वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कॅनडा-भारत संयुक्त निवेदन 2026 - व्यापार आणि गुंतवणूक मंच

Posted On: 29 MAY 2026 9:00AM by PIB Mumbai

भारत आणि कॅनडामध्ये व्यवसायांसाठी अधिक व्यावसायिक संधी आणि आर्थिक वाढीला साहाय्यभूत ठरणाऱ्या ठोस परिणामांसाठी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि कॅनडाचे मंत्री मणिंदर सिद्धू यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक बळकट करण्याच्या आपल्या सामायिक कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

अलीकडील मंत्रीस्तरीय संवादातून निर्माण झालेल्या सकारात्मक गतीला पुढे नेत, कॅनडाचे मंत्री सिद्धू यांनी केंद्रीय मंत्री गोयल तसेच जगातील कोणत्याही देशात भारताने पाठवलेल्या सर्वात मोठ्या प्रतिनिधीमंडळाचे स्वागत केले. तसेच स्वच्छ ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, कृषी-अन्न प्रक्रिया, प्रगत वस्तुनिर्माण, डिजिटल तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास यांसारख्या परस्परपूरक क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्याच्या संधींवर त्यांनी भर दिला.  

दोन्ही मंत्र्यांनी महत्त्वाकांक्षी आणि परस्पर फायदेशीर, सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराबाबतच्या (सेपा) प्रगतीसाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत वाटाघाटी पूर्ण करण्याचे आपले सामायिक उद्दिष्ट असल्याचे अधोरेखित केले. बाजारातील प्रवेश विस्तार, लवचिक पुरवठा साखळ्यांना बळ देणे आणि दुहेरी आर्थिक विकासाला चालना देणे यांमध्ये सेपाचे असलेले महत्त्व त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

दोन्ही नेत्यांच्या हस्ते, कॅनडा आणि भारत दोन्हीकडील उद्योग धुरिणांना एकत्र आणणाऱ्या, नवीन व्यावसायिक भागीदारी आणि वाढीव व्यावसायिक गतिविधींना चालना देणाऱ्या कॅनडा-भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचचा प्रारंभ झाला. 

दोन्ही मंत्र्यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या महत्त्वावर भर दिला. यामध्ये लोकांमधील परस्पर संबंध, व्यावसायिक गतिशीलता आणि थेट व्यावसायिक संपर्क यांचा समावेश असून, व्यापार व गुंतवणुकीच्या विस्तारासाठी हे अत्यावश्यक सक्षम घटक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या वर्षाच्या उत्तरार्धात कॅनडाचे व्यापार पथक भारतभेटीवर येणार असल्याची पुष्टी मणिंदर सिद्धू यांनी केली. यातून भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढविण्याबाबत कॅनडातील उद्योग-व्यवसायांचा मोठा उत्साह आणि व्यावसायिक भागीदारी अधिक दृढ करण्याची सामायिक महत्त्वाकांक्षा दिसून येते. 

कॅनडा आणि भारत दोन्ही देशांनी, प्राधान्य क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन व उच्च-गुणवत्तेच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे सुरू ठेवण्यावर तसेच दोन्ही देशांतील व्यवसाय, नवोन्मेषक  आणि संस्थात्मक भागीदार यांच्यात अधिक दृढ सहयोगाला पाठबळ देण्याबाबत सहमती दर्शवली. दोन्ही मंत्र्यांनी नियमित संवाद कायम ठेवण्याची आणि आगामी महिन्यांत ठोस परिणाम साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.

***

NitinFulluke / SonaliKakade / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2266509) अभ्यागत कक्ष : 35