वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जगातले सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक स्थान म्हणून भारताचा उदय: सिटी इंडिया कॉन्फरन्स 2026 मध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

प्रविष्टि तिथि: 04 JUN 2026 2:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2026

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतल्या 'सिटी इंडिया कॉन्फरन्स 2026' मध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे बीजभाषण केले. यात त्यांनी भारत जगातील सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक ठिकाण म्हणून उदयाला आल्याचे अधोरेखित केले. तसेच उत्पादन, व्यवसाय सुलभता, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि जागतिक व्यापार सहभाग बळकट करण्यासाठी सरकार करत असलेल्या निरंतर प्रयत्नांची रूपरेषा मांडली.

भारताची जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळख निर्माण झाली आहे, असे जागतिक गुंतवणूकदार आणि व्यावसायिक नेत्यांना संबोधित करताना गोयल म्हणाले. भविष्यात दोन दशकांहून अधिक काळ भारत हे स्थान टिकवून ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  भारताने बदलत्या भू-राजकीय आणि आर्थिक परिस्थितीला अनुरूप अशा प्रक्रिया आणि व्यावसायिक धोरणांची पुनर्रचना करून संकटांचे सातत्याने संधीत रूपांतर केले आहे, असे त्यांनी नमूद केले. यासोबतच व्यापार, व्यवसाय, उत्पादन आणि गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण म्हणून भारताने आपले स्थान कायम राखले आहे, असेही त्यांनी सांगितले.

कॅनडा आणि अमेरिकेतल्या गुंतवणूकदार आणि व्यावसायिक नेत्यांसोबत आपल्या नुकत्याच झालेल्या संवादातून भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दलचा मजबूत जागतिक विश्वास दिसून आला, असे गोयल यांनी सांगितले. भारतातून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळासह कॅनडाला दिलेल्या भेटीचा संदर्भ देत त्यांनी प्रस्तावित भारत-कॅनडा मुक्त व्यापार कराराला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि निवृत्ती वेतन निधी, विमा कंपन्या आणि इतर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात रस दाखवल्याचे नमूद केले. न्यूयॉर्कमधील आघाडीच्या गुंतवणूक संस्था आणि सुमारे 50 कंपन्यांसोबत झालेल्या चर्चेमुळे भारताविषयीचा दृष्टिकोन अधिक मजबूत झाला आहे, असे त्यांनी सांगितले. लोकशाही, कायद्याचे राज्य, निर्णायक नेतृत्व, तांत्रिक क्षमता आणि 1.4 अब्ज लोकांची विशाल ग्राहक बाजारपेठ यांच्या पाठिंब्यामुळे भारत हा एकमेव विश्वासार्ह पर्यायी उत्पादन केंद्र, एक विश्वासू भागीदार आणि सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोयल यांनी असे निरीक्षण नोंदवले की, दीर्घकालीन जागतिक भांडवल भारताकडे अधिकाधिक वळत आहे. न्यूयॉर्क आणि टोरोंटो येथील प्रमुख गुंतवणूकदारांशी झालेल्या संवादाचा संदर्भ देत ते म्हणाले की, प्रत्येक चर्चेने भविष्यातील भारताच्या विकासाच्या वाटचालीवरील विश्वास अधिक दृढ केला. त्यांनी असेही मत व्यक्त केले की, भारतात गुंतवणूक करावी की नाही, हा गुंतवणूकदारांसाठी प्रश्न नाही तर ते भारताची विकास गाथा  किती लवकर ओळखतात आणि त्यात सहभागी होतात, हा मुख्य प्रश्न आहे.

भारताच्या विकासयात्रेत सहभागी होण्यासाठी जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रित करताना गोयल यांनी अधोरेखित केले  की भारत केवळ एक मोठी आणि वाढणारी बाजारपेठ नसून नवोन्मेष, आरेखन आणि प्रगत उत्पादनाचे केंद्रदेखील आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना भारताच्या नवीन तंत्रज्ञान आणि भविष्यकालीन उद्योगांकडे होणाऱ्या संक्रमणाला पाठिंबा देण्यासाठी संयमी आणि दीर्घकालीन भांडवल आणण्याचे आवाहन केले.

मंत्र्यांनी उपस्थितांना माहिती दिली की, ओमानसोबतचा मुक्त व्यापार करार 1 जून रोजी अंमलात आला आहे आणि पुढील सहा महिन्यांत किमान दोन ते तीन अतिरिक्त महत्त्वपूर्ण मुक्त व्यापार करार अंमलात येण्याची अपेक्षा आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भारत येत्या वर्षात आणखी तीन ते चार महत्त्वपूर्ण व्यापार करार करण्याची शक्यता आहे आणि नुकतेच झालेले सर्व नऊ करार पुढील नऊ ते दहा महिन्यांत कार्यान्वित होतील.

गोयल यांनी सांगितले की, भारत एक सुरक्षित परिसंस्था प्रदान करतो, जिथे बौद्धिक संपदेचे संरक्षण केले जाते, तंत्रज्ञान सुरक्षित राहते आणि डेटाची गोपनीयता जपली जाते. त्यांनी पुढे सांगितले की, जागतिक बाजारपेठांना सेवा देणाऱ्या डेटा सेंटर्सना 2047 पर्यंत प्राप्तिकर सवलतीचा लाभ मिळेल. 'विकसित भारत 2047' या संकल्पनेअंतर्गत, 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला एक विकसित देश बनण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.

 

* * *

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2268830) आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam