कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रिफॉर्म एक्सप्रेस अंतर्गत शेतकऱ्यांच्या जीवन सुलभतेसाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून मोठ्या सुधारणांची घोषणा

Posted On: 18 MAY 2026 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मे 2026

 

​केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आज प्रमुख सुधारणात्मक उपाययोजनांच्या मालिकेचा आढावा घेतला. शेतकरी, व्यापारी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित भागधारकांसाठी प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने हा आढावा घेण्यात आला. या आढैवा बैठकीत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. कृषी प्रशासनाला अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या रिफॉर्म एक्सप्रेस अंतर्गत मंत्रालयाच्या वतीने सुधारणांना गती दिली जाईल असे ते म्हणाले.

​या बैठकीदरम्यान, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव अतीश चंद्र यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना मंत्रालयाच्या वतीने राबवल्या जात असलेल्या विविध सुधारणांची आणि आगामी सुधारणात्मक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

​कीटकनाशकांची देशांतर्गत विक्री आणि साठवणुकीसाठीची परवाना प्रक्रिया लक्षणीयरीत्या सुलभ करण्यात आली असल्याची माहिती सचिव अतीश चंद्र यांनी दिली. परवाना मिळवण्यासाठीचा अर्ज आधीच्या तीन पानांवरून कमी करून आता केवळ एका पानाचा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

​या सुधारणेमुळे डास प्रतिबंधक मॅट्स, कॉइल्स, लिक्विड व्हेपोरायझर्स आणि झुरळ मारण्यासाठीचे स्प्रे यांसारख्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या 40 लाखांपेक्षा जास्त किरकोळ विक्रेत्यांना आणि किराणा विक्रेत्या दुकानदारांना फायदा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीदरम्यान, खते नियंत्रण आदेश, 1985 नुसार नवीन खतांच्या नोंदणी प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यासाठी उचललेल्या पावलांविषयी देखील माहिती देण्यात आली.

कृषी मालाच्या आयातदारांना आता आयसीईजीएटीई अर्थात भारतीय सीमाशुल्क इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज गेटवे  द्वारे केवळ एकच अर्ज सादर करावा लागणार असून त्यानंतर आयात करण्याचे आदेश थेट आयातदाराच्या लॉगिनवर जारी केला जाईल.

बियाणे आणि कृषी साहित्याच्या आयातनिर्यात प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात आल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली. अधिकाऱ्यांनी बैठकीत माहिती देताना सांगितले की, या आधी शेतकऱ्यांना आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी 15 हून अधिक  प्लॅटफॉर्म हाताळावी लागत होती. आता मात्र त्यांना आवश्यक असलेली माहिती एकाच ठिकाणी दिवसरात्र कोणत्याही वेळी उपलब्ध होणार आहे.

बैठकीचा समारोप करताना  केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्रात पारदर्शकता, तांत्रिक कार्यक्षमता आणि सुशासन यांना चालना देण्यासाठीची सुधारणा प्रक्रिया अधिक तीव्र करावी. शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारक यांच्यासाठी विविध कार्यपद्धती अधिक सुलभ, वेगवान आणि प्रभावी करणे हेच या सुधारणांचे उद्दिष्ट आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

* * *

सुषमा काणे/निलिमा चितळे/तुषार पवार/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2262577) अभ्यागत कक्ष : 16