पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय देशभरात भारतात आढळणाऱ्या मार्जार कुळातील प्रत्येक प्रजातीला समर्पित, संकल्पना-आधारित कार्यक्रमांचे आयोजन करणार

Posted On: 13 MAY 2026 11:08AM by PIB Mumbai

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (एमओईएफसीसी), मार्जार कुळातील वन्य प्राण्यांच्या संवर्धनातील भारताचे नेतृत्व अधोरेखित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) च्या उद्दिष्टांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रमांची मालिका आयोजित करणार आहे.

हे कार्यक्रम भारतातील वाघ, आशियाई सिंह, बिबट्या, हिम बिबट्या आणि चित्ता या पाच मार्जार कुळातील वन्य प्रजातींवर लक्ष केंद्रित करतील आणि भारत सरकार, तसेच राज्य सरकारांनी त्यांच्या संवर्धनासाठी केलेली कामगिरी, आव्हाने आणि सहयोगी कृती प्रदर्शित करतील.

संकल्पना आधारित कार्यक्रम पुढील ठिकाणी आयोजित केले जातील:

  • आशियाई सिंह संवर्धन कार्यक्रम – गीर, गुजरात
  • चित्ता संवर्धन कार्यक्रम – भोपाळ, मध्य प्रदेश
  • बिबट्या संवर्धन आणि आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कार्यक्रम – भुवनेश्वर, ओदिशा
  • हिम बिबट्या संवर्धन कार्यक्रम – गंगटोक, सिक्कीम
  • व्याघ्र संवर्धन कार्यक्रम – चंद्रपूर, महाराष्ट्र

व्याघ्र संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी, भागधारकांचा सहभाग मजबूत करण्यासाठी आणि भारत सरकारच्या पथदर्शी उपक्रमांअंतर्गत भारताच्या संवर्धन यशोगाथा अधोरेखित करण्यासाठी हे परिषदपूर्व कार्यक्रम आखण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून भारताच्या नेतृत्वाखाली आयबीसीएची स्थापना कशी झाली, हे यावेळी स्पष्ट केले जाईल.

भारत सरकार आणि राज्यांचे प्रमुख संवर्धन उपक्रम

1. आशियाई सिंह संवर्धन – गीर, गुजरात

संकल्पना: भारताचे अद्वितीय संवर्धन यश

आशियाई सिंह केवळ भारतातच आढळतात आणि हा जगातील सर्वात यशस्वी 'प्रजाती पुनरुद्धार' कार्यक्रमांपैकी एक आहे.

प्रमुख उपाययोजना:

  • दीर्घकालीन संवर्धन आणि अधिवास विस्तारासाठी ‘प्रोजेक्ट लायन’ ची अंमलबजावणी.
  • वैज्ञानिक संख्या निरीक्षण आणि रोग सर्वेक्षण प्रणाली.
  • ग्रेटर गिर परिसरातील अधिवास सुधारणा आणि भक्ष्यवृद्धी.
  • गीर संरक्षित क्षेत्रापलीकडे सभोवतालच्या भूप्रदेशांत सिंहांच्या अधिवासाचा विस्तार.  
  • संघर्ष निवारणासाठी बचाव आणि जलद प्रतिसाद पथके.
  • प्रजाती संवर्धनात मालधारींसारख्या समुदायांची भूमिका.
  • लोकसहभाग आणि पशुधन नुकसानभरपाई यंत्रणेसाठी गुजरात सरकारचे उपक्रम.

2. व्याघ्र संवर्धन – चंद्रपूर, महाराष्ट्र

संकल्पना: भारताच्या वन संवर्धनाचा पथदर्शी कार्यक्रम

जगातील एकूण वन्य वाघांपैकी 70% पेक्षा जास्त वाघ भारतात आढळतात आणि प्रोजेक्ट टायगर व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) अंतर्गत केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारत व्याघ्र संवर्धनात जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला आला आहे.

प्रमुख उपाययोजना:

  • देशभरातील व्याघ्र प्रकल्पांचे बळकटीकरण आणि विस्तार.
  • भूप्रदेश स्तरावरील संवर्धन आणि वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण.
  • कॅमेरा ट्रॅपिंग, एम-स्ट्रीप्स आणि एआय-सक्षम देखरेख प्रणाली, यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
  • शिकारविरोधी पायाभूत सुविधा आणि व्याघ्र संरक्षण दलाच्या तैनातीमध्ये वाढ.
  • मुख्य अधिवासापासून दूर गावांचे ऐच्छिक स्थलांतर.
  • व्याघ्र प्रकल्पांच्या परिसरात सामुदायिक सहभाग आणि पर्यावरण-विकास उपक्रम.
  • वन्यजीव पर्यटन आणि समुदायांच्या उपजीविकेला प्रोत्साहन देणे.  
  • चंद्रपूरसह विदर्भ क्षेत्रातील व्याघ्र भ्रमणमार्ग सुधारण्यासाठी आणि मानव-व्याघ्र संघर्ष कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेले विशेष प्रयत्न.

चंद्रपूर येथील कार्यक्रमात भारतातील वाघांच्या संख्येत झालेली उल्लेखनीय वाढ आणि त्यांचे अधिवास आणि कॉरिडॉर सुरक्षित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अधोरेखित केले जातील.

