि दुसऱ्या अपत्यासाठी (जर मुलगी असेल तर) 6,000 रुपये मिळतात. हे लाभ गर्भधारणेची लवकर नोंदणी, प्रसूतिपूर्व काळजी आणि लसीकरण यासारख्या माता आणि बाल आरोग्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांशी जोडलेले आहेत.
पीएमएमव्हीवाय योजना लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये वेळेवर आणि पारदर्शकपणे आर्थिक सहाय्य पोहचविण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) यंत्रणेचा वापर करते. यामध्ये गर्भपात किंवा मृत बाळ जन्माला आल्यास नव्याने पात्रतेची तरतूद देखील आहे. यामुळे या योजनेची सर्वसमावेशकता आणखी वाढली आहे. हे आर्थिक सहाय्य अंशतः वेतन भरपाई म्हणून काम करत असल्यामुळे महिलांना प्रसूतीपूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेता येते.
पीएमएमव्हीवाय योजनेने स्थापनेपासून देशभरात मोठी व्याप्ती आणि प्रभाव दाखवला आहे:
पैसे मिळालेले एकूण लाभार्थी: 4.27 कोटी (30 एप्रिल 2026 रोजी)
एकूण वितरित रक्कम: 20,150 कोटी रुपये
लाभार्थ्यांच्या अनुभवातून या योजनेचे वास्तविक महत्त्व दिसून येते. या योजनेचा परिवर्तनात्मक प्रभाव तळाच्या स्तरावर दिसून येतो. ज्या महिलांना गरोदरपणात आर्थिक अडचणी आणि आरोग्यसेवेच्या मर्यादित उपलब्धतेचा सामना करावा लागला, त्यांना या योजनेअंतर्गत मदत मिळाली असून वेळेवर आर्थिक साहाय्य पुरवण्यात आले आहे. यामुळे त्या महिलांना कोणत्याही अतिरिक्त आर्थिक भाराशिवाय पौष्टिक आहार, नियमित प्रसूतिपूर्व तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय सेवा मिळवणे शक्य झाले आहे. योग्य काळजी आणि सततच्या देखरेखीमुळे या महिलांनी सुरक्षितपणे आरोग्य केंद्रामध्ये निरोगी बाळांना जन्म दिला. यातून सुरक्षित मातृत्व आणि मातांच्या आरोग्यात सुधारणा करण्यात या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते.
या योजनेने मातांचे आरोग्य सुधारण्यास, संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देण्यास आणि विशेषतः मुलींसाठी अतिरिक्त प्रोत्साहनांद्वारे लैंगिक समानता मजबूत करण्यास हातभार लावला आहे.
अधिक निरोगी आणि अधिक सक्षम भारताच्या संकल्पनेनुसार, प्रत्येक पात्र महिलेला योजनेचा लाभ मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी पोहोच विस्तारण्यास तसेच अंमलबजावणी यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2270825)
आगंतुक पटल : 26