पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 10 मे रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार


पंतप्रधान हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करणार

पंतप्रधान वारंगल येथे पीएम मित्र पार्कचे उद्घाटन करणार तसेच संगारेड्डी येथे झहीराबाद औद्योगिक क्षेत्राचे भूमिपूजन करणार

पंतप्रधान हैदराबाद-पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते महबूबनगर पर्यंत राष्ट्रीय महामार्ग-167 च्या चौपदरीकरण कामाचे भूमिपूजन करणार

पंतप्रधान हैदराबादमधील मलकापूर येथे इंडियन ऑइलचे ग्रीनफील्ड टर्मिनल राष्ट्राला समर्पित करणार

पंतप्रधान हैदराबादमध्ये कर्करोगावरील उपचारांसाठी अत्याधुनिक मल्टी-सुपर स्पेशालिटी क्वाटरनरी केअर असलेले सिंधू रुग्णालय देखील राष्ट्राला समर्पित करणार

पंतप्रधान बंगळूरु येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी होणार

Posted On: 09 MAY 2026 11:17AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे 2026 रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी साधारण 11 वाजता बंगळूरु येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी होतील आणि याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान हैदराबादला रवाना होतील आणि दुपारी 3 च्या सुमारास ते, अंदाजे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगीही ते उपस्थितांना संबोधित करतील. दुपारी 3:45 वाजता पंतप्रधान हैदराबादमधील सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील.

पंतप्रधान बंगळुरूमध्ये

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी 1981 मध्ये स्थापन केलेली 'आर्ट ऑफ लिव्हिंग' ही संस्था एक जागतिक, स्वयंसेवी मानवतावादी आणि शैक्षणिक संस्था बनली असून 182 देशांमध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या जन्मदिन सोहळ्यातही पंतप्रधान सहभागी होतील.

पंतप्रधान बंगळूरु येथील आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने बांधलेल्या ध्यान मंदिराचे देखील उद्घाटन करतील. हे ध्यान मंदिर आंतरिक शांती आणि सर्वांगीण आरोग्यासाठी एक समर्पित ध्यान कक्ष आहे. ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या देशव्यापी सेवा उपक्रमांचाही शुभारंभ करतील, ज्यामध्ये मानसिक आरोग्य, ग्रामीण विकास, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक परिवर्तन यावर केंद्रित वर्षभर चालणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे.

पंतप्रधान हैदराबादमध्ये

पंतप्रधान सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. या प्रकल्पांचा एकत्रित उद्देश संपर्क व्यवस्था मजबूत करणे, लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता सुधारणे, सुरक्षितता वाढवणे आणि प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव देणे, हा आहे.

पंतप्रधान हैदराबाद-पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते महबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग-167 च्या चौपदरीकरण कामाचे भूमिपूजन करतील. या प्रकल्पाचा एकूण खर्च 3,175 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि विना अडथळा होईल, प्रवासाचा वेळ सुमारे 1 तास 30 मिनिटांनी कमी होईल, तसेच इंधनाचा वापर आणि वाहनांच्या देखभालीचा खर्चही कमी होईल. या महामार्गामुळे तेलंगणा आणि कर्नाटक यांच्यातील संपर्क व्यवस्था मजबूत होईल तसेच दोन्ही राज्यांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

पंतप्रधान राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून हैदराबाद–नागपूर औद्योगिक मार्गिका (HNIC) अंतर्गत विकसित केल्या जाणाऱ्या संगारेड्डी जिल्ह्यातील झहीराबाद औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी करतील. 3,245 एकर क्षेत्रावर 2,350 कोटी रुपयांहून अधिक खर्चात विकसित होत असलेला हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-65 वर मोक्याच्या ठिकाणी असून तो प्रमुख शहरे, बंदरे, रेल्वे जाळे आणि विमानतळांना अखंड मल्टीमोडल संपर्क व्यवस्था प्रदान करेल.

एक स्मार्ट एकात्मिक औद्योगिक टाउनशिप म्हणून नियोजित असलेल्या झहीराबाद औद्योगिक क्षेत्रात प्रगत आणि शाश्वत पायाभूत सुविधा असतील आणि त्या भविष्यवेधी अत्याधुनिक उद्योगांना पाठबळ देतील. यामध्ये स्वयंचलित वाहन उद्योग, अन्न प्रक्रिया, यंत्रसामग्री, धातू आणि विद्युत उपकरणांची निर्मिती अशी प्रमुख क्षेत्रे विचारात घेण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे जवळपास 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे प्रादेशिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.