3. बिबट्यांचे संवर्धन आणि आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन – भुवनेश्वर, ओदिशा

संकल्पना : मानवाचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात  सहअस्तित्व

बिबट्या हा भारतातील सर्वात व्यापकपणे आढळणाऱ्या मोठ्या मार्जारवर्गीय प्रजातींपैकी  एक आहे आणि  अनेकदा मानवी वस्त्यांच्या आसपासच्या  भागात त्यांचा अधिवास आढळतो.

उचललेली प्रमुख पावले:

  • मानव-वन्यजीव संघर्ष निवारण कार्यक्रम आणि त्वरित प्रतिसाद पथके.
  • बचाव आणि पुनर्वसन पायाभूत सुविधांचे बळकटीकरण.
  • सहअस्तित्वाला प्रोत्साहन देणारी जनजागृती मोहीम.
  • वन विभागातील आघाडीच्या कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी.
  • संघर्षप्रवण व्यक्तींचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर.
  • परिसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि सामुदायिक सहभागाशी संलग्न ओदिशाचा जैवविविधता संवर्धन उपक्रम.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने  भुवनेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात, मानवी प्राबल्य  असलेल्या भूभागांमध्ये सहअस्तित्व आणि जैवविविधता संवर्धनावर भर दिला जाईल.

4. हिम बिबट्या संवर्धन – गंगटोक, सिक्कीम

संकल्पना: हिमालयाचा रक्षक

हिम बिबट्या हा  हिमालयीन परिसंस्थेच्या पर्यावरणीय आरोग्याचे सूचक आहेत आणि  हवामान बदल व अधिवासाच्या ऱ्हासामुळे त्यांना धोका आहे.

उचललेली प्रमुख पावले:

  • भारतातील हिम बिबट्यांच्या संख्येच्या  मूल्यांकन (SPAI) कार्यक्रमाची अंमलबजावणी.
  • स्थानिक हिमालयीन समुदायांना सहभागी करून घेत समुदाय-आधारित संवर्धन. 
  • शाश्वत उपजीविका आणि पर्यावरण-स्नेही पर्यटनाला प्रोत्साहन.
  • उंच प्रदेशातील अधिवास आणि भक्ष्य प्रजातींचे संवर्धन.
  • हिमालयीन प्रदेशात हवामान-अनुकूल संवर्धन नियोजन.
  • आंतरराष्ट्रीय संवर्धन उपक्रमांसाठी हिमालयीन राज्यांसोबत सहकार्य.

गंगटोक कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नाजूक पर्वतीय परिसंस्थांचे संवर्धन आणि हिम बिबट्यांच्या संरक्षणातील स्थानिक समुदायांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे

5. चित्ता संवर्धन – भोपाळ, मध्य प्रदेश

संकल्पना : भारताच्या गवताळ प्रदेशातील परिसंस्थांचे पुनरुज्जीवन

भारताने 'प्रोजेक्ट चित्ता' अंतर्गत मोठ्या मांसाहारी प्राण्यांसाठी जगातील पहिला आंतरखंडीय स्थलांतर प्रकल्प सुरू केला आहे.

उचललेली प्रमुख पावले:

  • नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांचे मध्य प्रदेशातील योग्य अधिवासात पुनर्वसन.
  • भक्ष्य प्रजाती आणि गवताळ प्रदेशातील परिसंस्थांचा विकास.
  • सॅटेलाइट कॉलर आणि तज्ज्ञ व्यवस्थापन नियमावलीद्वारे वैज्ञानिक देखरेख.
  • क्षेत्रीय कर्मचारी आणि पशुवैद्यकीय पथकांची क्षमता बांधणी.
  • दीर्घकालीन अधिवास व्यवस्थापन आणि विस्तार नियोजन.
  • चित्ते सोडण्याच्या ठिकाणांविषयी सामुदायिक जनजागृती अधिक मजबूत करणे.

भोपाळ कार्यक्रम हा चित्त्यांचे पुनर्वसन आणि गवताळ प्रदेशातील परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करण्याचे भारताचे अग्रगण्य प्रयत्न अधोरेखित करेल .

6. 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स'  (IBCA)

भारताने सुरू केलेल्या 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स' चा उद्देश, जगभरातील सात प्रमुख मार्जार  प्रजातींच्या संवर्धनासाठी जागतिक सहकार्य अधिक दृढ करणे हा आहे. या विषयावरील कार्यक्रम खालील बाबींसाठी व्यासपीठ म्हणून काम करतील:

  • मार्जार प्रजातींच्या प्राण्यांच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अशा प्रकारच्या   पहिल्या जागतिक शिखर परिषदेला ठळकपणे अधोरेखित करणे,
  • जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणे,
  • संवर्धन विषयक  ज्ञान सामायिक करणे,
  • धोरणात्मक उपक्रम अधोरेखित करणे,
  • जनजागृती वाढवणे, आणि
  • वन्यजीव संवर्धनात भारताचे नेतृत्व अधिक मजबूत करणे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे आणि  राज्य वन विभाग, एनटीसीए, भारतीय वन्यजीव संस्था, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, भारतीय वन व्यवस्थापन संस्था आणि इतर हितधारकांच्या समन्वयाने हे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

***

NehaKulkarni / SushamaKane / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2260586) अभ्यागत कक्ष : 10