केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोक सेवा आयोगाने नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2026 साठी तात्पुरती उत्तरतालिका केली प्रसिद्ध

Posted On: 27 MAY 2026 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मे 2026

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) प्रथमच नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2026 साठी तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध केली आहे.

या परीक्षांना बसलेले उमेदवारांना काही आक्षेप असल्यास ते आपल्या हरकती 31 मे 2026 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत  upsconline.nic.in वर उपलब्ध असलेल्या “ऑनलाइन क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल (QPRep)” या विशेष ऑनलाइन पोर्टलद्वारे सादर करू शकतात. आक्षेप सादर करताना, उमेदवाराने आपल्या आकलनानुसार योग्य उत्तरतालिका त्यासोबत संक्षिप्त स्पष्टीकरण आणि तीन विश्वसनीय स्रोतांकडून मिळालेली पूरक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

उमेदवारांकडून प्राप्त झालेले सर्व आक्षेप सखोल आणि बारकाईने पुनरावलोकनासाठी विषय तज्ञांच्या चमूसमोर ठेवले जातील. संबंधित क्षेत्राचे ज्ञान आणि विषयातील प्राविण्य असलेले हे तज्ञ, प्रत्येक आक्षेपाची काळजीपूर्वक तपासणी करतील, पूरक कागदपत्रांचे मूल्यांकन करतील आणि संबंधित प्रश्नांच्या उत्तरतालिकेच्या अचूकतेबद्दल आपले मत नोंदवतील. मात्र, आयोगाच्या प्रचलित प्रथेनुसार, अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाईल.

नुकत्याच घेण्यात आलेल्या नागरी सेवा (पूर्व) परीक्षेसाठी, प्रश्न प्रमाणित आणि विश्वसनीय स्रोतांवर आधारित आहेत. यावर्षी, नागरी सेवेतील 933 पदांसाठी आणि भारतीय वन सेवेतील 80 पदांसाठी घेण्यात आलेल्या नागरी सेवा (पूर्व) परीक्षेला सुमारे 5.49 लाख उमेदवार बसले होते.

ही परीक्षा 24 मे 2026 रोजी दोन अनिवार्य सत्रांमध्ये घेण्यात आली.

तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध करण्याचा निर्णय हा परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटी राखण्याची, तसेच उमेदवारांना माहितीपूर्ण आणि रचनात्मक सहभागाची संधी देण्याच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे आयोगाने म्हटले आहे. 

निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2266033) अभ्यागत कक्ष : 18