माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सर्जनशील क्षेत्रासाठी भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेच्या राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य कार्यक्रमासाठी नावनोंदणीला सुरवात


माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने सर्जनशील क्षेत्रातील प्रतिभेसाठी दिल्या जाणार 15,000 कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य शिष्यवृत्ती

Posted On: 04 MAY 2026 6:53PM by PIB Mumbai

मुंबई, 4 मे 2026

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयसीटी) सहकार्याने सर्जनशील क्षेत्रासाठी राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य उपक्रम सुरू केला आहे. गुगल आणि युट्यूब यांच्या सोबतच्या भागीदारीअंतर्गत हा कार्यक्रम विकसित केला गेला आहे. याअंतर्गत माध्यम जगत, मनोरंजन, ॲनिमेशन, गेमिंग आणि डिजिटल कथात्मक मांडणी क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभेला, या उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयक कौशल्यांनी सुसज्ज करणे हा यामागचा हेतू आहे. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाअंतर्गत 15,000 शिष्यवृत्ती प्रदान केल्या जाणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्जनशील क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीला नवी उंची गाठून देऊ शकतील अशी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयक कौशल्ये आत्मसात करावी, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.  या कार्यक्रमाकरता नावनोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

संबंधित कौशल्यांबाबत शिष्यवृत्तीधारकांध्ये मूलभूत समज आणि ही कौशल्ये प्रत्यक्ष वापरात आणण्यायोग्य नैपुण्य  विकसित होईल याची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने, हा उपक्रम दोन टप्प्यांमध्ये राबवला जाणार आहे.

टप्पा 1: पाया (ऑनलाइन)

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासंबंधीच्या मूलभूत ज्ञानाविषयी व्यापक साक्षरता निर्माण करता येईल अशा पद्धतीने या टप्प्याची आखणी केली गेली आहे. याअंतर्गत या कार्यक्रमातील  15,000 सहभागींना गुगल करिअर सर्टिफिकेट्स, आणि गुगल क्लाउडच्या  जनरेटिव्ह एआय लर्निंग पाथ्स या अभ्यासक्रमांसाठीची शिष्यवृत्ती दिली जाईल. गुगल करिअर सर्टिफिकेट्स या अभ्यासक्रमाअंतर्गत शिष्यवृत्तीधारकांना, गुगलने स्वतः तयार केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत तज्ञ व्यावसायिकांकडून प्रशिक्षण घेण्याची तसेच, आघाडीच्या नियोक्त्यांशी जोडून घेण्याची संधी मिळणार आहे. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासंबंधीच्या मूलभूत संकल्पना आणि या तंत्रज्ञानाचा जबाबदारपूर्वक कार्यपद्धतींपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेचे  लोकशाहीकरण घडून येणार आहे. याअंतर्गत निवडक सहभागींना जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानासंबंधीच्या मूलभूत बाबी, प्रॉम्टिंगसंबंधीची (दिल्या जाणाऱ्या सूचना ) तंत्रे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या जबाबदारपूर्वक कार्यपद्धतींचा अंतर्भाव असलेले सुमारे 33 तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण करता येणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये गुगल करिअर सर्टिफिकेट्स आणि गुगल क्लाउडच्या जनरेटिव्ह एआय लर्निंग पाथवेचा समावेश आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थींना वास्तव जगातील परिस्थितीत लागू असणारे  आवश्यक असलेले ज्ञान तसेच समस्या निवारण्यासंबंधीची कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत.

