माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आशुतोष गोवारीकर यांची 57 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचे महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती

Posted On: 01 MAY 2026 1:05PM by PIB Mumbai

 

माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रख्यात चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांची गोव्यात होणाऱ्या 57 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी ( ईफ्फी) महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

गोवारीकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान असलेले ख्यातनाम दिग्दर्शक आहेत. ईफ्फी सोबत त्यांचा अनेक दशकांचा संबंध असून, जागतिक चित्रपट संस्कृती आणि चित्रकलेच्या विकासाशी त्यांचे सखोल नाते प्रतिबिंबित होते.

 

आपल्या नियुक्तीबाबत मत व्यक्त करताना गोवारीकर म्हणाले की, गोव्यातल्या 57 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी महोत्सव संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळणे त्यांच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंददायी आहे. या महोत्सवाच्या प्रवासाचा साक्षीदार होण्याचा त्यांना सन्मान लाभला आहे. 1984 मध्ये या महोत्सवात सहभागी होण्यापासून ते 2024 पर्यंत, जेव्हा ते आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागासाठी ज्युरी अध्यक्ष म्हणून काम केले, तोपर्यंत त्यांचा यात सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे.

 ते पुढे म्हणाले, 1952 पासून महोत्सव आयोजनात सहभागी असलेल्या अनेक चमूंनी घडवलेली, जपलेली आणि विस्तारलेली परंपरा पुढे नेणे हा मोठा सन्मान असून त्यासोबत नव्या जबाबदारीची जाणीवही आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकारसोबत जवळून काम करण्याची ते अपेक्षा बाळगतात.

 1952 मध्ये स्थापन झालेला आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव हा आशियातील अग्रगण्य चित्रपट महोत्सवांपैकी एक असून जागतिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण प्रोत्साहित करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

इफ्फी बद्दल

1952 मध्ये सुरू झालेला आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सातत्याने आयोजित होणारा चित्रपट महोत्सव आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि गोवा सरकारच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्यातर्फे आयोजित हा महोत्सव आज जागतिक चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचा संगमबिंदू बनला आहे. येथे पुनर्संचयित अभिजात चित्रपट आणि नव्या धाडसी कलाकृती एकत्र येतात, तसेच अनुभवी दिग्दर्शक आणि नवोदित निर्माते एकाच मंचावर आपली उपस्थिती दर्शवतात.

इफ्फीची वैशिष्ट्यपूर्ण ऊर्जा त्याच्या विविधतेत आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा, निवडक देशांवर लक्ष केंद्रित करणारे कार्यक्रम, मास्टरक्लासेस, श्रद्धांजली कार्यक्रम आणि वेव्हज चित्रपट बाजार यांचा समावेश आहे. येथे कल्पना, सहकार्य आणि सर्जनशील भागीदारी आकार घेतात. गोव्याच्या सुंदर किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2026 मध्ये होणारे 57 वे इफ्फी अधिक व्यापक स्वरूपात साकारले जाणार असून विविध भाषा, शैली, तंत्रज्ञान आणि कथन परंपरांचा समृद्ध संगम घडवून आणेल.

***

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2257283) अभ्यागत कक्ष : 67