वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्यावतीने आयोजित किम्बर्ली प्रोसेस आंतरसत्रीय बैठकीला 2026 मुंबईत सुरुवात


देखरेख,अनुपालन आणि शाश्वत हिरे व्यापार हे मुद्दे किम्बर्ली प्रोसेस बैठकीच्या केंद्रस्थानी

Posted On: 12 MAY 2026 2:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मे 2026

भारताच्या अध्यक्षतेखाली मुंबईत किम्बर्ली प्रोसेस (केपी) आंतरसत्रीय बैठक 2026 ला सुरूवात झाली आहे. 11 ते 14 मे 2026 या कालावधीत होत असलेल्या या बैठकीत नैसर्गिक हिऱ्यांच्या जागतिक व्यापाराशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येत असून जगभरातील किम्बर्ली प्रोसेसमधील सहभागी, निरीक्षक आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांचे प्रतिनिधी यासाठी एकत्र जमले आहेत.

किम्बर्ली प्रोसेसने उत्पादक देशांमध्ये शांततेला पाठिंबा देण्यात, उपजीविकेचे संरक्षण करण्यात आणि हिऱ्यांच्या वैध व्यापाराला बळकटी देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे केपी 2026 चे अध्यक्ष सुचिंद्र मिश्रा यानिमित्ताने संबोधित करताना म्हटले आहे. या प्रणालीवरील विश्वास अधिक दृढ करणे, सहभागी देशांमधील सहकार्य वाढवणे आणि बदलत्या जागतिक वातावरणातही किम्बर्ली प्रोसेस प्रासंगिक आणि प्रभावी राहील हे सुनिश्चित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.नैसर्गिक हिरे हे एक शाश्वत उत्पादन असून किम्बर्ली प्रोसेस ही जगातील सर्वात प्रगत प्रमाणीकरण प्रणालींपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

येत्या काही दिवसांत होणाऱ्या विविध कार्यगटांच्या आणि समित्यांच्या चर्चा व बैठकांचाही या आंतरसत्रीय बैठकीत समावेश असणार आहे. या चर्चा मुख्यतः किम्बर्ली प्रोसेस प्रमाणन योजनेची अंमलबजावणी, देखरेख आणि अनुपालन यंत्रणा, हस्तनिर्मित तसेच नदीपात्रात सापडणाऱ्या हिऱ्यांचे उत्पादन, डेटा आणि नैसर्गिक हिऱ्यांच्या मूल्य साखळीवरील विश्वास बळकट करण्यासाठीच्या उपाययोजना या विषयांवर आधारित असतील. ही आंतरसत्रीय बैठक 14 मे  2026 पर्यंत चालणार आहे.

या बैठकीच्या निमित्ताने सहभागी आणि निरीक्षकांना, नैतिक मार्गांनी प्राप्त केलेल्या नैसर्गिक हिऱ्यांवरील ग्राहकांचा विश्वास वाढवण्यात निर्माण होत असलेली नवी आव्हाने आणि सहकार्याच्या भूमिका या विषयांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

भारत सरकारच्या वाणिज्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, किम्बर्ली प्रोसेसमध्ये सहभागी असलेल्यांचे प्रतिनिधी, जागतिक हिरे परिषदेचे सदस्य, नागरी समाज आघाडीचे सदस्य आणि इतर भागधारकांचा या आंतरसत्रीय बैठकीत सहभाग आहे.

भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेली 2026 ची ही वार्षिक बैठक नैसर्गिक हिरे क्षेत्रातील 3 'सी' अर्थात विश्वासार्हता, अनुपालन आणि ग्राहकांचा विश्वास ही मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असून,रचनात्मक संवाद आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून जबाबदारपणे मिळवलेल्या नैसर्गिक हिऱ्यांचे भवितव्य बळकट करणे यावर या बैठकीचा विशेष रोख आहे.

नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2260211) अभ्यागत कक्ष : 21