गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली इथे आयोजित एका महत्त्वाच्या उच्चस्तरीय बैठकीत, संभाव्य पूर आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने देशाच्या सज्जतेचा घेतला सर्वंकष आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपण शून्य जीवितहानी आपत्ती व्यवस्थापनाचा दृष्टीकोन राबवण्याच्या दिशेने काम केले पाहिजे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
देशातील प्रत्येक राज्यात पूर संकट व्यवस्थापन पथके स्थापन करण्याची अमित शाह यांची सूचना
पर्यावरणीय संतुलन राखण्याला अधिक बहुआयामी स्वरुप मिळवून देण्याच्या उद्देशाने वनीकरण कॅम्पा अर्थात भरपाई निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण निधीचा वापर केला जावा -केंद्रीय गृहमंत्री
हवामानाचा अंदाज आणि संबंधीत इशारे व्यापक स्तरावर आणि प्रभावीपणे प्रसारीत केले जावेत- अमित शाह
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2026 6:47PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली इथे आयोजित एका महत्त्वाच्या उच्चस्तरीय बैठकीत, संभाव्य पूर आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी देशाच्या सज्जतेचा सर्वंकष आढावा घेतला.

देशातील प्रत्येक राज्यात पूर संकट व्यवस्थापन पथके स्थापन करून ती कार्यान्वित करावीत अशी सूचना अमित शाह यांनी या बैठकीत केली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्तींच्या काळासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे उत्तम रितीने जागरूकता निर्माण झाली, तसेच संपूर्ण सरकार या दृष्टिकोनाचाही विस्तार झाला असल्याची बाब त्यांनी नमूद केली. मात्र अंमलबजावणीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने प्रत्येक राज्य, जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापनात 'शून्य जीवितहानी'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. पाणी साठवणूक आणि कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे (चेक डॅम्स) यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या आणि भूजल पातळी वाढवण्याच्या अधिक शक्यता पडताळून पाहिल्या गेल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. नद्यांवर बंधारे बांधून एका बाजूला पाणी वाचवणे आणि दुसऱ्या बाजूला उन्हाच्या तीव्र लाटांचा परिणाम कमी करणे, हे आपले दुहेरी उद्दिष्ट असायला हवे, पर्यावरण संवर्धनाचे आणि समतोलाचे प्रयत्न अधिक बहुआयामी करण्यासाठी 'कॅम्पा' (CAMPA) निधीचा योग्य वापर केला जावा, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

हवामान बदलामुळे हवामानाच्या स्वरूपात होणारे बदल आणि त्यामुळे उद्भवणारी आपत्तींची वाढती आव्हाने पेलण्यासाठी, संपूर्ण शासन यंत्रणा आणि संपूर्ण समाजाला सोबत घेऊन काम करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे आणि याअंतर्गत एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला गेला पाहिजे, असेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले. तसेच, हवामानाचा अंदाज आणि धोक्याचे इशारे लोकांपर्यंत अधिक व्यापक आणि प्रभावीपणे पोहोचवले पाहिजेत, यावरही त्यांनी विशेष भर दिला.
पावसाळ्याच्या काळात होणारी जीवितहानी, आपल्या हवामान अंदाजांची अचूकता आणि शेती क्षेत्राचे झालेले नुकसान यांचा सखोल अभ्यास करून आगामी मान्सूनच्या अंदाजांचे अधिक अचूक मूल्यांकन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही शाह यांनी सांगितले.

पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या पूर्वतयारीला गृहमंत्री शाह यांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. ते दरवर्षी पूरपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. यामध्ये भारतीय हवामान शास्त्र विभाग (IMD) आणि केंद्रीय जल आयोग (CWC) यांच्याद्वारे पाऊस व पुराचे आगाऊ अंदाज वर्तवण्याचा कालावधी तीन दिवसांवरून वाढवून सात दिवस करणे, तसेच उन्हाच्या तीव्र लाटांच्या (उष्माघाताच्या) अंदाजांच्या मानकांमध्ये सुधारणा करणे अशा महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे.
***
राधिका अघोर/तुषार पवार/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2259646)
आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam