संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार
लष्करी सहकार्य, औद्योगिक भागीदारी तसेच सागरी क्षेत्रातील सहयोगात वाढ करण्यावर, हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता तसेच स्थैर्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रीत करणार: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
प्रविष्टि तिथि:
18 MAY 2026 2:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2026
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज दिनांक, 18 मे ते 19 मे 2026 या कालावधीत व्हिएतनामच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार असून त्यानंतर दिनांक 19 मे ते 21 मे या कालावधीत ते कोरिया प्रजासत्ताकाला भेट देतील. सदर दौऱ्यावर निघण्यापूर्वी ‘एक्स’वर लिहिलेल्या संदेशात संरक्षणमंत्री म्हणतात की द्विपक्षीय सहभागाचा परीघ आणखी विस्तारण्याच्या उद्देशाने या दोन आशियाई देशांना भेट देण्यासाठी ते उत्सुक आहेत. धोरणात्मक लष्करी सहकार्य आणखी दृढ करणे, संरक्षण क्षेत्रातील भागीदारी आणखी बळकट करणे, सागरी क्षेत्रातील सहयोगात वाढ करणे तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता तसेच स्थैर्याला चालना देणे इत्यादी मुद्द्यांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
संरक्षण मंत्र्यांच्या या व्हिएतनाम भेटीच्या वेळी या दोन्ही देशांमधील व्यापक धोरणात्मक भागीदारीला 10 वर्षे पूर्ण होत असून, व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी दिनांक 5 ते 7 मे 2026 या कालावधीत भारतभेटीवर आलेले असताना ही भागीदारी वाढीव व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये अद्ययावत करण्यात आली आहे. या भेटीदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व्हिएतनामचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल फान वान जियांग यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.
संरक्षणमंत्र्यांनी यापूर्वी दिनांक 8 ते 10 जून 2022 या कालावधीत व्हिएतनामला दिलेल्या भेटीदरम्यान 2030च्या दृष्टीने भारत-व्हिएतनाम संरक्षण भागीदारीविषयक संयुक्त दूरगामी निवेदनावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. सदर निवेदनात द्विपक्षीय संरक्षण भागीदारीच्या दिशेने निश्चित मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या क्षेत्रात शांतता आणि समृद्धी स्थापित करण्यात दोन्ही लोकशाही देशांना स्वारस्य आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या या भेटीदरम्यान, 19 मे 2026 रोजी व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह यांची 136वी जयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने, संरक्षणमंत्री आदराचे प्रतीक म्हणून हो ची मिन्ह यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करतील तसेच त्यांना आदरांजली वाहतील.
दक्षिण कोरियाच्या भेटीदरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरिया प्रजासत्ताकाचे राष्ट्रीय संरक्षणमंत्री अहान ग्यु-बॅक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या भेटीदरम्यान हे मंत्री दोन्ही देशांमधील संरक्षण विषयक सहकार्याचा आढावा घेतील तसेच द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने नवीन उपक्रमांचा शोध घेतील. यावेळी ते सामायिक स्वर्स्याच्या क्षेत्रीय तसेच जागतिक समस्यांबाबत आपापल्या विचारांची देवाणघेवाण देखील करतील.
या दौऱ्यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरियाचे संरक्षण संपादन कार्यक्रम प्रशासन (डीएपीए) मंत्री ली याँग-चेओल यांची भेट घेतील तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली भारत-कोरिया व्यापार गोलमेज परिषद होईल.
कोरियाच्या युद्धातील भारताचे योगदान हा इतिहासातील एक सर्वात प्रमुख अध्याय असून जागतिक शांतता आणि स्थैर्याच्या अढळ बांधिलकीने तो परिभाषित झालेला आहे. भारतीय लष्करातील 60 पॅराशूट फिल्ड रुग्णवाहिका तैनात करुन या युद्धामध्ये सांत्वनाचा हात देण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने भारताने हा निर्णय घेतला. तीन वर्षांहून अधिक काळ सेवा देत या पथकाने दोन लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आणि सुमारे 2,500 शस्त्रक्रिया केल्या तसेच असंख्य नागरिकांवर देखील उपचार केले. भारताचे दुसरे प्रमुख योगदान म्हणजे तटस्थ देशांच्या प्रत्यावर्तन आयोगाच्या अध्यक्षपदासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडलेला आणि बहुमताने स्वीकारण्यात आलेला प्रस्ताव. त्यानुसार युद्धानंतरच्या काळात, कस्टोडीयन फोर्स ऑफ इंडिया या 5,230 सशक्त सैनिकांच्या भारतीय तुकडीने सुमारे 2,000 कैद्यांचे शांततामय प्रत्यावर्तन करण्याचे कार्य हाती घेतले.
हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ 21 मे 2026 रोजी देशभक्त आणि माजी सैनिक व्यवहार मंत्री क्वोन ओह-यूल यांच्या समवेत भारतीय युध्द स्मारकाचे संयुक्तपणे उद्घाटन करण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे.
भारताचे ‘ॲक्ट इस्ट धोरण’ आणि कोरिया प्रजासत्ताकाचे ‘हिंद-प्रशांत धोरण’ यांची एकमेकांशी नैसर्गिक जुळवणूक तसेच हिंद-प्रशांत प्रदेशातील सामायिक मूल्ये यांनी या दोन देशांमध्ये नातेसंबंधांचा एक नवा अध्याय खुला केला आहे.
* * *
नितीन फुल्लुके/ संजना चिटणीस/ दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2262255)
आगंतुक पटल : 50