वस्त्रोद्योग मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातील वारंगळ इथे पीएम मित्र उद्यानाचे उद्घाटन ; भारताच्या औद्योगिक आणि वस्त्रोद्योग विकास प्रवासातील ऐतिहासिक टप्पा
Posted On:
10 MAY 2026 5:20PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील वारंगळ इथे पीएम मित्र उद्यानाचे उद्घाटन केले. यामुळे भारताच्या औद्योगिक आणि वस्त्रोद्योग विकास प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे. 1695.54 कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आलेले हे देशातील पहिले पीएम मित्र उद्यान असून, भारत सरकारच्या `5 एफ` दृष्टीकोनाला अर्थात शेतीपासून धाग्यापर्यंत, धाग्यापासून कारखान्यापर्यंत, कारखान्यापासून फॅशनपर्यंत आणि फॅशनपासून परदेशी बाजारपेठांपर्यंत प्रत्यक्षात आणणारा हा प्रकल्प आहे. वारंगळमधील पीएम मित्र उद्यान देशातील वस्त्रोद्योग क्रांतीला वेग देईल आणि विशेषतः महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असे, या प्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले.
प्रस्तावित नागपूर-विजयवाडा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे (एनएच-163जी) जवळ तसेच एनएच-163 च्या सान्निध्यात धोरणात्मकदृष्ट्या स्थित असलेले हे उद्यान प्रमुख रेल्वे जाळे आणि बंदरांशी जोडले जाणार आहे. यामुळे जागतिक व्यापारासाठी अखंड वाहतूक व्यवस्था मिळू शकेल. जागतिक दर्जाच्या औद्योगिक व्यवस्थेच्या स्वरूपात विकसित करण्यात आलेल्या या उद्यानामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये रस्त्यांचे विस्तृत अंतर्गत जाळे, स्वतंत्र वीज उपकेंद्र आणि खात्रीशीर पाणीपुरवठा यांचा समावेश आहे. तसेच शून्य द्रव उत्सर्जन तंत्रज्ञानासह सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाद्वारे शाश्वत विकासावरही भर देण्यात आला आहे.
हे उद्यान भारताच्या वस्त्रोद्योग विकासगाथेला गती देणारा महत्त्वाचा घटक ठरणार असून, इथे 6,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची अपेक्षा आहे. उद्यानामधील 62% क्षेत्राचे वाटप आधीच करण्यात आले असून, प्रकल्पात लक्षणीय प्रगती सुरू आहे. 1,327 एकर क्षेत्रात पसरलेल्या या पार्कमुळे वस्त्रोद्योग मूल्यसाखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणार असून, 24,400 पेक्षा अधिक रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. तसेच हजारो रोजगार आधीच निर्माण झाले आहेत.
केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने देशातील वस्त्रोद्योग पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मार्च 2023 मध्ये तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश या सात राज्यांमध्ये पीएम मित्रा पार्क उभारण्यास मंजुरी दिली होती. या योजनेमुळे देशात एकात्मिक वस्त्रोद्योग व्यवस्था निर्माण करण्यास चालना मिळणार आहे.
तेलंगणा सरकारने मार्च 2022 मध्ये वारंगळ इथल्या काकतीय मेगा टेक्सटाईल पार्कची पीएम मित्रा योजनेसाठी निवड करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. या माध्यमातून पार्कमधील पायाभूत सुविधा अधिक विकसित करून उद्योग स्थापनेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता.
पीएम मित्रा योजनेअंतर्गत ‘ब्राउनफिल्ड’ श्रेणीत मंजुरी मिळाल्यानंतर काकतीय मेगा टेक्सटाईल पार्कला 200 कोटी रुपयांचे विकास भांडवली सहाय्य तसेच पार्कमध्ये उभारल्या जाणाऱ्या उद्योगांसाठी 300 कोटी रुपयांचे स्पर्धात्मक प्रोत्साहन सहाय्य मंजूर करण्यात आले
वारंगळ इथल्या पीएम मित्रा पार्कसाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पाची एकूण किंमत 1695.54 कोटी रुपये आहे. या प्रकल्पात कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटचे झिरो लिक्विड डिस्चार्ज सुविधेत रूपांतर, प्रक्रिया उद्योगांसाठी कॉमन बॉयलर सुविधा, कामगार वसतिगृहांचा विस्तार तसेच 10 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.
पार्कमधील उद्योगांसाठी राखीव असलेल्या एकूण 548 एकर जमिनीपैकी पीएम मित्रा पार्कची घोषणा झाल्यानंतर 310 एकर जमीन विविध उद्योगांना वाटप करण्यात आली आहे.
पार्कमध्ये उभारल्या जाणाऱ्या उद्योगांना केवळ जागतिक दर्जाच्या संरचना सुविधा (जागतिक स्तरावर टेक्सटाईल मेगा पार्क्सशी तुलना केली जाते अशा)उपलब्ध होणार आहेत असे नव्हे तर त्यांना पीएम मित्र योजनेअंतर्गत स्पर्धात्मक प्रोत्साहन साहाय्य (सीआयएस) देखील प्राप्त होणार आहे. या पार्क मधील उत्पादने, कारखाने प्रोत्साहन साहाय्यासाठी पात्र ठरणार असून, त्यासाठी या प्रत्येक पार्कसाठी एकूण 300 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हे पार्क आकर्षण ठरणार आहेत.
पीएम मित्र पार्क मधील कारखाने केंद्र सरकारच्या इतर योजनांच्या फायद्यांसाठी पात्र ठरतील. विशेषतः वस्त्रोद्योग मंत्रालयाने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीच्या पीएलआय योजनेद्वारे नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यावर अधिक भर दिला आहे. या समन्वयाचे उदाहरण पहायचे तर, पीएम मित्र पार्क वारंगळमधील एका कारखाना, एवरटॉप टेक्सटाईल अँड अॅपरल कॉम्प्लेक्स प्रायवेट लिमिटेड हा देखील पीएलआय योजनेचा लाभार्थी ठरला आहे. या कंपनीला प्रस्तावित 1051 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून आणि अंदाजे 1990 कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीतून जवळपास 12,800 लोकांसाठी रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे.
पीएम मित्र पार्क योजनेतून केवळ व्हीजीएफ च्या स्वरूपात केंद्र सरकारचा निधी प्राप्त होते असे नाही तर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही दुणावणार आहे. आधुनिक सामायिक पायाभूत सुविधा उपलब्ध इथे उपलब्ध होणार असून भारताच्या राष्ट्रीय वस्त्रोद्योग पार्क उभारणीच्या धोरणालाही यामुळे बळ मिळणार आहे.. पीएम मित्र पार्कचा दर्जा मिळाल्याने केएमटीपी हे केवळ राज्यस्तरीय औद्योगिक पार्क न राहता राष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळालेली आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवणारी एक परिपूर्ण वस्त्रोद्योग व्यवस्था म्हणून उदयाला येते आहे.
***
राधिका अघोर/नितीन गायकवाड/हेमांगी कुलकर्णी/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2259579)
अभ्यागत कक्ष : 14