गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमधील जगदलपूर येथे शहीद जवानांचे कुटुंबीय, सीएपीएफचे जवान आणि नक्षलवादी हिंसाचारातील पीडितांची घेतली भेट


देशाला नक्षलमुक्त करण्याचे एकेकाळी अशक्यप्राय वाटत असलेले उद्दिष्ट मोदी सरकारने अवघ्या 3–4 वर्षांत साध्य केले

Posted On: 18 MAY 2026 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मे 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज छत्तीसगडमधील जगदलपूर येथे शहीद झालेल्या सुरक्षा सैनिकांचे कुटुंबीय, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (सीएपीएफ) जवान आणि नक्षलवादी हिंसाचारातील पीडितांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, भारत आता नक्षलवादापासून मुक्त झाला असल्याचे आज मी अभिमानाने सांगू शकतो. हे असे स्वप्न आहे ज्यासाठी हजारो सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सर्वस्व अर्पण केले आहे. जे ध्येय एकेकाळी आयुष्यभरात कधीही शक्य होणार नाही असे वाटत होते, ते शूर सुरक्षा दलांनी केवळ तीन ते चार वर्षांत साध्य केले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

माओवाद पसरण्याचे कारण विकासाचा अभाव हे नव्हते तर सशस्त्र नक्षलवादी कारवायांनी विकासात आणलेला अडथळा हे खरे कारण होते. आता सशस्त्र नक्षलवादी कारवाया संपल्या आहेत, त्यामुळे अखेर विकासाला गती देता येईल, असे शाह म्हणाले.

बस्तर हा देशातील सर्वात विकसित आदिवासी विभाग म्हणून उदयास येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गरीब, मागास वर्ग, दलित आणि आदिवासी समुदायांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

नक्षलविरोधी मोहीमेच्या यशास मुख्यत्वे डीआरजी जवान आणि कोब्रा कमांडोंचे शौर्य आणि समर्पण कारणीभूत असल्याचे अमित शाह म्हणाले. नक्षलवादावर मात करण्यात आलेल्या यशाचे श्रेय त्यांनी सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, छत्तीसगड पोलीस, डीआरजी, एसटीएफ, बस्तर फायटर्स आणि विविध राज्यांच्या पोलीस दलांच्या एकत्रित प्रयत्नांना दिले.

 

* * *

सुषमा काणे/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2262568) अभ्यागत कक्ष : 4