माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्ह्ज ओटीटीने ओलांडला 1 कोटी वापरकर्त्यांचा टप्पा, भारताच्या सार्वजनिक सेवा डिजिटल मीडिया परिसंस्थेला मिळाली बळकटी
24,000 टायटल्स आणि 140 लाईव्ह चॅनेल्सच्या मोफत प्रवेशामुळे वेव्ह्ज ओटीटी बनला भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण सार्वजनिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म
Posted On:
02 JUN 2026 7:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2026
प्रसार भारतीचा डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वेव्ह्ज ओटीटीने नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झाल्यानंतर दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 1 कोटी (10 दशलक्ष) नोंदणीकृत वापरकर्त्यांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.
हे यश भारताच्या सार्वजनिक डिजिटल मीडिया परिसंस्थेच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि भारत तसेच जगभरातील प्रेक्षकांना विश्वासार्ह, सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण आशय देणाऱ्या स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वाढता स्वीकार दर्शवते.

आज, वेव्ह्ज ओटीटीवर मनोरंजन, बातम्या, शिक्षण, संस्कृती, अध्यात्म आणि सार्वजनिक सेवा यांसारख्या विविध प्रकारांमधील 24,000 हून अधिक कंटेंट टायटल्स आणि 15,000 तासांहून अधिक कंटेंट उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर 140 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, 200 हून अधिक रेडिओ सेवा, लाईव्ह इव्हेंट स्ट्रीमिंग, पीएम ई-विद्या चॅनेल्सद्वारे शैक्षणिक कंटेंट, योजना, कुरुक्षेत्र आणि रोजगार समाचारच्या डिजिटल आवृत्त्या, प्रमुख मंदिरांमधून भक्तीपर स्ट्रीमिंग आणि प्रसार भारतीकडील हजारो तासांचा संग्रहित कंटेंट उपलब्ध आहे.
मोबाईल, वेब आणि कनेक्टेड टीव्ही उपकरणांवर उपलब्ध असलेले वेव्हज ओटीटी आता 130 हून अधिक देशांतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहे, जे अनेक भारतीय भाषांमध्ये आशय सादर करते आणि विविध प्रकारच्या जनहितार्थ व मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी विनामूल्य प्रवेश प्रदान करते.
या महत्त्वपूर्ण टप्प्यावर भाष्य करताना प्रसार भारतीने म्हटले आहे की, हे यश डिजिटल युगातील डिजिटल सार्वजनिक सेवा माध्यमांचे वाढते महत्त्व दर्शवते तसेच दूरचित्रवाणी, आकाशवाणी, ऑन-डिमांड कंटेंट, शिक्षण, संस्कृती आणि वारसा यासाठी एकच मंच निर्माण करण्याच्या दूरदृष्टीची पुष्टी करते.
आशयाच्या उपलब्धतेचा सतत विस्तार, धोरणात्मक डिजिटल भागीदारी, विविध उपकरणांवर उपलब्धता आणि उत्तम वापरकर्ता अनुभव यांमुळे या प्लॅटफॉर्मने सातत्याने वाढ नोंदवली आहे. भक्तीपर लाईव्ह स्ट्रीम्स, शैक्षणिक आशय, डिजिटल प्रकाशने, संग्रहित साहित्य आणि लाईव्ह कार्यक्रमांचे प्रक्षेपण यांसारख्या अलीकडील नवीन समावेशांमुळे प्रेक्षकांचा सहभाग अधिकच वाढला आहे.
1 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आणि 1.4 कोटींहून अधिक डाउनलोड्ससह, वेव्ह्ज ओटीटी आता विकासाच्या पुढील टप्प्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यामध्ये आशय भागीदारीचा विस्तार, विविध उपकरणे आणि मंचांवर व्यापक वितरण, प्रादेशिक आणि शैक्षणिक आशयाची उपलब्धता अधिक मजबूत करणे तसेच मार्च 2027 पर्यंत 2 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचे लक्ष्य गाठणे यांचा समावेश आहे.
या कामगिरीमुळे भारतातील सर्वात वेगाने वाढणारा सार्वजनिक सेवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि भारताची संस्कृती, ज्ञान, वारसा व सर्जनशीलतेचे डिजिटल प्रदर्शन म्हणून असलेले वेव्ह्ज ओटीटीचे स्थान अधिक मजबूत होते.
* * *
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2268120)
अभ्यागत कक्ष : 22