नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिसेंबर 2026 पर्यंत 75 लाख घरांच्या छपरावर सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट : केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी

प्रविष्टि तिथि: 04 JUN 2026 7:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2026

 

पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेने अवघ्या 2 वर्षांत 40 लाख लाभार्थी कुटुंबांचा टप्पा पार केला आहे आणि मला आशा आहे की, डिसेंबर 2026 च्या अखेरपर्यंत आम्ही 75 लाख कुटुंबांचा टप्पा ओलांडू; असे केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. नवी दिल्ली इथे आज आयोजित ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची दोन वर्षे: 1 कोटी घरांच्या छपरांवर सौर तबकड्यांचा विस्तार’ या कार्यक्रमांतर्गत पार पडलेल्या एका विशेष संवादसत्रात (फायरसाइड चॅट) ते बोलत होते. 

युटिलिटी-लिंक्ड अ‍ॅग्रिगेशन (यूएलए) मॉडेल हा सामूहिक सौर अंमलबजावणी नमुना, योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी, विशेषतः दुर्गम आणि सुविधांपासून वंचित कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी विकसित करण्यात आले आहे, असे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. या मॉडेलअंतर्गत विविध राज्यांमध्ये सुमारे 30 लाख छपरांवर सौरऊर्जा प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले असून, त्यांची जलद अंमलबजावणी आणि सौरऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात वीज वितरण कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मंत्री जोशी यांनी पुढे नमूद केले की, या उपक्रमाचा विशेष लाभ 1 ते 3 किलोवॅट वीज वापरणाऱ्या कुटुंबांना होणार आहे. त्यामुळे परवडणारी, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

भारताची सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढ अत्यंत वेगाने होत आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. त्यांनी ठळकपणे नमूद केले की, देशाला प्रारंभी  50 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्यासाठी 96 महिने लागले. त्यानंतर मात्र 50 गिगावॅट वाढवण्यासाठी केवळ 36 महिने लागले, तर 100 गिगावॅटवरून 150 गिगावॅटपर्यंतची वाढ अवघ्या 14 महिन्यांत साध्य झाली. पुढे बोलताना, त्यांनी सांगितले की, पीएम सूर्यघर : मोफत वीज योजना सुरू झाल्यापासून मे 2026 हा सर्वाधिक यशस्वी महिना ठरला आहे. या कालावधीत एकाच महिन्यात विक्रमी 3.16 लाख छपरांवर  सौरऊर्जा प्रकल्पांची स्थापना करण्यात आली, तर एका दिवसात तब्बल 15 हजार कुटुंबे या योजनेत सहभागी झाली.

प्रल्हाद जोशी म्हणाले की, पश्चिम आशियातील संकटासारख्या भू-राजकीय घडामोडींमुळे जग ऊर्जा क्षेत्रातील अनिश्चिततेचा सामना करत असताना, पीएम सूर्यघर : मोफत वीज योजनेसारखे उपक्रम भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट करत आहेत आणि भारताची धोरणात्मक लवचिकता वाढत आहे. ते म्हणाले की, पीएम सूर्यघर : मोफत वीज योजना सुरू होण्यापूर्वी दरमहा सुमारे 7,000 छपरांवर सौरऊर्जा प्रकल्पांची स्थापना होत होती; मात्र आता हा आकडा वाढून प्रतिमहा 3 लाखांहून अधिक झाला आहे. तसेच, 17 लाखांपेक्षा जास्त कुटुंबांचे वीज बिल शून्यावर आले आहे. हे या योजनेमुळे नागरिकांना होत असलेल्या थेट आर्थिक लाभाचे आणि बचतीचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2269047) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Kannada