टप्पा 2 : संबंधित कौशल्यातली तज्ञता (ऑनलाईन आणि प्रत्यक्ष उपस्थिती)

जे शिष्यवृत्तीधारक पायाभूत टप्पा पूर्ण करतील, त्यांच्यासाठीच्या प्रगत प्रशिक्षणाचा हा टप्पा आहे. याअंतर्गत आत्मसात केलेली कौशल्य प्रत्यक्षात कशी वापरावीत या संबंधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा हा टप्पा ऑनलाईन आणि प्रत्यक्ष उपस्थिती अशा स्वरुपाचा असेल. याअंतर्गत कथात्मक मांडणी, कलाकृतीची निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक प्रगत साधनांच्या वापरासंबंधीच्या प्रत्यक्ष प्रकल्पांवर आधारित प्रशिक्षणाचा समावेश आहे. हा टप्पा भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था आणि युट्यूबने संयुक्तपणे विकसित केला आहे. या अभ्यासक्रमात आपला आशय पोहचवणे, संबंधित आशयावरील साद प्रतिसादाचा विस्तार करणे यासंबंधीच्या सर्वोत्तम पद्धतींचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे शिष्यवृत्तीधारकांना गुगल डेव्हलपर्स कोडलॅब्स सारखी मार्गदर्शित व्यासपीठे आणि साधने वापरण्याचा अनुभवही मिळणार आहे.

या उपक्रमाला 'एआय स्किल्स हाउस' व्यासपिठाच्या माध्यमातून देखील सहाय्य केले जाईल, जे,  जनरेटिव्ह एआय ॲप्लिकेशन्स, वर्कफ्लो ऑटोमेशन आणि डिसिजन मेकिंग टूल्ससह  सुलभ आणि संरचित शैक्षणिक मार्ग उपलब्ध करून देईल. तांत्रिक प्रवीणता आणि सर्जनशील उपयोजन यांचा मेळ घालून, भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या मीडिया आणि डिजिटल क्षेत्रात अभिनव  कल्पनांना चालना देण्यास सक्षम असा कुशल मनुष्यबळ तयार करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

भारताची अर्थव्यवस्था बळकट करणे या सरकारच्या दृष्टीकोणाला अनुसरून, हा उपक्रम, मुख्य प्रवाहातीलं विषयांची निर्मिती आणि निर्माण  पद्धतींमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा समावेश करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्वपूर्ण संस्थात्मक पाऊल आहे. या कार्यक्रमाची रचना एक विशिष्ट आणि परिणाम-केंद्रित कौशल्य उपाय  अशी करण्यात आली आहे. हा कार्यक्रम, विशेषतः प्रसारमाध्यमे, मनोरंजन, अॅनिमेशन, गेमिंग आणि डिजिटल कथा कथन या क्षेत्रांतील उच्च प्रतिभावान लोकांसाठी तयार करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आयआयसीटीला अंमलबजावणी भागीदार म्हणून नियुक्त करण्यात आले असून, देशभरात याची अंमलबजावणी करण्याची धुरा संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. यात, अभ्यासक्रम विकसित करणे, उमेद्वारांपर्यंत पोहोचणे, कार्यक्रमांची अंमलबजावणी या बाबींचा समावेश आहे. आय आय सी टीने,  गुगल आणि यु ट्युब च्या सहकार्याने एका अभ्यासक्रमाची आखणी केली असून, ज्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रगत साधने, सर्जनशील कार्यपद्धती, आणि प्लॅटफॉर्म -स्तरीय सर्वोत्तम कार्यप्रणाली यांची सांगड घालण्यात आली आहे. यामुळे सहभागींना, अगदी सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष निर्मितीसाठी सज्ज आणि उद्योगांच्या गरजांशी सुसंगत अशी कौशल्ये प्राप्त होतील, हे सुनिश्चित केले जाते.

आशय निर्मिती, निर्मिती  आणि वितरणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यावहारिक आणि  वास्तविक-जगात वापर करण्यासाठी सर्जनशील व्यावसायिकांना तयार करण्याच्या राष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे, असे आयआयसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विश्वास देउस्कर यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या विस्तृत माहितीसाठी इथे क्लिक करा.

इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या क्यू आर कोड वर क्लिक करून, आताच, ए आय स्किल्स हाउस उपक्रमासाठी अर्ज करू शकतात.

 

 

 

निलीमा चितळे/सुषमा काणे/तुषार पवार/सविता म्हसकर /प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2257900) अभ्यागत कक्ष : 18