आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गैरवापर रोखण्यासाठी आणि कठोर नियंत्रणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रेगाबॅलिन औषधाचा शेड्यूल एच-1 मध्ये समावेश

Posted On: 22 MAY 2026 10:30AM by PIB Mumbai

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रेगाबॅलिन या औषधाचा गैरवापर रोखण्यासाठी आणि त्यावरील नियंत्रण अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने औषधे नियम, 1945 अंतर्गत अनुसूची एच-1 मध्ये समावेश करण्याची अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना 13 मे 2026 रोजीच्या राजपत्र अधिसूचना क्र. जी.एस.आर. 377(ई) द्वारे जारी करण्यात आली असून, ती 20 मे 2026 रोजी भारताच्या असाधारण राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.

अलिकडेच काही राज्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये प्रेगाबॅलिन या औषधाचा गैरवापर आणि व्यसनाधीनतेसाठी होणारा वापर, विशेषतः युवकांमध्ये वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घकालीन वेदना, न्यूरोपॅथी, फायब्रोमायल्जिया तसेच काही न्यूरोलॉजिकल आजारांच्या उपचारांसाठी हे औषध दिले जाते. मात्र, त्याच्या झोप आणणाऱ्या, उत्साहवर्धक आणि भान हरपविणाऱ्या परिणामांमुळे त्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. देशातील काही भागांत प्रेगाबॅलिनचा बेकायदेशीर साठा तसेच अनधिकृत विक्री प्रकरणेही अलीकडे उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे.

या अधिसूचनेनंतर, औषधे आणि प्रसाधने नियम, 1945 अंतर्गत प्रेगाबॅलिन या औषधावर विद्यमान अनुसूची एच ऐवजी आता अधिक कठोर असलेल्या अनुसूची एच-1 अंतर्गत नियंत्रण ठेवले जाईल.

अनुसूची एच-1 अंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाबाबत सूचना :

- वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे औषध घेणे धोकादायक आहे.

- नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय किरकोळ विक्री करता येणार नाही.

सुधारित वर्गीकरणानुसार पुढील बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत :

प्रेगाबॅलिन हे औषध केवळ नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या वैध प्रिस्क्रिप्शनवरच विकता येईल.

किरकोळ विक्रेत्यांनी प्रिस्क्रिप्शन आणि विक्रीची माहिती नोंदविण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवणे बंधनकारक असेल.

उत्पादकांनी औषधाच्या पॅकेजिंगवर निर्धारित अनुसूची एच-1 औषध इशारा स्पष्टपणे छापणे आवश्यक राहील.

नियमांचे उल्लंघन किंवा अनुपालन न केल्यास औषधे आणि प्रसाधने अधिनियम, 1940 तसेच त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

हा उपाय पुरवठा साखळीतील जबाबदारी अधिक बळकट करणे, अनधिकृत प्रवेश रोखणे, प्रिस्क्रिप्शनवर देखरेख वाढविणे, औषधांची बेकायदेशीर तस्करी आटोक्यात आणणे तसेच औषधांच्या गैरवापर आणि व्यसनाधीनतेपासून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे या उद्देशाने करण्यात आला आहे.

उत्पादक, वितरक, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि फार्मासिस्ट यांच्यासह सर्व संबंधित घटकांना या अधिसूचनेतील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ई-गॅझेट खालील लिंकद्वारे पाहता येईल. https://egazette.gov.in/(S(rqa3ekkjb0kpe5pwg0vwdyg4))/ViewPDF.aspx

***

NehaKulkarni / RajDalekar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2263993) अभ्यागत कक्ष : 25