ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने खाद्यतेलांच्या विविध आकाराच्या पॅकबाबत भागधारकांची बैठक आयोजित केली
प्रमुख खाद्यतेलांसाठी प्रमाणित आकाराच्या पॅकची सुरुवात करण्याबाबत उद्योग संघटनांमध्ये एकमत
Posted On:
25 MAY 2026 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,25 मे 2026
भारतातील खाद्यतेले क्षेत्रांतील सुमारे 90 टक्के भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख उद्योग संघटनांकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या अनुषंगाने केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग कायदेशीर मापनशास्त्र चौकटीअंतर्गत खाद्यतेलांसाठी प्रमाणित आकाराच्या पॅक्सची सुरुवात करण्याची शक्यता तपासून पाहत आहे.
बाजारात वाढत्या प्रमाणात उपलब्ध होत असलेल्या तेलांच्या विविध आकाराच्या पॅक्सच्या संदर्भात व्यक्त करण्यात आलेल्या चिंतांबाबत चर्चा करण्यासाठी प्रमुख खाद्यतेल उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींसोबत 20 मे 2026 रोजी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीदरम्यान, सध्या बाजारात 650 ग्रॅम, 700 ग्रॅम, 810 ग्रॅम, 850 ग्रॅम आणि 870 ग्रॅम अशा विविध आकारांमध्ये खाद्यतेले विकण्यात येत आहेत याकडे उद्योग प्रतिनिधींनी सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले की वेगवेगळ्या आकाराच्या सारख्याच दिसणाऱ्या पॅक्समुळे किंमतींची तुलना करणे आणि माहितीपूर्ण पर्याय निवडणे संभाव्यतः ग्राहकांची दिशाभूल ठरणारे ठरू शकते.
विभागाने प्रमुख खाद्यतेलांसाठी प्रमाणित आकाराच्या पॅक्सची सुरुवात करण्यासाठी संयुक्तपणे चर्चा केली.
संघटनेने केलेल्या सूचना:
· ग्राहकांसाठी किफायतशीर दरात लहान पॅक्सची उपलब्धता सुरु ठेवणे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने 200 मिलीपेक्षा कमी आकाराचे पॅक्स यापुढे देखील प्रमाणीकरणाच्या कक्षेबाहेर ठेण्यात येतील.
· अल्प प्रमाणात आढळणारी खाद्यतेले प्रस्तावित आवश्यकतेमधून वगळली जाऊ शकतात.
· उत्पादकांना आवश्यक समायोजन करणे शक्य करण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा संक्रमण काळ दिला जाऊ शकतो.
· प्रस्तावित आकारांचे पॅक्स लवकर स्वीकारण्यासाठी इच्छुक असलेल्या उत्पादकांना तसे करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
अशा कोणत्याही प्रकारच्या आवश्यकता, जर लागू करण्यात आल्या तर देशामध्ये उत्पादित करण्यात आलेल्या आणि आयात करण्यात आलेल्या अशा दोन्ही खाद्यतेलांसाठी समान पद्धतीने लागू होतील हे या बैठकीदरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे.
राधिका अघोर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2265202)
अभ्यागत कक्ष : 8