संरक्षण मंत्रालय
लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांची चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती
Posted On:
09 MAY 2026 7:21AM by PIB Mumbai
DXG9.jpeg)
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांची चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानीत लष्करी अधिकारी आहेत. पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पुढचा आदेश येईपर्यंत ते केंद्रीय लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही कारभार पाहतील. सध्याचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे 2026 रोजी पूर्ण होणार आहे. जनरल अनिल चौहान हे परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानीत लष्करी अधिकारी आहेत.
लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी हे 01 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी 01 जुलै 2024 ते 31 जुलै 2025 या काळात त्यांनी लष्कराचे उपप्रमुख (Vice Chief of the Army Staff) म्हणून काम पाहिले होते आणि मार्च 2023 ते जून 2024 पर्यंत ते सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते.
लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय लष्करी अकादमीचे पदवीधर आहेत. 14 डिसेंबर 1985 रोजी त्यांना गढवाल रायफल्सच्या 8 व्या बटालियनमध्ये नियुक्त करण्यात आले होते. ते ब्रिटनमधील ब्रॅकनेल इथल्या जॉइंट सर्व्हिसेस कमांड स्टाफ कॉलेज, तसेच नवी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी लंडन इथल्या किंग्स कॉलेजमधून कला शाखेची पदव्युत्तर पदवी आणि मद्रास विद्यापीठातून संरक्षण अभ्यास या विषयात एम. फिल. पदवीही प्राप्त केली आहे.
आपल्या 40 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या अभिमानास्पद कारकिर्दीत, लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांनी विविध स्वरुपांच्या संघर्षांच्या घटनांमध्ये, तसेच विविध प्रकारच्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांनी कमांड, अधिकारी - कर्मचारी आणि प्रशिक्षण या विभागातील अनेक पदांची जबाबदारी सांभाळली आहे. आसाममधली बंडाळी मोडून काढण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन ऱ्हायनोचा भाग म्हणून त्यांनी 16 गढवाल रायफल्सचे तसेच, जम्मू आणि काश्मीरमधील 168 इन्फंट्री ब्रिगेडचे तसेच मोहिमांच्या दृष्टीने आव्हानात्मक असलेल्या काळात सेंट्रल सेक्टरमील 17 माउंटन डिव्हिजनचे नेतृत्वही केले आहे. यासोबतच भारताच्या पश्चिम सीमा भागातील, भारतीय लष्कराच्या आक्रमणाच्या दृष्टीने प्रमुख शाखा असलेल्या आणि आघाडीवर राहून हल्ला करणाऱ्या दोन तुकड्यांचे नेतृत्व करण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.
लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांनी अधिकारी पदावरील अर्थात स्टाफ आणि प्रशिक्षण विषयक नियुक्त्यांअंतर्गतही विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीत विभागीय अधिकारी, माउंटन ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर, कझाकस्तानमधील संरक्षण दूत अर्थात डिफेन्स अटॅचे, लष्करी सचिव शाखेतील सहाय्यक लष्करी सचिव, पूर्व मुख्यालयाच्या कमांडमधील कर्नल जनरल स्टाफ (कार्यान्वयन), जम्मू आणि काश्मीरमधील राष्ट्रीय रायफल्स सेक्टरचे उप कमांडर, संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) एकात्मिक मुख्यालयातील लष्करी गुप्तचर विभागाचे उपमहासंचालक, पूर्व कमांडमधील ब्रिगेडीयर जनरल स्टाफ (कार्यान्वयन), वेलिंग्टन इथल्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये मुख्य प्रशिक्षक (लष्कर) आणि उत्तर कमांडच्या मुख्यालयाचे चिफ ऑफ स्टाफ या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांना देशाच्या पश्चिम आणि उत्तर अशा दोन्ही सीमांवरील लष्करी कारवायांच्या विविध पैलुंचे सखोल ज्ञान आणि इत्यंभूत माहिती आहे.
त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय सेवेबद्दल, त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानीत केले गेले आहे.
***
माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2259409)
अभ्यागत कक्ष : 9