वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कलम 301 नुसार कार्यवाही आणि कराराचा आराखडा अंतिम करण्यासाठी भारत -अमेरिका चर्चा सुरु

प्रविष्टि तिथि: 03 JUN 2026 3:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2026

अमेरिकेचे वस्तू आयात रोखण्याच्या धोरणांविरोधात भारतासह 60 देशांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी ‘युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह’ने (USTR) पूर्ण केली आहे. या चौकशीअंती, अमेरिकी व्यापार कायदा ('यू.एस. ट्रेड अ‍ॅक्ट) 1974 च्या 'कलम 301' अंतर्गत या 60 देशांमधून येणाऱ्या आयातीवर अतिरिक्त सीमाशुल्क (टॅरिफ) लावण्याचा प्रस्ताव USTR ने ठेवला आहे. मात्र, 'कलम 232' अंतर्गत आधीच शुल्क लागू असलेल्या उत्पादनांना आणि इतर काही ठराविक वस्तूंना या नव्या प्रस्तावातून वगळण्यात आले आहे. याशिवाय, वस्त्रोद्योग आणि कपड्यांच्या उत्पादनांसाठी एक विशेष सवलत योजनाही प्रस्तावित करण्यात आली आहे; ज्या अंतर्गत अमेरिकेत निवडक देशांमधून ठराविक मर्यादेपर्यंत होणारी आयात,  कमी शुल्कात केली जाऊ शकेल.

अहवालानुसार, हे प्रस्तावित शुल्क अद्याप अंतिम झालेले नाही आणि हितसंबंधी घटकांना जाहीर सुनावणीत सहभागी होण्यासाठी 22 जून 2026 पर्यंत अर्ज सादर करता येतील. तसेच, यावर आपले लेखी आक्षेप किंवा मते 6 जुलै 2026 पर्यंत नोंदवता येतील. यासंदर्भातील जाहीर सुनावण्या 7 जुलै 2026 रोजी घेतल्या जातील. या प्रस्तावित उपाययोजनांवर कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, प्राप्त झालेली मते आणि सुनावणीदरम्यान दिलेली साक्ष यांचा USTR कडून विचार केला जाईल.

'कलम 301' च्या या कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून भारत या मुद्द्यावर अमेरिकेसोबत सातत्याने चर्चा करत आहे. यासोबतच, 2 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केल्याप्रमाणे आणि 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या संयुक्त पत्रकानुसार, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करार आराखड्याला अंतिम रूप देण्यासाठी भारत समांतरपणे अमेरिकेसोबत वाटाघाटी करत आहे.

राधिका अघोर/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2268362) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam