पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील अलीकडच्या घडामोडींबाबत आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्र्यांनी, सागरी कामकाज सुरळीत राहावे आणि नौवहनाद्वारे आयात-निर्यात सुलभ व्हावी, यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला

तेहरानमधील भारतीय दूतावासाने आतापर्यंत 2,464 भारतीय नागरिकांना भू-सीमेवरून इराणमधून बाहेर पाठवण्याची व्यवस्था केली

Posted On: 29 APR 2026 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2026

 

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार नागरिकांना नियमितपणे अद्ययावत  माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इंधनाच्या सध्याच्या पुरवठा स्थितीबाबत अद्ययावत माहिती दिली. पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची रूपरेषा मांडण्यात आली. यावेळी नमूद करण्यात आले:

अंमलबजावणी आणि देखरेख

  • एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात अंमलबजावणीची कारवाई सुरू आहे. काल देशभरात 2200 हून अधिक छापे टाकण्यात आले.
  • सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी आपली तपासणी मोहीम अधिक तीव्र केली असून, त्यांनी 325 एलपीजी वितरण केंद्रांवर अचानक तपासण्या करून दंड ठोठावला. तसेच, कालपर्यंत 72 एलपीजी वितरण केंद्रांचे कामकाज स्थगित करण्यात आले.
  • काल, 54 एलपीजी वितरकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि 9 वितरकांना दंड ठोठावण्यात आला.

एलपीजी पुरवठा

घरगुती एलपीजी गॅस पुरवठ्याची स्थिती:

  • उद्योग स्तरावर ऑनलाईन एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये काल 98% पर्यंत वाढ झाली. 
  • 28.04.2026 रोजी, 50.8 लाखाहून अधिक घरगुती एलपीजी सिलिंडर वितरित करण्यात आले.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटप उपाययोजना:

  • फेब्रुवारी 2026 मध्ये विक्री झालेल्या 5 किलोच्या एफटीएल सिलिंडरची एकूण संख्या 21.7 लाख होती. तथापि, 1 एप्रिल 2026 पासून, सुमारे 21.05 लाख ते 5 किलो एफटीएल सिलिंडरची विक्री झाली.
  • काल 73,000 हून अधिक 5 किलोचे एफटीएल सिलिंडर्स वितरित करण्यात आले.
  • 3 एप्रिल 2026 पासून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी 5 किलो एफटीएल सिलिंडरसाठी 9550 हून अधिक जनजागृती शिबिरे आयोजित केली. यात 1,59,000 हून अधिक 5 किलोच्या एफटीएल सिलिंडर्सची विक्री झाली.
  • काल, सुमारे 175 शिबिरांच्या माध्यमातून 5 किलोच्या 2759 एफटीएल सिलिंडर्सची विक्री झाली.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपक्रम

  • मार्च 2026 पासून, सुमारे 5.69 लाख पीएनजी जोडण्यांना गॅसपुरवठा सुरू करण्यात आला, आणि अतिरिक्त 2.65 लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. यामुळे एकूण जोडण्यांची संख्या 8.34 लाखांवर पोहोचली. याव्यतिरिक्त, नवीन जोडण्यांसाठी सुमारे 6.37 लाख ग्राहकांनी नोंदणी केली.
  • 28 एप्रिल 2026 पर्यंत 42,950 हून जास्त पीएनजी ग्राहकांनी आपल्या एलपीजी जोडण्या MYPNGD.in website. या संकेतस्थळावरून सोडल्या आहेत.

कच्च्या तेलाची स्थिती आणि तेलशुद्धीकरण प्रकल्प

  • 9 एप्रिल 2026 पासून मुंबई, कोची, विशाखापट्टणम, चेन्नई आणि मथुरा इथल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामधून, रासायनिक, औषधनिर्माण आणि रंग उद्योगांना 8900 मेट्रिक टनांहून अधिक प्रोपिलीन आणि 950 मेट्रिक टनांहून अधिक ब्यूटिल ॲक्रिलेटची विक्री करण्यात आली आहे.

सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक कार्यान्वयन

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने, पर्शियन गल्फमधील विद्यमान सागरी परिस्थितीबाबत अद्ययावत माहिती दिली. तसेच त्या प्रदेशातील भारतीय जहाजे व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी पुढील बाबी नमूद करण्यात आल्या:

  • त्या प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि गेल्या 24 तासांत भारतीय ध्वजांकित जहाजांशी संबंधित कोणतीही घटना नोंदवली गेलेली नाही.
  • डीजी शिपिंग नियंत्रण कक्ष अद्ययावत माहिती: नियंत्रण कक्ष सुरू झाल्यापासून 8,034 फोनकॉल्स आणि 17,114 हून अधिक ई-मेल्स हाताळण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 114 कॉल्स आणि 276 ई-मेल्स प्राप्त झाले.
  • मंत्रालयाने, जहाजबांधणी संचालनालयाच्या माध्यमातून, आतापर्यंत 2,829 हून अधिक भारतीय खलाशांना सुरक्षित मायदेशी परतण्यास मदत केली आहे; यात गेल्या 24 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून परतलेल्या 29 खलाशांचाही समावेश आहे.
  • भारतभरातील बंदरांवरील कामकाज सुरळीत सुरू असून, कुठेही गर्दी किंवा अडथळा असल्याचे वृत्त नाही.

प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आखाती प्रदेश आणि पश्चिम आशियातील घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे त्यातही, भारतीय नागरिकांच्या सुरक्षा आणि सुरक्षितता आणि कल्याण यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. त्याविषयी अशी माहिती देण्यात आली आहे की,

  • भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या शंका आणि समस्यांना उत्तर देण्यासाठी मंत्रालयाने एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला असून त्यावरून हे समस्या निवारण केले जात आहे.
  • परराष्ट्र व्यवहार मंत्रालय राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्याने संपर्कात असून माहितीचे आदानप्रदान आणि प्रयत्नांमध्ये समन्वय राखला जात आहे.
  • भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासात सातत्याने 24 तास मदत क्रमांक सुरू असून सर्व नागरिकांना सक्रीयपणे मदत केली जात आहे. त्याशिवाय हे दूतावास स्थानिक सरकारांच्याही सातत्याने संपर्कात आहेत.
  • नागरिकांसाठी, अद्ययावत मार्गदर्शक सूचना वेळोवेळी जारी केल्या जात आहेत, यात स्थानिक सरकारच्या मार्गदर्शक सूचना, विमाने आणि प्रवासाची स्थिती, कायदेविषयक सेवा आणि भारतीय समुदायासाठी सुरू असलेल्या इतर कल्याणकारी उपायांची माहिती दिली जात आहे.
  • भारतीय दूतावास स्थानिक भारतीय समुदायासोबत सक्रियपणे संपर्कात आहेत.
  • सरकार या प्रदेशातील भारतीय खलाशांच्या कल्याणाला उच्च प्राधान्य देत आहे. भारतीय दूतावास त्यांना सर्वतोपरी मदत करत आहेत, यामध्ये स्थानिक अधिकारी आणि संस्थांबरोबर समन्वय साधणे, दूतावास सहाय्य उपलब्ध करून देणे आणि भारतात परत येण्याची विनंती करणाऱ्यांना साहाय्य करणे यांचा समावेश आहे.
  • या प्रदेशातून भारतातील विविध ठिकाणांसाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू झाल्याने एकूण विमान वाहतुकीची परिस्थिती सुधारत आहे.
  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये, विमान कंपन्या संचालन आणि सुरक्षिततेच्या विचारांवर आधारित युएई आणि भारतादरम्यान मर्यादित व्यावसायिक विमानसेवा सुरू ठेवत आहेत. आज युएई आणि भारतादरम्यान सुमारे 110 विमान उड्डाणे अपेक्षित आहेत.
  • सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे सुरू आहेत.
  • कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले झाल्याने, कतार एअरवेज भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे चालवत आहे. एअर इंडिया आणि इंडिगो देखील लवकरच कतारहून भारतासाठी विमान उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहेत.
  • कुवेतचे हवाई क्षेत्र खुले आहे. जझीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेजने कुवेतहून भारतासाठी मर्यादित विमान उड्डाणे पुन्हा सुरू केली आहेत.
  • बहारीनचे हवाई क्षेत्र खुले आहे. गल्फ एअर बहारीनहून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे चालवत आहे. एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो देखील लवकरच बहारीनहून भारतासाठी विमान उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहेत.
  • इराकचे हवाई क्षेत्र खुले असून प्रदेशातील काही ठिकाणांसाठी मर्यादित विमान उड्डाणे सुरू आहेत, ज्याचा उपयोग भारताकडे पुढील प्रवासासाठी केला जाऊ शकतो.
  • इराणचे हवाई क्षेत्र मालवाहू आणि चार्टर्ड विमानांसाठी अंशतः खुले आहे. भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तर जे भारतीय आधीच तेथे आहेत त्यांना भारतीय दूतावासाच्या मदतीने जमिनी  मार्गांनी बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने आतापर्यंत 2,464 भारतीय नागरिकांना जमिनी मार्गांनी इराणमधून बाहेर पडण्यास मदत केली आहे.
  • इस्रायलचे हवाई क्षेत्र खुले असून या प्रदेशातील ठिकाणांसाठी मर्यादित विमान उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहे, ज्याद्वारे भारताकडे पुढील प्रवास केला जाऊ शकतो.

 

* * *

शैलेश पाटील/निलिमा चितळे/राजश्री आगाशे/राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256742) अभ्यागत कक्ष : 11