संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि व्हिएतनामचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री जनरल फान व्हान गियांग यांच्यात हनोई येथे द्विपक्षीय चर्चा


हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य, सुरक्षितता आणि नौवहन स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी

दोन्ही नेत्यांच्या हस्ते व्हिएतनाम मधील एअर फोर्स ऑफिसर्स महाविद्यालयातील लँग्वेज प्रयोगशाळेचे आभासी पद्धतीने उद्घाटन संपन्न

भारत आणि व्हिएतनाम यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान या क्षेत्रातील करारावर स्वाक्षरी

न्हा ट्रांग येथील दूरसंचार विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा स्थापन करण्याची संरक्षण मंत्र्यांची घोषणा

प्रविष्टि तिथि: 19 MAY 2026 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 मे 2026

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 19 मे 2026 रोजी हनोई येथे व्हिएतनामचे उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल फान व्हान गियांग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.  दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील संरक्षण क्षेत्रातील वाढत्या भागीदारीचा आढावा घेतला आणि सागरी सुरक्षा, संरक्षण उद्योग, प्रशिक्षण आणि क्षेत्रीय स्थैर्य यांमध्ये सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यावर विचारविनिमय केला.

image.jpeg

दोन्ही बाजूनी क्षेत्रीय आणि परस्परांच्या हिताच्या जागतिक सुरक्षेशी निगडित घडामोडींवर चर्चा केली आणि हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य, सुरक्षितता आणि नौवहनाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याच्या महत्त्वावर भर दिला. तसेच लष्करी प्रशिक्षण, संरक्षण उद्योगातील सहकार्य, सागरीवाहतूक सुरक्षा, क्षमता बांधणी, संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम, सायबर सुरक्षा आणि उच्चस्तरीय देवाणघेवाण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. नियमित संवाद, संयुक्त सराव आणि देवाणघेवाण कार्यक्रम यांच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रांच्या संरक्षण दलांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्यावर त्यांनी सहमती दर्शवली.

संरक्षणमंत्र्यांनी भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील वर्धित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या चौकटी अंतर्गत व्हिएतनामच्या लष्कराचे आधुनिकीकरण आणि क्षमता वृद्धी उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या संकल्पाचा देखील त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. 

image.jpeg

जनरल फान व्हान गियांग यांनी भारताच्या निरंतर पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि दोन्ही राष्ट्रांमधील दीर्घकालीन मैत्री आणि वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित केली.

दोन्ही संरक्षण मंत्र्यांनी व्हिएतनाममधील एअर फोर्स ऑफिसर्स कॉलेजमध्ये भाषा प्रयोगशाळेचे आभासी उद्घाटन केले. या प्रयोगशाळेची निर्मित भारताच्या सहाय्याने करण्यात आली आहे. संरक्षण मंत्र्यांनी न्हा ट्रांग येथील दूरसंचार विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा देखील यावेळी केली. 

image.jpeg

भारतातील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग आणि व्हिएतनाममधील टेलिकम्युनिकेशन्स युनिव्हर्सिटी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान या क्षेत्रात सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली, दोन्ही देशांमधील विस्तारित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला आहे.

या द्विपक्षीय बैठकीनंतर संरक्षण मंत्र्यांनी व्हिएतनामचे महासचिव आणि राष्ट्रपती तो लाम यांची भेट घेतली. संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, सागरी वाहतूक सहकार्य, संपर्क व्यवस्था, डिजिटल परिवर्तन आणि नागरिक ते नागरिक स्तरावरील संपर्क इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

image.jpeg

दोन्ही नेत्यांनी भारत आणि व्हिएतनाम यांच्यातीलसामायिक सांस्कृतिक दुवा, परस्पर विश्वास आणि सामायिक धोरणात्मक हितसंबंधांवर आधारित  भक्कम आणि अतूट मैत्रीचा पुनरुच्चार केला. भारत-व्हिएतनाम व्यापक सामरिक भागीदारीच्या सातत्यपूर्ण वाढीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

व्हिएतनामच्या अध्यक्षांनी आपल्या भारतभेटीचे स्मरण करत वाढत्या द्विपक्षीय सहयोगाची प्रशंसा केली आणि व्हिएतनामच्या विकासात तसेच धोरणात्मक प्राधान्यामधील एक महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून भारताच्या भूमिकेचे कौतुक केले. तसेच दोन्ही राष्ट्रांमधील वर्धित सर्वसमावेशक भागीदारीचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून  वृद्धिंगत होणाऱ्या संरक्षण सहकार्याचे स्वागत केले आणि येत्या काळात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

image.jpeg

राजनाथ सिंह यांनी व्हिएतनामचे संस्थापक आणि माजी राष्ट्राध्यक्ष हो चि मिन्ह यांच्या 136व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळावर त्यांना आदरांजली वाहून दिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात केली. त्यांची दूरदृष्टी, नेतृत्त्व आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि जागतिक ऐक्याबद्दलची त्यांची दृढ बांधिलकी येणाऱ्या पिढयांना कायम प्रेरणा देत राहील. त्यांनी भारत - व्हिएतनाम मैत्रीचा भक्कम पाया रचला जो आजही सामायिक मूल्ये आणि परस्परांबद्दलच्या आदरभावनेत रुजलेला आहे, असे राजनाथ सिंग यांनी ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे.

भारत आणि व्हिएतनाम यांच्यात परस्पर विश्वास, समान मूल्ये तसेच संरक्षण, सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य या क्षेत्रांतील घनिष्ठ सहकार्यावर आधारित दृढ संबंध आहेत. 

image.jpeg

 

* * *

नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2262794) आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam