संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असलेल्या प्रगत अग्नी या भारतीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Posted On: 09 MAY 2026 4:48PM by PIB Mumbai

 

भारताने 08 मे 2026 रोजी ओदिशातील डॉ. ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून एमआयआरव्ही (MIRV - Multiple Independently Targeted Re-entry Vehicle) तंत्रज्ञानाने सज्ज अर्थात पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकणाऱ्या आणि एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असलेल्या प्रगत अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रातून एकाच वेळी अनेक ठिकाणी विखुरलेल्या अनेक लक्ष्यांवर अचूक मारा करणे शक्य होते. हिंद महासागर क्षेत्रातील मोठ्या भौगोलिक प्रदेशात विविध ठिकाणी असलेल्या लक्ष्यांवर पेलोड्स अर्थात स्फोटके डागून ही चाचणी करण्यात आली.

जमिनीवरील आणि जहाजांवरील विविध स्थानकांवरून या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणापासून ते लक्ष्यावर स्फोटके आदळेपर्यंतच्या संपूर्ण मार्गाची (Telemetry and Tracking) बारकाईने देखरेख केली गेली. उड्डाणादरम्यान मिळालेल्या आकडेवारीवरून या चाचणी मोहिमेची सर्व उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य झाली.
या यशामुळे भारताने एकाच क्षेपणास्त्र प्रणालीच्या उपयोगाने अनेक धोरणात्मक लक्ष्यांवर मारा करण्याची आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळा आणि देशातल्या संरक्षण उद्योगांमधील परस्पर सहकार्याने हे क्षेपणास्त्र विकसित केले गेले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि भारतीय लष्कराचे अधिकारी या चाचणीच्या वेळी उपस्थित होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचे अभिनंदन केले आहे. सध्याच्या वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, या नवीन तंत्रज्ञानामुळे देशाच्या संरक्षण सज्जतेत मोठी भर पडेल, असे त्यांनी म्हटले आहे.

***

माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259439) अभ्यागत कक्ष : 8