रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे विभागातर्फे प्रवाशांना प्रवासादरम्यान सावध आणि दक्ष राहण्याचे आवाहन


रेल्वेला लक्ष्य करणाऱ्या समाज-विघातक घटकांना आळा घालण्यासाठी संशयास्पद कृती अथवा ती करणाऱ्या व्यक्तींची माहिती 139 या हेल्पलाईन क्रमांकावर कळवावी

रेल्वेला लक्ष्य करण्याबाबत अलीकडे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा आढावा बैठक

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन, प्रत्यक्ष क्षेत्राच्या ठिकाणची गुप्त माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुधारण्यात येत आहे: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

Posted On: 21 MAY 2026 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2026

 

रेल्वे गाड्या, प्रवासी, स्थानकांचा परिसर तसेच रेल्वेचे प्रचंड जाळे यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी रेल्वे विभाग कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), ड्रोन्स, सीसीटीव्ही इत्यादींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) बीटस्तरावर गुप्त माहिती संकलन यंत्रणा अधिक बळकट करुन मोहीम तत्वावर हे काम हाती घेण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आज घेण्यात आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या उच्च-स्तरीय सुरक्षा आढावा बैठकीमध्ये रेल्वे मंत्रालयाने दिल्लीस्थित ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशभरातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी विस्तृत विचारविनिमय केला. रेल भवन येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही.सोमण्णा आणि रवनीतसिंह बिट्टू देखील उपस्थित होते.

बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत असे लक्षात आले की गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या आगीच्या घटनांसह विविध घटनांच्या प्राथमिक तपासामध्ये समाज-विघातक घटकांचा सहभाग दिसून येतो आहे. भारतीय रेल्वे विभागाने या घटनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून आरपीएफ या घटनांचा बारकाईने तपास करत आहे. अनेक प्रकरणांमध्ये रेल्वे विभागाने तातडीने केलेल्या सक्रीय कारवाईमुळे मोठ्या दुर्घटना टाळण्यात मदत झाली आहे. या संदर्भात असेही जाणवले आहे की गुप्तचर यंत्रणा बळकट करणे तसेच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान तसेच स्थानक परिसरात वाट बघत थांबलेले असताना समाज-विघातक कारवायांना आळा घालण्यासाठी सक्रियपणे मदत करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित केले पाहिजे. म्हणूनच रेल्वे विभागाने प्रवाशांना प्रवासादरम्यान सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे परिसरात कोणतीही संशयास्पद कृती घडताना अथवा संशयास्पद व्यक्ती वावरताना दिसल्यास त्याबद्दलची माहिती तातडीने 139 या रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर कळवावी असे विभागाने सांगितले आहे.

सुरक्षा आढावा बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत सुधारित माहिती यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्यक्ष घटनास्थळावरून गुप्त माहिती संकलन यंत्रणा अधिक बळकट करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. तंत्रज्ञान-चलित सुरक्षा यंत्रणांमध्ये वाढ, रेल्वेच्या संपूर्ण जाळ्यामध्ये सीसीटीव्हीचा विस्तार तसेच रेल्वे मंडळाचे मुख्यालय आणि क्षेत्रीय विभाग यांच्या दरम्यान परिचालनात्मक सुरक्षाविषयक समन्वय सुधारणे यांवर देखील अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. सदर बैठकीत सायबर सुरक्षेचे बळकटीकरण, कॅमेरा स्पेसिफिकेशन्सचे अद्ययावतीकरण तसेच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित टेहळणी आणि देखरेख यंत्रणा यांचा वापर करणे अशा बाबींवर देखील या बैठकीत अधिक भर देण्यात आला. रेल्वे सेवेच्या जाळ्यामध्ये अधिक परिणामकारक सुरक्षा व्यवस्थापनासाठी आरपीएफ आणि सरकारी रेल्वे पोलीस यांच्यातील माहिती सामायीकीकरण यंत्रणा सुधारून समन्वय अधिक बळकट करण्यावर या बैठकीत अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.

 

* * *

शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2263824) अभ्यागत कक्ष : 18