संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिसमूहाच्या पश्चिम आशियाविषयक अनौपचारिक बैठकीतील प्रमुख मुद्दे: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, भारताकडे 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायुचा साठा, 45 दिवस पुरेल इतका एलपीजीचा उपलब्ध साठा
प्रविष्टि तिथि:
11 MAY 2026 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2026
पश्चिम आशियातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रीसमूहाची पाचवी बैठक आज म्हणजेच 11 मे 2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत कर्तव्य भवन इथे झाली. या बैठकीत, संघर्षग्रस्त भूमीतील ताज्या घडामोडींची माहिती घेत त्या अनुषंगाने, भारतीयांना त्याची कमीतकमी झळ बसेल, यासाठी देशाची सज्जता वाढवण्यावर भर देण्यात आला. रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीप सिंह पुरी, रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजु, नागरी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह उपस्थित होते.

या मंत्रिसमूहाला माहिती देण्यात आली की, देशात कुठेही, कोणत्याही पेट्रोलियम उत्पादनाचा तुटवडा नसून अनेक देशांनी त्यांचे देशांतर्गत वापर,कमी करण्यासाठी, अनेक आपत्कालीन उपाययोजना हाती घेतल्या असतांना, आपला देश मात्र याबाबत सुरक्षित आहे. भारतात, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायुचा तुटवडा असून, एलपीजीचा 45 दिवसांचा साठा उपलब्ध असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. देशाची परदेशी गंगाजळी, 703 अब्ज इतकी असल्याची माहितीही देण्यात आली. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल शुद्धीकरण करणारा आणि चौथ्या क्रमाकांचा तेल उत्पादनांची निर्यात करणारा देश आहे. भारतातून, 150 पेक्षा अधिक देशांना पेट्रोलियम उत्पादने निर्यात केली जात असूनही, देशांतर्गत मागणी पूर्ण होत असल्याचे, सांगण्यात आले. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात, कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, त्याचे मोठे मूल्य देशाला चुकवावे लागत आहे, अशा वेळी इंधनाचा काटकसरीने वापर केल्यास, हे ओझे कमी होऊ शकेल, अशी माहिती देण्यात आली.

देशात आवश्यक वस्तूंचा गरजेपेक्षा अधिक साठा आहे, मात्र, आता अपेक्षित असलेला काटकसरीचा वापर, जर हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला तर, पुढेही संकट येऊ नये यासाठी क्षमता बांधणीसाठीची तयारी आहे, असे या बैठकीत मंत्र्यांना सांगण्यात आले. पुरवठा व्यवस्थापन उत्तम असून, जनतेने घाबरून जाण्याची किंवा गरजेपेक्षा जास्त इंधन साठा करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
सध्याच्या स्थितीत भारताचा प्रामुख्याने भर, देशातला ऊर्जा पुरवठा अखंडित सुरू राहावा, आर्थिक स्थैर्य अबाधित राहावे आणि सागरी मार्ग सुरक्षित राहावे यावर आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले. सर्व हितसंबंधियांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आणि तत्पर राहावे, असे निर्देश त्यांनी दिले.

देशात, खतांची पुरेशी उपलब्धता असून, मागणीपेक्षा अधिक पुरवठा होत असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.
सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2259969)
आगंतुक पटल : 54