ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मापनाच्या कायदेशीर नियमांनुसार खाद्यतेलांसाठी पॅकिंगचे आकार निश्चित; ग्राहक व्यवहार विभागाचा निर्णय

प्रविष्टि तिथि: 06 JUN 2026 4:04PM by PIB Mumbai


ग्राहकांना पारदर्शकपणे खरेदी करता यावी आणि व्यापारात सुलभता यावी, यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे. मापनाच्या कायदेशीर नियमांनुसार, खाद्यतेल आणि चरबीयुक्त पदार्थांचे निव्वळ वजन तसेच पॅकेटचे प्रमाणित आकार निश्चित करण्यासाठी विभागाने 29 डिसेंबर 2023 रोजी जारी केलेल्या ‘प्रमाणित कार्यपद्धतीत’ (SoP) सुधारणा केली आहे.
देशातील खाद्यतेल क्षेत्राचे जवळपास 90 टक्के प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख उद्योग संघटनांशी सखोल चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सध्या बाजारात वेगवेगळ्या आकारांच्या पाकिटात खाद्यतेल मिळते. यामुळे ग्राहकांना विविध ब्रँड्सच्या किमतींची तुलना करणे आणि योग्य निर्णय घेणे कठीण होते. ग्राहकांची हीच अडचण दूर करण्यासाठी आणि त्यांना योग्य माहिती मिळवून देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

खाद्यतेलाच्या पॅकेजिंग आणि लेबलिंग संदर्भात ग्राहकाभिमुख मोठ्या सुधारणांची घोषणा
• प्रमुख खाद्यतेले आणि मिश्रित खाद्यतेलांसाठी पॅकेटचे प्रमाणित आकार निश्चित करण्यात आले आहेत.
• यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रँड्सच्या किमतींची तुलना करणे अधिक सोपे होईल आणि आपण मोजलेल्या पैशात योग्य प्रमाणात वस्तू मिळत आहे की नाही, हे ठरवता येईल.
• पारदर्शकता वाढवण्यासाठी पॅकेटवर तेलाचे आकारमान (लिटर/मिलिलीटर) आणि त्यासोबतच त्याचे निव्वळ वजन (किलो/ग्रॅम) या दोन्ही गोष्टी नमूद करणे अनिवार्य असेल.
• हे नियम देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या तसेच परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या, अशा दोन्ही प्रकारच्या खाद्यतेलांना लागू राहतील.
• उत्पादक, पॅकर्स आणि आयातदारांना या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

पॅकेटचे प्रमाणित आकार निश्चित
सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (SoP) प्रमुख खाद्यतेले आणि मिश्रित खाद्यतेलांसाठी पॅकेटचे प्रमाणित आकार निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल, तीळ तेल, राइस ब्रान ऑइल (तांदळाच्या कोंड्याचे तेल), सरकीचे तेल आणि मक्याचे तेल यांचा समावेश आहे.

बाजारपेठेत विक्रीसाठी खालील प्रमाणित आकारांच्या पॅकेट्सनाच परवानगी असेल:
200 मिली / ग्रॅम
500 मिली / ग्रॅम
1 लिटर / किलो
2 लिटर / किलो
3 लिटर / किलो
4 लिटर / किलो
5 लिटर / किलो
15 लिटर / किलो
20 लिटर / किलो
या प्रमाणित आकारांमुळे ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रँड्सच्या किमतींची परस्परांशी तुलना करणे अधिक सोपे होईल आणि त्यांना खरेदीचा निर्णय घेता येईल.

ग्राहकांच्या निवडीचे संरक्षण
200 मिली किंवा 200 ग्रॅमपेक्षा कमी क्षमतेच्या पॅकेजेसना मानक पॅक आकारांच्या कक्षेबाहेरच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेले लहान पॅक पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहतील. तसेच, साधारण खाद्यतेलांना मानक पॅक आकाराच्या अटीतून सूट देण्यात आली आहे.

अतिरिक्त उपाययोजना आणि अंमलबजावणी
जर खाद्यतेलाचे प्रमाण लिटर किंवा मिलिलीटरमध्ये दर्शवले असेल, तर त्या पॅकेटवर त्याचे समतुल्य वजन देखील स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. ही अट 'कायदेशीर मापन नियम, 2011' नुसार पाळली जाईल. यामुळे ग्राहकांना विविध ब्रँड्सच्या उत्पादनांची तुलना करणे अधिक सोपे होईल आणि त्यांना खरेदीचा निर्णय घेता येईल.

हे नवीन नियम भारतात तयार होणाऱ्या तसेच परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या, अशा दोन्ही प्रकारच्या खाद्यतेलांना लागू असतील. नमुने घेणे, तपासणी, निव्वळ वजनाची खातरजमा करणे आणि स्वीकारार्ह त्रुटी या संदर्भातील सध्याचे नियम 'प्रमाणित कार्यपद्धती' (SoP) आणि 'कायदेशीर मापन नियम, 2011' नुसारच पुढेही नियंत्रित केले जातील. उत्पादक, पॅकर्स आणि आयातदारांना या नवीन अटींची अंमलबजावणी करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी  दिला जाईल. ज्या व्यावसायिकांना या प्रमाणित आकारात पॅकिंग करायचे असेल, ते त्वरित सुरुवात करू शकतात.

***

माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2269833) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam