युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑनलाइन क्विझमधील एका आठवड्यातील सर्वाधिक सहभागासाठी माय भारतला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रमाणपत्र प्रदान

प्रविष्टि तिथि: 04 JUN 2026 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2026

 

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या, युवा व्यवहार विभागाचा प्रमुख युवा सहभाग मंच असलेल्या 'मेरा युवा भारत' (माय भारत) ला अधिकृत मूल्यमापन कालावधीत 3,90,812 सहभागींनी संपूर्ण प्रश्नमंजुषा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, “एका आठवड्यात ऑनलाइन प्रश्नमंजुषा पूर्ण करणारे सर्वाधिक वापरकर्ते” या श्रेणीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स किताब प्रदान करण्यात आला.

आज नवी दिल्लीतील श्रम शक्ती भवन येथे आयोजित एका समारंभात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे परीक्षक ऋषीनाथ यांच्या हस्ते 'माय भारत'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया, युवक व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, युवक व्यवहार विभागाच्या सचिव डॉ. पल्लवी जैन गोविल, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि युवा सहभागी उपस्थित होते.

'विकसित भारत@2047' च्या संकल्पनेबद्दल तरुण नागरिकांमध्ये जागरूकता आणि सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (व्हीबीवाय एल डी) क्विझ' या देशव्यापी युवा सहभाग उपक्रमासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला. 'माय भारत' पोर्टलद्वारे आयोजित या उपक्रमात सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधील 50.42 लाखांहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला, ज्यामुळे हा देशातील सर्वात मोठ्या डिजिटल युवा सहभाग उपक्रमांपैकी एक ठरला आहे.

मंत्र्यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'माय भारत' आणि संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, हे पोर्टल भारतातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करत आहे, ज्यांचे देशाच्या 35 वर्षांखालील लोकसंख्येत जवळपास 65% इतके प्रमाण आहे.

मंत्र्यांनी या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डबद्दल भारतातील तरुणांचे अभिनंदन केले आणि सांगितले की हा सन्मान  खऱ्या अर्थाने त्यांचाच  आहे आणि 'विकसित भारत'च्या दिशेने होणाऱ्या प्रवासावर त्यांनी ठेवलेल्या विश्वासाचे हे प्रतीक आहे.

ते पुढे म्हणाले की, 'माय भारत' पोर्टल हे केवळ एक डिजिटल व्यासपीठ नाही, तर एक विश्वासार्ह आणि सक्षमीकरण करणारे व्यासपीठ आहे, जिथे तरुण अर्थपूर्ण सहभाग नोंदवू शकतात, आपले विचार मांडू शकतात आणि 2047 पर्यंत 'विकसित भारत' साध्य करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनामध्ये योगदान देऊ शकतात.

 

* * *

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2268930) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Gujarati , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu , Kannada , Malayalam