पंतप्रधान वारंगल येथे पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या 'पीएम मित्र पार्क'चे (काकतिया मेगा टेक्सटाईल पार्क) उद्घाटन करतील. सुमारे 1,700 कोटी रुपये अंदाजित खर्चात विकसित केलेले हे भारतातील पहिले पूर्णपणे कार्यान्वित पीएम मित्र पार्क आहे आणि ते भारत सरकारचा 5F दृष्टीकोन (Farm to Fibre to Factory to Fashion to Foreign) प्रत्यक्षात साकार करत आहे. प्रस्तावित नागपूर-विजयवाडा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे (NH-163G) आणि NH-163 च्या जवळ असलेल्या या पार्कमुळे प्रमुख रेल्वे जाळे आणि बंदरांशी उत्कृष्ट मल्टीमोडल संपर्क व्यवस्था उपलब्ध होते, ज्यामुळे जागतिक व्यापारासाठी अखंड लॉजिस्टिक्स व्यवस्था सुनिश्चित होते. जागतिक दर्जाची औद्योगिक परिसंस्था म्हणून रचना केलेल्या या पार्कमध्ये अंतर्गत रस्ते, समर्पित वीज उपकेंद्र आणि खात्रीशीर पाणीपुरवठा यासह अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत. हे 'झिरो लिक्विड डिस्चार्ज' तंत्रज्ञानासह सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राद्वारे शाश्वत विकासावरही भर देते.

पंतप्रधान सुमारे 1,535 कोटी रुपयांचे रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प देशाला समर्पित करतील. यामध्ये 118 किमी अंतराच्या काझीपेट-विजयवाडा मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पाच्या अनेक विभागांचा समावेश आहे. हा प्रकल्प अतिशय वर्दळीच्या 'ग्रँड ट्रंक' मार्गिकेच्या क्षमतेत वाढ करेल, ज्यामुळे रेल्वेचा वेग वाढेल, गर्दी कमी होईल, वक्तशीरपणात सुधारणा होईल आणि या प्रदेशातील मालवाहतुकीला चालना मिळेल.

याशिवाय, काझीपेट 'रेल अंडर रेल' बायपासचे देखील लोकार्पण करण्यात येईल. हा धोरणात्मक प्रकल्प हैदराबाद, बल्लारशाह आणि विजयवाडाच्या दिशेने एकाच वेळी रेल्वेची ये-जा सुलभ करून काझीपेट जंक्शनवरील गर्दी कमी करेल, ज्यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि विलंब कमी होईल.

पंतप्रधान हैदराबाद येथील इंडियन ऑइलच्या मलकापूर टर्मिनल प्रकल्पाचे लोकार्पण करतील. हा प्रकल्प 600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाने विकसित करण्यात आला आहे. पेट्रोलियम उत्पादने हाताळण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि या भागातील ऊर्जेची वाढती  मागणी पूर्ण करण्यासाठी मलकापूर टर्मिनलची स्थापना करण्यात आली आहे. या टर्मिनलची एकूण साठवण क्षमता 1,65,000 किलोलीटर (KL) आहे.

भारताच्या आरोग्य पायाभूत सुविधांमधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, पंतप्रधान हैदराबादमधील सिंधू हॉस्पिटलचे लोकार्पण करतील. विशेषत्वाने कर्करोगांवरील उपचारांच्या सुविधा असणारे, अत्याधुनिक, मल्टी-सुपर स्पेशालिटी क्वाटर्नरी केअर देणारे असे हे ना-नफा तत्वावरील रुग्णालय आहे. 18 मजले आणि 2.1 दशलक्ष स्क्वेअर फूट क्षेत्रावर पसरलेल्या या रुग्णालयात 1,500 खाटा, 150 हून अधिक डॉक्टर सल्लागार कक्ष आणि 29 प्रगत शस्त्रक्रिया गृह आहेत. या रुग्णालयातील सर्वसमावेशक सेवेमध्ये केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, कॅन्सर शस्त्रक्रिया, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, प्रगत क्रिटिकल केअर आणि 33 हून अधिक सुपर स्पेशालिटींचा समावेश आहे, ज्याला अत्याधुनिक निदान, आधुनिक प्रयोगशाळा आणि रक्तपेढी सुविधांचे पाठबळ आहे.

आर्थिक विकासाला गती देण्यासाठी, जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अधिक वेगवान आणि परस्परांसोबत जोडलेले राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या प्रकल्पांमधून पंतप्रधानांचा विकसित भारतासाठी विकसित तेलंगण हा दृष्टीकोन प्रतिबिंबित होत आहे.  

***

माधुरी पांगे/सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259381) अभ्यागत कक्ष : 10