गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुरातील बीएसएफच्या लंकामुरा बॉर्डर आउटपोस्टची पाहणी केली आणि सीमा सुरक्षा रक्षकांशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य उंचावले
“अमली पदार्थ, मानवी तस्करी, शस्त्रास्त्रांची तस्करी असो किंवा ड्रोनचे आव्हान, त्रिपुरा ते बंगाल आणि बिहारपर्यंतच्या सीमाभागात बीएसएफ प्रत्येक आव्हानाचा यशस्वीपणे सामना करत आहे” – गृहमंत्री
“पॅरिस करारातील सर्व बाबींची पूर्तता नियोजित वेळेआधीच करून, भारत पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात जागतिक आदर्श ठरला आहे; मोदी सरकारने ऋग्वेदातील संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे” अमित शाह
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2026 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2026
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुरातील बीएसएफच्या लंकामुरा बॉर्डर आउटपोस्टची पाहणी केली आणि सीमा सुरक्षा रक्षकांशी संवाद साधून जवानांचे मनोधैर्य वाढवले. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, वृक्षारोपण मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्रिपुराची राजधानी आगरतला इथे आगर वूडचे रोप लावले. त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अमित शाह यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि या दिशेने मोदी सरकारने केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. ओझोनच्या थरामुळे सूर्याची किरणे सर्व सजीवांसाठी उपयुक्त होतात. ओझोन थराच्या ऱ्हासाच्या आव्हानाचा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे झाडांची संख्या वाढवणे हा आहे असे शाह यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे, ही सीमा सुरक्षा दलाची (बीएएसएफ) जबाबदारी आहे. या विस्तीर्ण सीमांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने आहेत, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दल तैनात असलेल्या सर्व ठिकाणी 'स्मार्ट बॉर्डर्स' (स्मार्ट सीमा) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. चतुष्कोनीय सुरक्षा धोरणांतर्गत, स्थानिक प्रशासन, तंत्रज्ञान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे समर्पण, यांच्यात समन्वय साधून सीमा अभेद्य बनवणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे गृहमंत्री म्हणाले. 'स्मार्ट बॉर्डर्स'ची संकल्पना अंतिम टप्प्यात असून लवकरच एक प्रायोगिक तत्ववारील प्रकल्प सुरू केला जाईल, अशी महिती त्यांनी दिली. देशातील विविध सीमांवरील सात किंवा आठ ठिकाणी एकाच वेळी हा प्रायोगिक प्रकल्प राबवला जाईल. प्रायोगिक प्रकल्पात प्रारंभिक टप्प्यावर येणा-या कोणत्याही आव्हानांचे निराकरण केले जाईल, आणि त्यानंतर संपूर्ण सीमा नेटवर्कचा समावेश करण्यासाठी या उपक्रमाचा विस्तार केला जाईल, असेही गृहमंत्री म्हणाले . जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, गावचे तलाठी आणि सरपंच हे देखील या प्रयोगात महत्त्वाची भूमिका बजावतील. जोपर्यंत सीमावर्ती भागातील स्थानिक प्रशासन या संकल्पनेशी जोडले जाणार नाही, तोपर्यंत सीमा खऱ्या अर्थाने अभेद्य बनवल्या जाऊ शकत नाहीत, यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, केवळ सीमा सुरक्षेची स्वतंत्रपणे कल्पना करणे कधीही यशस्वी ठरणार नाही.

देशाच्या सीमांच्या सुरक्षेसाठी त्रिपुरा फ्रंटियर अत्यंत महत्त्वाचे आहे, असे अधोरेखित करत, ते म्हणाले की, सीमेवरील कुंपणाच्या आधुनिकीकरणासाठी, 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या सुमारे 650 किलोमीटर लांबीच्या कुंपणाचा काही भाग बदलण्यासाठी, 119 किलोमीटरचे नवीन कुंपण बसवायला सरकारने मंजुरी दिली आहे. सीमावर्ती भागातील चौक्यांवरील कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेले, वीजपुरवठा, हरित ऊर्जा उपक्रम आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, यासारखे अनेक प्रकल्प केवळ सुरूच करण्यात आले नाहीत, तर ते पूर्ण देखील झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, त्रिपुरा हे तीन बाजूंनी सीमांनी वेढलेले एक संवेदनशील राज्य आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला पूर्ण विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. ते म्हणाले की हे ध्येय साध्य करण्यासाठी भारताला सर्वप्रथम सुरक्षित केले पाहिजे. देशाला तस्करी, मानवी तस्करी आणि तरुणांवर परिणाम करणारे अमली पदार्थ यापासून सुरक्षित ठेवले पाहिजे.

भारत सरकारने सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करणारे एक स्मार्ट सुरक्षा जाळे उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे . सीमेवरील कुंपणाची संपूर्ण संकल्पना आणि आपली कार्यसंस्कृती यात परिवर्तन करण्याची गरज आहे. आपल्या समाजाला ग्रासणाऱ्या प्रत्येक संकटापासून देशाचे आणि त्याच्या सीमांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी असेल असे ते म्हणाले.
गृहमंत्री पुढे म्हणाले की, येत्या काळात सीमा सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या कार्यसंस्कृतीमध्ये स्मार्ट फेन्सिंग आणि चतुर्भुज सुरक्षा जाळ्याची संकल्पना समाविष्ट केली जात आहे.

* * *
राधिका अघोर/सुषमा काणे/पर्णिका हेदवकर/राजश्री आगाशे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2269486)
आगंतुक पटल : 11