आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आयुष ग्रिड उपक्रमांतर्गत आयुष अनुदान पोर्टलचा शुभारंभ


आयुष अनुदान पोर्टल, अनुदान व्यवस्थापनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करेल: प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन

डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि पारदर्शक अशा आयुष व्यवस्थेच्या हे पोर्टल एक महत्त्वपूर्ण पाऊल : प्रतापराव जाधव

Posted On: 19 MAY 2026 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 मे 2026

 

केंद्रीय आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत कर्तव्य भवन इथे आयुष अनुदान पोर्टलचा शुभारंभ केला. आयुष मंत्रालयाच्या आयुष ग्रिड उपक्रमांच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेले हे पोर्टल, मंत्रालयाच्या विविध केंद्रीय क्षेत्रीय योजनांतर्गत निधीबाबत प्रस्तावांचे सादरीकरण, प्रक्रिया, मंजुरी आणि देखरेख या गोष्टी सुव्यवस्थित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरले आहे.

आयुष ग्रिड हा केंद्र सरकारने दूरदृष्टीने हाती घेतलेला डिजिटल उपक्रम असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आयुष क्षेत्रासाठी एकात्मिक, पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित डिजिटल व्यवस्था निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे, असे प्रतापराव जाधव या पोर्टलच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यवसाय सुलभता आणि जीवन जगण्यातील सुलभता या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन, आयुष अनुदान पोर्टल हे सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे हे जाधव यांनी अधोरेखित केले.

हे पोर्टल आयुष क्षेत्रातील अनुदान व्यवस्थापन प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणेल, असे ते म्हणाले. "अनुदान व्यवस्थापन प्रक्रियेत 100% पारदर्शकता, कार्यक्षमता, जबाबदारीची जाणीव आणि सेवा सहज उपलब्धता सुनिश्चित करणे, हेच या पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट आहे." अशा शब्दात त्यांनी या प्लॅटफॉर्म महत्त्व सांगितले. तसेच, संस्थांना आणि संघटनांना पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे प्रस्ताव सादर करता येणार असल्यामुळे हे पोर्टल सरकारच्या कागदविरहित प्रशासनाच्या संकल्पनेला चालना देते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

एनजीओ दर्पण पोर्टलशी सहयोग केल्यामुळे अर्जदार संस्थांचे प्रमाणीकरण आणि पडताळणीची प्रक्रिया अधिक जलद, ऑटोमेटेड, विश्वसनीय आणि त्रुटीरहित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संशोधन, आरोग्यसेवा, औषधी वनस्पतींचे व्यवस्थापन, औषध नियमन आणि जागतिक स्तरावरील विस्तार यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये, एबीडीएमशी सुसंगत आयुष ग्रिड उपक्रमांतर्गत अनेक डिजिटल मंच याआधीच विकसित करण्यात आले आहेत यावर जाधव यांनी भर दिला. यामुळे पारदर्शक आणि नागरिकस्नेही सेवा सुनिश्चित होते, असे ते म्हणाले.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा; सहसचिव डॉ. कविता जैन, अलारमेलमंगाई डी. आणि मोनालिसा दास, तसेच आयुष मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

संस्था आणि संघटनांना एका सुव्यवस्थित आणि सुलभ इंटरफेसद्वारे निधीचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करणे, आयुष अनुदान पोर्टलमुळे साध्य होणार आहे. एनजीओ दर्पण पोर्टलशी संलग्न असलेला हा प्लॅटफॉर्म, अर्जदार संस्थांचे  प्रमाणीकरण आणि पडताळणी सुलभ करेल, परिणामी विश्वासार्हता वाढेल  आणि प्रमाणीकरण प्रक्रिया सुव्यवस्थित होईल.

या पोर्टलच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याची योजना-निहाय अर्ज व्यवस्थापन प्रणाली. यामुळे, मंत्रालयाच्या विविध योजनांच्या विशिष्ट गरजांनुसार प्रस्तावांचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि निरीक्षण करणे सोपे जाईल. या प्लॅटफॉर्मवर अर्जांचे रिअल-टाइम, म्हणजे वास्तविक वेळेत ट्रॅकिंग केले जाते. त्यामुळे अर्जदार आणि अधिकारी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रस्तावाच्या स्थितीकडे लक्ष ठेवू शकतात.

आयुष अनुदान पोर्टलचा उद्देश, अनुदान व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता, जबाबदारीची जाणीव आणि सुलभ उपलब्धता सुनिश्चित करणे हा आहे. डिजिटल परिवर्तन, पारदर्शक प्रशासन आणि डिजिटल इंडियाच्या संकल्पनेशी सुसंगत अशी भक्कम, नाविन्यपूर्ण व डिजिटलदृष्ट्या सक्षम आयुष व्यवस्था निर्माण करण्याप्रती मंत्रालयाची कटिबद्धता याद्वारे स्पष्ट होते.

मंत्रालयाचा एक-खिडकी डिजिटल उपक्रम असलेल्या 'MAISP' (My Ayush Integrated Services Portal) द्वारे किंवा थेट आयुष अनुदान पोर्टलच्या लिंकद्वारे या पोर्टलवर जाता येते.

MAISP Portal: https://maisp.ayush.gov.in/dashboard

Ayush Anudan Portal: https://anudan.ayush.gov.in/index

 

* * *

राधिका अघोर/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2262969) अभ्यागत कक्ष : 14